हैदराबाद/रियाध
सौदी अरेबियातून एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. सोमवारी पहाटे मक्काहून मदिनेला जाणाऱ्या एका प्रवासी बसची डिझेल टँकरला धडक बसून झालेल्या भीषण अपघातात किमान ४२ भारतीय उमराह यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, ही दुर्घटना भारतीय वेळेनुसार मध्यरात्री १.३० च्या सुमारास मुफ्रिहत नावाच्या ठिकाणी घडली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातातील पीडित हे हैदराबादचे रहिवासी होते. मृतांमध्ये महिला आणि मुलांचाही समावेश आहे. सुरुवातीच्या माहितीनुसार, दुर्घटनेच्या वेळी बसमध्ये सुमारे २० महिला आणि ११ मुले होती.
हे सर्व यात्रेकरू मक्का येथील आपले धार्मिक विधी (उमराह) पूर्ण करून मदिनेच्या दिशेने निघाले होते. असे सांगितले जात आहे की, जेव्हा हा अपघात झाला, तेव्हा बसमधील अनेक प्रवासी गाढ झोपेत होते.
स्थानिक सूत्रांनी ४२ लोकांच्या मृत्यूची माहिती दिली असली तरी, अधिकारी अजूनही मृतांचा नेमका आकडा आणि वाचलेल्यांची स्थिती याची पडताळणी करत आहेत. आपत्कालीन सेवांकडून बचावकार्य आणि रिकव्हरीचे काम सुरू आहे.