आशा खोसा
अझरा नक्वी हे व्यक्तिमत्व समाजात अनेक भूमिका बजावताना दिसते. मात्र त्यांचा मूळ आत्मा उर्दूशी जोडलेला आहे. उर्दू हीच त्यांची भाषा असल्याचा दावा त्या करतात. त्या याच भाषेत श्वास घेतात, विचार करतात आणि ही भाषा त्यांच्या डीएनएमध्ये आहे. अनेक देशांमध्ये पतीसोबत परिपूर्ण आयुष्य जगूनही विविध व्यवसाय आणि भूमिकांमध्ये रमूनही त्यांचे मन नेहमीच त्यांच्या आवडत्या भाषेसाठी आसुसलेले होते.
२०१७ मध्ये दिल्लीला परतल्यानंतर अझरा यांना त्यांची आवड पूर्ण करण्यासाठी एक नोकरी मिळाली. त्या रेख्ता फाउंडेशनमध्ये सल्लागार संपादक (consulting editor) बनल्या. हे फाउंडेशन उर्दू भाषेच्या संवर्धन आणि प्रसारासाठी काम करते. या फाउंडेशनने उर्दू कवितेचा सर्वात मोठा ऑनलाइन संग्रह तयार केला आहे. यामुळे अस्सल उर्दू कविता एका क्लिकवर उर्दूप्रेमींपर्यंत पोहोचली आहे. रेख्ताला १५० हून अधिक देशांमधून प्रतिसाद मिळत आहे. वाचक आणि बिगर-वाचक यांच्यात भाषेची लोकप्रियता निर्माण करण्याचे श्रेय रेख्ताला दिले जाते.
अझरा नक्वी यांचे कवितेवर प्रचंड प्रेम आहे. त्यांनी मोबाईलवरील व्हॉट्सअॅप अॅप्लिकेशनचा एक अभिनव वापर शोधून काढला. सर्वात आधी त्यांनी २०० उर्दू महिला लेखिकांना एकत्र जोडून ‘बैनलअक्वामी निसाई अदबी तंझीम’ (बनात) नावाची एक साहित्यिक संस्था स्थापन केली. या संस्थेच्या नावाचा अर्थ 'आंतरराष्ट्रीय महिला साहित्यिक संघटना' (International Women’s Literary Organisation) असा होतो. त्यांनी त्यांच्या कामाचा प्रचार करण्यासाठी आणि लेखिकांमध्ये तो भाव निर्माण करण्यासाठी व्हॉट्सअॅप मोबाईल अॅप्लिकेशनचा वापर केला.
व्हॉट्सअॅप ग्रुपचा वापर करून अझरा नक्वी यांनी ४० महिला लेखिकांचे विषय-आधारित लेखन गोळा केले. त्या ग्रुपमध्ये धर्मावर किंवा साहित्याव्यतिरिक्त इतर कशावरही चर्चा न करण्याचा कठोर नियम आहे.
त्यांनी 'आवाज-द व्हॉईस'ला सांगितले की, या ग्रुपद्वारे गोळा केलेल्या कथा संकलन म्हणून प्रकाशित होण्याच्या मार्गावर आहेत. दोन पुस्तके - 'सब लोग क्या कहेंगे' (इतर लोक काय म्हणतील) आणि 'यादों के झरोके सें' (आठवणींच्या झरोक्यातून), प्रकाशनाच्या मार्गावर आहेत. तिसरे संकलन, 'जो अक्सर याद आते हैं' (प्रिय व्यक्तीच्या आठवणी) हे तात्पुरते नाव असलेले, सध्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे.
'बनात'च्या सदस्या त्यांच्या साहित्यिक संवादासाठी दरवर्षी भेटतात. अझरा लहान मुलासारख्या उत्साहात सांगतात की, "बनातच्या कार्यक्रमाचे नववे वर्ष मध्य प्रदेशातील भोपाळ येथे ऑक्टोबरमध्ये नियोजित आहे."
त्या सध्या रेख्ताच्या व्युत्पत्तीशास्त्रीय (etymological) प्रकल्पावर काम करत आहेत. हिंदी-उर्दू-इंग्रजी वापरून त्या एक बहुभाषिक शब्दकोश तयार करणार आहेत. आणि लवकरच त्यात गुरुमुखीचा (पंजाबी लिपी) समावेश केला जाईल.
नोएडामध्ये राहणाऱ्या अझरा नक्वी यांनी काही वर्षांपूर्वी त्यांच्या पतीला गमावले. त्या ७३ व्या वर्षीही परिपूर्ण जीवन जगत आहेत. "मी शब्दांच्या एका अद्भुत जगात राहत आहे. हे जग अमर्याद आहे आणि त्यात अनंत शक्यता आहेत." त्यांचा स्वर निर्जीवामध्येही प्राण फुंकू शकेल असा आहे. अझरा नक्वी यांना भाषेचे हे प्रेम वारशात मिळाले आहे. त्यांचे बालपण पुस्तके आणि लेखकांच्या सानिध्यात गेले.
त्या म्हणतात, "मला फ्रेंच भाषा आवडते, ती मी कॅनडात असताना शिकले. तरीही, मी फक्त उर्दूतच विचार करू शकते. उर्दूतच अनुभवू शकते आणि स्वतःला उर्दूतच उत्तम प्रकारे व्यक्त करू शकते."
त्यांचे आजोबा दिल्लीतील केंद्रीय अल्पसंख्याक विद्यापीठ असलेल्या जामिया मिलिया इस्लामियाच्या संस्थापकांपैकी एक होते. त्यांची आई एक कवयित्री आणि सुशिक्षित व्यक्ती होती. १९५७ मध्ये, त्यांच्या वडिलांच्या अलिगड मुस्लिम विद्यापीठातील नोकरीमुळे कुटुंब अलिगडला स्थलांतरित झाले. अझरा यांनी अब्दुल्ला गर्ल्स हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. हे हायस्कूल आता एएमयूचा (AMU) भाग आहे.
कौटुंबिक दबावाखाली, त्यांनी जेएनयूमधून अॅडॅप्टिव्ह बायोलॉजीमध्ये एम.फिल (M.Phil) पदवी पूर्ण केली. तरीही त्यांना उर्दूत लिहिण्याची तळमळ होती. १९७६ मध्ये त्यांनी एका कॉम्प्युटर सायंटिस्टशी झालेल्या विवाहानंतर त्या इराक आणि कॅनडाला गेल्या. मॉन्ट्रियलमध्ये त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेत (Artificial Intelligence) डॉक्टरेटसाठी नावनोंदणी केली. त्यांनी फ्रेंच भाषा शिकली आणि तेथील एका बालवाडीत शिकवले देखील.
कॅनडातील त्यांच्या १२ वर्षांच्या वास्तव्यादरम्यान त्यांनी नेहमीप्रमाणेच पुढाकार घेत दक्षिण आशियाई महिलांना सक्षम करण्यासाठी काम केले. त्यांनी त्यांना फ्रेंच भाषा शिकवली. त्यांनी रियाधमधील किंग सौद विद्यापीठातही काम केले.
अझरा आपल्या आठवणी ताज्या करत सांगतात की, सौदी अरेबियातील त्यांच्या १५ वर्षांच्या प्रदीर्घ वास्तव्यादरम्यान त्यांना काही नियम गुदमरून टाकणारे आणि अतार्किक वाटले. त्या म्हणतात, "मला सेवा करण्याची संधी मिळाली. ही भारतीय मुलांसाठी नर्सरी (nursery) होती मानसिक आव्हाने असलेल्या मुलांसाठी एक विशेष देखभाल केंद्र होते. तिथे मी सुमारे चार ते पाच वर्षे काम केले."
६० च्या दशकात सौदी महिला लेखिकांनी लिहिलेल्या लघुकथांचा संग्रह 'व्हॉइसेस ऑफ चेंज'चा अनुवाद त्यांनी केला. त्यावेळी खऱ्या अर्थाने त्यांची उर्दूशी पहिली भेट झाली. त्या म्हणतात, "महिला त्यांच्या समस्यांबद्दल इतक्या स्पष्टपणे लिहीत होत्या हे पाहून मला आश्चर्य वाटले. मी हे पुस्तक इंग्रजीतून उर्दूत अनुवादित केले आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला." 'सौदी कलमकार औरतों की मुंतखिब कहानियां' हे त्या पुस्तकाचे नाव होते.
त्यांनी त्यांच्या १५ उर्दू लघुकथा 'आंगन जब परदेस हुआ' मध्ये संकलित केल्या. या कथांमध्ये सांस्कृतिक फरक आणि स्थलांतरितांची दुर्दशा मांडण्यात आली आहे. ११ उर्दू पुस्तकांच्या लेखिका असलेल्या अझरा नक्वी या लोकांनी उर्दू आणि हिंदी वाचायला-लिहायला शिकावे अशी जोरदार शिफारस करतात. "मुलांना उर्दूच येत नाही आणि तीच गोष्ट हिंदीचीही आहे," अशी शोकांतिका त्या व्यक्त करतात.
(लेखिका या 'आवाज-द-व्हॉईस'इंग्रजीच्या संपादक आहेत.)