मोहम्मद मेराज राईन : शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक न्यायासाठी उभारला लढा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
मोहम्मद मेराज राईन
मोहम्मद मेराज राईन

 

मलिक असगर हाश्मी

"राजकारण हेच प्रत्येक समस्येचे उत्तर असू शकत नाही," असे मत राईन यांनी 'आवाज - द व्हॉईस'शी बोलताना व्यक्त केले. याच विश्वासातून प्रेरित होऊन, त्यांनी वर्षभरापूर्वी 'पसमांदा विकास फाऊंडेशन'ची स्थापना केली.

तेव्हापासून, या संस्थेने पसमांदा मुस्लिमांच्या (जे भारताच्या मुस्लिम लोकसंख्येच्या अंदाजे ८० टक्के आहेत) जीवनात सुधारणा करण्यासाठी आणि त्यांच्यात नवी आशा व आत्मविश्वास जागवण्यासाठी उल्लेखनीय प्रगती केली आहे.

काही गट आपले प्रयत्न केवळ राजकीय प्रचारापुरते मर्यादित ठेवतात. त्यांच्या विपरीत, हे फाऊंडेशन शिक्षण, आरोग्य, आर्थिक सक्षमीकरण आणि सामाजिक न्याय यांसारख्या मूळ प्रश्नांवर काम करते.

राईन यांचा विश्वास आहे की, पसमांदांसाठी अर्थपूर्ण प्रगती केवळ सामूहिक जागृती आणि सहकार्यातूनच येऊ शकते. यासाठी 'अशरफ' (उच्चभ्रू) वर्गाच्या सहकार्याचीही विशेष गरज आहे.

'पसमांदा चळवळ ही अशरफ उच्चभ्रूंच्या विरोधात उभी आहे' हा जुना समज मोडून काढत, राईन यांनी अशरफ समाजातील लोकांनाही आपल्या संघटनेत सामावून घेतले आहे. त्यांची दृष्टी पसमांदा समाजाला एक 'राजकीय व्होट बँक' म्हणून नव्हे, तर 'आत्मनिर्भर आणि सक्षम समुदाय' म्हणून उभे करण्याची आहे.

मूळचे बिहारमधील वैशाली येथील असलेले मेराज राईन दिल्लीत आले. येथे त्यांनी आपली पत्नी निखत परवीन यांच्यासोबत फाऊंडेशनची स्थापना केली. ते मोटारसायकलच्या भागांची निर्मिती करणारा एक कारखानाही चालवतात. ते आपली व्यावसायिक जबाबदारी, कौटुंबिक जीवन आणि समाजसेवा यात उल्लेखनीय समर्पणाने समतोल साधतात.

फाऊंडेशनचे नेतृत्व करण्यासोबतच, राईन हे डॉ. एजाज अली यांच्या 'ऑल इंडिया मुस्लिम मोर्चा'चे उपाध्यक्ष आहेत. तसेच ते 'भाजप अल्पसंख्याक मोर्चा'च्या कार्यकारी समितीचे सदस्य आहेत. अशा प्रकारे त्यांनी आपल्या सामाजिक ध्येयाला राजकीय सहभागाशी जोडले आहे.

नुकतेच, फाऊंडेशनने 'जमिअत उलेमा-ए-हिंद'च्या मदनी हॉलमध्ये 'कौमी तालीमी बेदारी कॉन्फरन्स' (राष्ट्रीय शैक्षणिक जागृती परिषद) आयोजित केली होती. मदरशांमधील आधुनिक शिक्षणावर यात भर देण्यात आला. या कार्यक्रमादरम्यान, पाच मदरशांमधील विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर किटचे वाटप करण्यात आले.

जमिअत उलेमा-ए-हिंदचे सरचिटणीस मौलाना हकिमुद्दीन कासमी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. त्यांनी राईन यांना आरोग्यावरही लक्ष केंद्रित करण्याची विनंती केली. ते म्हणाले की, "आरोग्य हे शिक्षणा इतकेच आवश्यक आहे, कारण एक निरोगी नागरिकच राष्ट्र उभारणीत योगदान देऊ शकतो."

राईन यांचा ठाम विश्वास आहे की, आधुनिक शिक्षणच पसमांदा समाजाच्या प्रगतीची गुरुकिल्ली आहे. हरियाणाच्या नूह जिल्ह्यातील ३५० मदरशांमधील विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर किट वितरित करणे हे त्यांचे पुढील ध्येय आहे. पारंपरिक शिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञान यांच्यातील दरी कमी करणे हा त्यामागचा उद्देश आहे.

"यामुळे रोजगाराचे नवे मार्ग खुले होतील आणि देशभरातील तरुण पसमांदांसाठी एक उज्ज्वल भविष्य निर्माण होईल," असे ते म्हणतात.

फाऊंडेशनचे काम शिक्षण, आर्थिक सक्षमीकरण, कायदेशीर मदत, कौशल्य विकास, आरोग्यसेवा आणि समुदाय संपर्क अशा अनेक क्षेत्रांमध्ये विस्तारलेले आहे. ते विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि करिअर मार्गदर्शन पुरवते. तरुणांना स्वतःचे व्यवसाय सुरू करण्यासाठी पाठिंबा देते. सामाजिक किंवा कायदेशीर आव्हानांचा सामना करणाऱ्यांना कायदेशीर मदत देते. तसेच प्रशिक्षण कार्यक्रम आणि आरोग्य उपक्रम आयोजित करते.

या बहुआयामी प्रयत्नांमुळे, हे फाऊंडेशन केवळ एक 'एनजीओ' न राहता, एका 'चळवळी'त रूपांतरित होत आहे.

राईन एका वैविध्यपूर्ण टीमचे नेतृत्व करतात, ज्यात पुरुष आणि महिला दोघांचाही समावेश आहे. फाऊंडेशनच्या मार्गदर्शन मंडळात अक्रम हुसैन कासमी, देवबंदचे मुफ्ती मेहबूब रहमान कासमी, दिल्ली विद्यापीठाचे प्रा. आफताब आलम अन्सारी आणि डॉ. खदिजा ताहेरा यांसारख्या विद्वानांचा समावेश आहे. तसेच अब्दुस सलाम आणि सय्यद फारूक सय्यर हे सामाजिक कार्यकर्तेही आहेत.

विशेष म्हणजे, 'दलित मुस्लिम हलालखोर कल्याण परिषदे'चे संस्थापक मुर्तुझा आलम हेही टीममध्ये सामील झाले आहेत. यामुळे पसमांदा-दलित आघाडी अधिक मजबूत झाली आहे.

महिला विभागाचे नेतृत्व अंजुम आरा सल्तनत आणि ॲड. फराह मिर्झा यांसारख्या कार्यकर्त्या करतात, महिलांचे शिक्षण, रोजगार आणि सक्षमीकरणावर कार्यशाळा व चर्चासत्रांद्वारे लक्ष केंद्रित करतो.

राईन हे आरक्षणाला पसमांदा हक्क मिळवण्याचा एक आधारस्तंभ मानतात. "पसमांदांना त्यांच्या हक्कांसाठी मोठा लढा द्यावा लागणार आहे आणि तो केवळ सामूहिक प्रयत्नांतूनच शक्य आहे," असा त्यांचा ठाम विश्वास आहे.

नुकत्याच झालेल्या आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्यासोबतच्या भेटीत, त्यांनी मुस्लिमांना कलम ३१४ मधून वगळल्याचा मुद्दा उपस्थित केला. हा त्यांचा मोकळा आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन दर्शवतो.

राईन यांनी 'आवाज - द व्हॉईस'ला सांगितले, "आमच्या फाऊंडेशनचे ध्येय मुस्लिम ओबीसी, एससी आणि एसटी समाजात समानता आणि समृद्धी आणणे आहे. तसेच, भारतातील सर्व नागरिकांमध्ये एकता आणि बंधुभाव वाढवणे हेही आमचे ध्येय आहे."

अशा वेळी, जेव्हा पसमांदा समुदायाला अनेकदा केवळ एक राजकीय मतदारसंघ म्हणून पाहिले जाते, तेव्हा मेराज राईन यांचा उपक्रम एक ताजा आणि दूरदृष्टीचा आदर्श ठेवतो.

त्यांची दृष्टी दाखवते की, पसमांदा चळवळ आता केवळ घोषणांपुरती किंवा राजकारणापुरती मर्यादित राहिलेली नाही; ती तळागाळात ठोस कृतीतून प्रत्यक्षात येत आहे.

ते ज्या चळवळीचे नेतृत्व करत आहेत, ती एक असे भविष्य घडवत आहे, जिथे पसमांदा समुदाय केवळ संघर्षाचे प्रतीक राहणार नाही, तर विकास, सक्षमीकरण आणि आत्मनिर्भरतेचा दिपस्तंभ बनेल.

(लेखक ‘आवाज द व्हॉइस हिंदी’चे संपादक आहेत.)

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter