ओनिका माहेश्वरी
"कला ती नाही जी तुम्ही पाहता, तर ती आहे जी तुम्ही इतरांना दाखवता," हे शब्द आहेत प्रतिष्ठित कलाकार असगर अली यांचे. त्यांच्या नावे अनेक विश्वविक्रम आहेत. तसेच ते आपल्या कलेच्या माध्यमातून समाजात 'गंगा-जमुनी तहजीब'चा (सर्वसमावेशक संस्कृती) संदेशही पसरवत आहेत. प्रसिद्ध कलाकार असगर अली यांनी 'आवाज द व्हॉईस'ला सांगितले की, ते श्रीकृष्णाच्या बालरूपातील निरागसतेने भरलेल्या जीवनाने खूप प्रभावित आहेत. त्यांचे मोरपंख आणि बासरीचे रंग कोणत्याही चित्रकाराला आकर्षित करू शकतात.
असगर अली हे कलाकारांसाठी प्रेरणा आणि संपूर्णतेचे प्रतीक आहेत. त्यांनी श्रीकृष्णाचे बालरूप, तारुण्य आणि महाभारताच्या युद्धातील त्यांचे उपदेश, तसेच त्यांच्या लीलांवर आधारित ५० हून अधिक चित्रे (पेंटिंग्स) बनवली आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, एका कलाकाराची कला तेव्हाच बहरते, जेव्हा तो बारकावे सुंदरतेने दाखवतो. "आणि मीसुद्धा माझ्या पेंटिंग्समध्ये हीच गोष्ट उत्तम प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे," असे ते म्हणाले.
असगर अली यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय गीता महोत्सवातही त्यांनी आपल्या 'कृष्णा संकल्पनेवर' आधारित चित्रांचे प्रदर्शन लावले होते, जिथे लोकांनी त्यांच्या कामाला खूप दाद दिली.
असगर अली यांनी सांगितले की, आतापर्यंतचे सर्वात मोठे पेंटिंग त्यांनी अयोध्येत राम मंदिर स्थापनेच्या निमित्ताने आपल्या टीमसोबत मिळून बनवले. ५०x३० फूट आकाराचे हे भव्य पेंटिंग 'वर्ल्ड रेकॉर्ड'मध्ये सामील झाले आणि पंतप्रधान कार्यालयालादेखील पाठवण्यात आले.
अली म्हणतात की, "एका कलाकाराला कोणतेही बंधन नसते. तो आपल्या कलेद्वारे येणाऱ्या पिढ्यांना प्रेरित करू इच्छितो. आणि मलाही समाजात माझ्या कलेच्या माध्यमातून सलोखा आणि सौहार्दाचा प्रचार करायचा आहे."
दिल्लीच्या द्वारका सेक्टर-१२ मधील 'कलाभूमी' संस्थेचे संस्थापक असगर अली यांचा प्रवास संघर्ष आणि दृढ संकल्पाचे उदाहरण आहे. शाहबाद मोहम्मदपूर गावातून आलेल्या अली यांनी सांगितले की, कॉलेजच्या दिवसांत त्यांना विविध धार्मिक ग्रंथांवर काम करण्याचे प्रोजेक्ट मिळाले, त्यातून त्यांची कला बहरू लागली. त्यांचे गुरू राम बाबू यांनी त्यांना श्रीकृष्णाच्या जीवनातील सखोलतेची ओळख करून दिली.
सोबतच, असगर यांनी गणेश, गौतम बुद्ध आणि निसर्गावर आधारित चित्रेही बनवली आहेत. श्रीकृष्णाला समजून घेण्यासाठी त्यांनी मथुरा, वृंदावन आणि यमुना घाटांवरही वेळ घालवला आहे. त्यांच्या मते, श्रीकृष्णाशी संबंधित त्यांचे सर्वात आवडते चित्र ते आहे, ज्यात एका गोपीच्या पायात काटा रुतला आहे आणि कृष्ण झाडाच्या मागे उभे राहून तिला पाहताना हसत आहेत.
प्रसिद्ध कलाकार असगर अली यांचे म्हणणे आहे की, प्रत्येकाच्या आत एक कलाकार असतो. अलीकडेच त्यांनी तिहार तुरुंगात कैद्यांसाठी एक कार्यशाळा (वर्कशॉप) आयोजित केली. तिथे त्यांना आढळले की, ते सर्व कलेत रस घेतात आणि त्यापैकी बरेच जण तुरुंगातून बाहेर आल्यावर कलेच्या क्षेत्रातच आपले आयुष्य पुढे नेऊ इच्छितात.
असगर यांनी मान्य केले की, इस्लाममध्ये चित्रकलेला मान्यता नाही. असगर यांनी 'आवाज द व्हॉईस'ला सांगितले की, "जेव्हा मी पेंटिंग सुरू केले, तेव्हा माझ्या कुटुंबाने मला सांगितले की, जर तुला कलेलाच करिअर बनवायचे असेल, तर तुला तुझी व्यवस्था स्वतःच करावी लागेल." याच जिद्दीने अली यांनी संघर्ष केला.
दिल्ली ते गुरुग्रामपर्यंतचा प्रवास त्यांनी सायकलने केला. सुरुवातीला त्यांनी शाहबाद गावात एका चटईवर (दरी) ३० मुलांना पेंटिंग शिकवण्यास सुरुवात केली. आज, त्यांच्या 'कलाभूमी' या संस्थेत ७,००० पेक्षा जास्त विद्यार्थी-विद्यार्थिनी पेंटिंग शिकत आहेत. यात आसाम, पश्चिम बंगाल, कोलकाता आदी राज्यांमधून विद्यार्थी त्यांच्याकडे कला शिकण्यासाठी येत आहेत. विशेष म्हणजे, त्यात सर्व वर्गांचे लोक सामील आहेत; मग ते निवृत्त बँकर असोत, गृहिणी असोत किंवा तरुण असोत.
असगर अली यांनी सांगितले की, 'कलाभूमी'च्या नावे अनेक वर्ल्ड रेकॉर्ड्स नोंदवले गेले आहेत. यात लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्स, हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स, एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स, वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड्स, मार्वल्स बुक ऑफ रेकॉर्ड्स, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स यांचा समावेश आहे. यात त्यांनी भारतीय चलनाच्या ५०० रुपयांच्या जुन्या नोटेचे पेंटिंग बनवले होते.
सोबतच, असगर अली यांनी आपल्या कलाकृती परदेशातही प्रदर्शित केल्या आहेत. यात दुबई, सिंगापूर, थायलंड आदी देशांचा समावेश आहे. असगर अली यांनी सांगितले की, त्यांची सर्वात महागडी पेंटिंग मोठ्या किमतीत विकली जाण्यासाठी नामांकित (nominate) झाली होती, पण ती त्यांच्या मनाच्या खूप जवळ असल्याने त्यांनी ती पेंटिंग विकली नाही.
असगर अली हे कला क्षेत्रातील एक 'उस्ताद' आहेत. असगर अली यांनी आपले फाईन आर्ट्सचे शिक्षण जामिया मिलिया इस्लामियामधून पूर्ण केले. आता कलेच्या या स्पर्धात्मक जगात, ते गेल्या १८ वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना यशाच्या कथांमध्ये बदलण्यात गुंतले आहेत. ललित कला क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी त्यांचे नाव विश्वविक्रमात नोंदवले गेले आहे.
असगर अली यांनी सांगितले की, "आज माझे अनेक विद्यार्थी लडाख, आसाममध्ये स्वतःचे आर्ट क्लास चालवत आहेत, हे जाणून मला आनंद होतो." असगर अली म्हणाले की, कलाकाराचा प्रवास सोपा नाही, विशेषतः आजच्या काळात जेव्हा मॉडर्न आर्टही लोकांना आवडू लागले आहे. "नवीन गोष्टी आजमावण्यासाठी आणि कलेचे विविध मार्ग शोधण्यासाठी तयार रहा. प्रयोग करणे स्वीकारा आणि चुका करण्यास किंवा जोखीम घेण्यास घाबरू नका."
आजच्या काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) द्वारे कोणतीही कला सहज उपलब्ध होते. अशा वेळी, आर्टिस्ट असगर अली यांनी एआय टूल्सना आपली स्पर्धा मानण्यास नकार दिला आणि म्हटले की, "एआय रंजक आहे. त्याला स्पर्धा समजण्याऐवजी, एक 'स्मार्ट टूल' म्हणून पाहिले पाहिजे आणि स्वीकारले पाहिजे. सर्जनशील लोकांनी एआय आर्ट्सचा असा वापर करावा की, ती त्यांची 'कुबडी' बनणार नाही."
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -