बांगलादेशातील अस्थिरता वाढली! शेख हसीना यांच्या निकालापूर्वी हिंसाचार; पोलिसांना 'शूट ॲट साईट'चे आदेश

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 2 h ago
प्रातिनिधिक चित्र
प्रातिनिधिक चित्र

 

ढाका

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरुद्धच्या खटल्याचा निकाल उद्या (सोमवारी) जाहीर होणार असून, त्यापूर्वीच राजधानी ढाक्यात अनेक ठिकाणी क्रूड बॉम्बचे स्फोट झाल्याने तणाव शिगेला पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हिंसक आंदोलकांना दिसताच क्षणी गोळ्या घालण्याचे (shoot-on-sight) आदेश जारी केले आहेत.

गेल्या वर्षी झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराप्रकरणी शेख हसीना यांच्यावर 'आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादा'समोर (ICT-BD) खटला सुरू आहे. ७८ वर्षीय हसीना सध्या भारतात असून, त्यांच्या अनुपस्थितीत हा खटला चालवला जात आहे. त्यांच्यावर मानवतेविरुद्धचे गुन्हे केल्याचा आरोप असून, सरकारी वकिलांनी त्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.

ढाक्यात काय घडले?

रविवारी ढाक्यातील विविध भागात क्रूड बॉम्बचे स्फोट झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अज्ञात हल्लेखोरांनी एका पोलीस स्टेशनच्या आवारात वाहने पेटवून दिली आणि अंतरिम सरकारचे प्रमुख मोहम्मद युनूस यांच्या सल्लागार समितीच्या सदस्याच्या घराबाहेर बॉम्बस्फोट घडवले. युनूस यांनी स्थापन केलेल्या ग्रामीण बँकेच्या मुख्यालयावरही हल्ले करण्यात आले आहेत.

पोलिसांचे कठोर आदेश

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी ढाका मेट्रोपॉलिटन पोलिसांनी (DMP) कडक पावले उचलली आहेत. पोलीस आयुक्त एस.एम. सज्जात अली यांनी स्पष्ट केले की, "बस जाळणाऱ्या किंवा मारण्याच्या उद्देशाने बॉम्ब फेकणाऱ्या कोणालाही गोळ्या घालण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कायद्यात तशी तरतूद आहे."

हसीना यांची प्रतिक्रिया

शेख हसीना यांनी सोशल मीडियावर एका ऑडिओ संदेशाद्वारे हे आरोप फेटाळले आहेत. "माझ्याविरुद्ध कोणताही पुरावा नाही," असे म्हणत त्यांनी समर्थकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. अंतरिम सरकारचे प्रमुख युनूस यांनी कट रचून आपली सत्ता उलथवून लावली, असा आरोपही त्यांनी केला आहे.

बांगलादेशातील ही परिस्थिती अत्यंत स्फोटक असून, उद्याच्या निकालाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.