काश्मीरमध्ये 'ऑपरेशन क्लीन-अप'! १०० हून अधिक लोक चौकशीसाठी ताब्यात

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

जम्मू-काश्मीर पोलिसांनी दहशतवाद्यांचे 'सपोर्ट नेटवर्क' (मदतनीसांचे जाळे) उद्ध्वस्त करण्यासाठी संपूर्ण प्रदेशात मोठी कारवाई केली आहे. या कारवाई अंतर्गत १०० हून अधिक लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

सूत्रांनी रविवारी सांगितले की, गेल्या दोन दिवसांत काश्मीर खोरे आणि जम्मू प्रांत या दोन्ही भागांतील अनेक घरांवर हे छापे टाकण्यात आले.

पोलिसांनी सांगितले की, या कारवाईत दहशतवाद्यांचे "सहानुभूतीदार" (sympathisers) असल्याचा आरोप असलेले लोक, पाकिस्तान किंवा पाकव्याप्त काश्मीरमधून कार्यरत असलेल्या दहशतवाद्यांचे नातेवाईक आणि दहशतवादी गटांचे माजी 'ओव्हरग्राउंड वर्कर्स' (OGWs) यांच्यावर लक्ष केंद्रित करण्यात आले.

जम्मू प्रांतातील कठुआ जिल्ह्यात, दोन विशेष पोलीस अधिकाऱ्यांना (SPOs) सेवेतून बडतर्फ करण्यात आले. सूत्रांनुसार, या दोघांवर दहशतवाद्यांना मदत केल्याचा आरोप होता आणि त्यांना गेल्या वर्षी अटक करण्यात आली होती. जम्मूच्या रामबन, डोडा आणि राजौरी जिल्ह्यांतही छापे टाकण्यात आले.

किश्तवार जिल्ह्यात, पोलिसांनी सिम कार्ड विक्रेत्यांची तपासणी केली. अधिकाऱ्यांनी सांगितले की, राष्ट्रविरोधी घटकांना सिम कार्डचा पुरवठा होत आहे का, हे ते तपासत होते.

दक्षिण काश्मीरच्या अनंतनागमध्ये, पोलिसांनी पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांच्या घरांवर छापे टाकले. यामध्ये हिज्बुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर गुलाम नबी खान उर्फ अमीर खान याच्या घराचाही समावेश होता.

"विश्वासार्ह गुप्तचर माहितीच्या आधारे, पोलीस आणि सुरक्षा एजन्सींनी मिळून विविध ठिकाणी समन्वित शोधमोहीम (CASO) राबवली. OGWs आणि JKNOPs दहशतवाद्यांना आश्रय देण्यासाठी आणि मदत करण्यासाठी या ठिकाणांचा वापर करत असल्याचा संशय होता," असे पोलिसांनी एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, "सक्रिय दहशतवाद्यांना आणि त्यांच्या सीमेपलीकडील सूत्रधारांना लॉजिस्टिक, आर्थिक आणि वैचारिक मदत पुरवणाऱ्या नेटवर्कसह, दहशतवादी समर्थन पायाभूत सुविधा विस्कळीत करणे, हा या ऑपरेशनचा उद्देश होता."

पोलीस सूत्रांनी सांगितले की, दहशतवाद्यांना पुन्हा एकत्र येण्यापासून रोखण्यासाठी आणि शांतता भंग करण्याचे त्यांचे कोणतेही प्रयत्न हाणून पाडण्यासाठी ही नवी कारवाई सुरू करण्यात आली आहे.

एका अधिकाऱ्याने सांगितले, "हे प्रतिबंधात्मक छापे (pre-emptive raids) आहेत. दहशतवादी आणि त्यांच्या सहानुभूतीदारांवर दबाव ठेवण्यासाठी आणि त्यांना नियंत्रणात ठेवण्यासाठी हे केले जात आहे." ते पुढे म्हणाले, "खोऱ्यातील त्यांचे सपोर्ट नेटवर्क उद्ध्वस्त करून, आम्ही त्यांच्या पायावरच घाव घालत आहोत."

छाप्यांदरम्यान ताब्यात घेतलेल्या लोकांबद्दल एका अधिकाऱ्याने सांगितले, "त्यांना चौकशीसाठी उचलण्यात आले आहे. यात अशा लोकांचा समावेश आहे, ज्यांचा भूतकाळात दहशतवादाशी संबंध होता किंवा ते त्यांचे सहानुभूतीदार राहिले आहेत."

"ज्यांच्यावर छापे टाकले आणि ज्यांना ताब्यात घेतले, त्यात सध्या पाकिस्तानात असलेल्या दहशतवाद्यांचे कुटुंबीय आणि नातेवाईक यांचाही समावेश आहे. तसेच, 'बेकायदेशीर हालचाली (प्रतिबंधक) कायदा' (UAPA) अंतर्गत गुन्हा दाखल असलेले आणि सध्या जामिनावर बाहेर असलेल्या लोकांचाही यात समावेश आहे," असेही अधिकाऱ्याने सांगितले.

पोलिसांनी सांगितले की, ऑपरेशन दरम्यान, त्यांनी आक्षेपार्ह साहित्य, डिजिटल उपकरणे आणि दहशतवाद्यांना लॉजिस्टिक किंवा इतर मदत पुरवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंचा शोध घेतला. अनंतनाग पोलिसांनी सांगितले की, "शोधमोहीम शांततेत पार पडली आणि कोणतेही बेकायदेशीर किंवा आक्षेपार्ह साहित्य सापडले नाही."

"ही कारवाई योग्य कायदेशीर प्रक्रियेनुसार आणि रीतसर अधिकाराने करण्यात आली," असे पोलिसांनी सांगितले. "जम्मू-काश्मीर पोलीस राष्ट्रीय सुरक्षा आणि सार्वजनिक शांततेसाठी हानिकारक कृत्यांमध्ये गुंतलेल्या व्यक्ती किंवा गटांविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या आपल्या ठाम भूमिकेचा पुनरुच्चार करत आहे," असेही पोलिसांनी म्हटले आहे.