श्रद्धेकडून उन्मादाकडे : कसे पसरते कट्टरतावादाचे धुके?

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 3 h ago
२०१५मध्ये इस्लामिक स्टेटचे झेंडे हाती घेतलेले काश्मिरी तरुण
२०१५मध्ये इस्लामिक स्टेटचे झेंडे हाती घेतलेले काश्मिरी तरुण

 

आतिर खान

भारतात इस्लामिक कट्टरतावाद शांतपणे पसरत आहे. तो रात्री पसरणाऱ्या धुक्यासारखा आहे. श्रद्धा आणि उन्माद यांच्यातील रेषा पुसट होईपर्यंत तो दिसत नाही. गेल्या सोमवारी लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटाने दिल्लीची शांतता भंग पावली, तेव्हा हे हळूवार पसरणारे धुके प्राणघातक ठरले.

या स्फोटाने १९९० च्या दशकातील त्या भयंकर दहशतीची आठवण करून दिली. या एकाच हिंसक क्षणाने अनेक वर्षांची शांतता संपवली. यात दहाहून अधिक लोकांचा बळी गेला आणि अनेक जण जखमी झाले. या कटामागे कट्टर दहशतवादी नव्हते, तर डॉक्टर्स होते. हे उघड झाल्यावर हा धक्का अधिकच जोरात बसला. कारण डॉक्टरांनी तर जीव वाचवण्याची शपथ घेतलेली असते.

अधिकाऱ्यांचा आरोप आहे की, हे आरोपी ३८० किलोग्रॅम अमोनियम नायट्रेटचा स्फोट घडवण्याचा कट रचणाऱ्या गटाचा भाग होते. ते एकटे नव्हते. त्यांचे धागेदोरे भारताच्या सीमेपलीकडे जातात. २०२० मध्ये डॉ. उमर, डॉ. मुझम्मिल आणि डॉ. अदील हे डॉ. उक्शा नावाच्या एका व्यक्तीच्या निमंत्रणावरून तुर्कस्तानला गेले होते. पण यजमान कधीच भेटला नाही. त्याऐवजी, स्वतःला जानभाई म्हणवणाऱ्या आणि काश्मिरी वंशाचा दावा करणाऱ्या एका व्यक्तीने त्यांचा पाहुणचार केला.

तिथे वास्तव्यास असताना हे डॉक्टर्स सीरिया, जॉर्डन आणि पॅलेस्टाईनमधील लोकांना भेटले. या भेटी आता सामाजिक कमी आणि सामरिक अधिक वाटत आहेत. घरी परतल्यानंतर एनक्रिप्टेड टेलिग्राम चॅट्स आणि व्हॉट्सॲप व सिग्नलवरील खाजगी गट हे त्यांचे आभासी बैठकीचे कक्ष बनले. डॉ. मुझम्मिल आणि डॉ. उमर फरिदाबाद येथील एका विद्यापीठात लेक्चरर म्हणून रुजू झाले. त्यांनी तिथे आपला ऑपरेशनल बेस तयार केला आणि स्थानिक लोकांमध्ये मिसळण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्ससुद्धा मिळवले.

तपास अधिकाऱ्यांनुसार  ४७वर्षीय घटस्फोटिता डॉ. शाहिना हिने नियोजित हल्ल्यासाठी साहित्य खरेदी करण्यासाठी २२ लाख रुपये उभे केले होते. तिचे ३३ वर्षीय डॉ. मुझम्मिलसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले होते. पुराव्यांनुसार, त्यांचे संवाद आणि फंडिंगचे धागेदोरे इसिस (ISIS) आणि इतर जागतिक दहशतवादी नेटवर्कशी संबंधित हँडलर्सपर्यंत पोहोचले होते.

जेव्हा टेलिव्हिजन चॅनल्स लखनऊमधील डॉ. शाहिनाच्या घरी पोहोचली, तेव्हा तिचे वृद्ध वडील धक्क्यात होते. एकेकाळी अभिमान आणि आशेचे प्रतीक असलेली त्यांची मुले… देशद्रोहाचा आरोप त्यांच्यावर कसा होऊ शकतो, हेच त्यांना समजत नव्हते. अशा कृत्यांमुळे संपूर्ण मुस्लिम समाजाचे नाव बदनाम होते. मग प्रत्येक टोपी घातलेला, कुर्ता-पायजमा घातलेला माणूस संशयाच्या नजरेने पाहिला जातो.

जेव्हा टीव्ही न्यूज रिपोर्टर्स त्या वृद्धावर प्रश्नांची सरबत्ती करत होते, तेव्हा ते उत्तरे देण्यापूर्वी क्षणभर थांबत होते. त्यांना खात्री होती की त्यांची मुले हुशार होती. त्यांनी देशातील कठीण वैद्यकीय परीक्षा पास करण्यासाठी संघर्ष केला होता. आपल्या मुलांच्या दहशतवादी कृत्यांचे काही संकेत होते का? ते माझ्या नजरेतून सुटले का? ते संकेत मी आधीच ओळखले असते, तर मी माझ्या मुलांना कट्टरपंथी बनण्यापासून रोखू शकलो असतो का?, कदाचित, त्या थांबलेल्या क्षणांमध्ये ते हाच विचार करत असावेत.

जुन्या दिल्लीत लाल किल्ला स्फोटात मारल्या गेलेल्या मोहसिन अली (बॅटरी-रिक्षा चालक) याच्या साध्या घरी भेट दिलेल्या पत्रकारांना प्रत्येक चेहऱ्यावर दुःख दिसले. त्याची विधवा पत्नी आणि दोन शाळकरी मुले या धक्क्याने सुन्न झाली आहेत. शेजारी सांत्वन आणि भीती अशा दोन्ही भावना व्यक्त करत आहेत की, आता त्यांची काळजी कोण घेणार?

तपासकर्त्यांचा विश्वास आहे की, या डॉक्टरांचा अतिरेकीपणाकडे जाण्याचा प्रवास श्रीनगरमध्ये सुरू झाला. तिथे एका धर्मगुरूने डॉ. मुझम्मिल आणि डॉ. उमर यांना सांगितले होते की, त्यांची निवड 'उच्च उद्देशासाठी' झाली आहे. रुग्णांना बरे करण्यासाठी नाही, तर 'दैवी कार्याची' अंमलबजावणी करण्यासाठी.

हा एक विरोधाभास आहे की, अनेकदा बुद्धिमान लोकच अशा गोष्टींना सहज बळी पडतात. त्यांची तर्कशक्ती संपलेली नसते, ती फक्त चुकीच्या दिशेने वळवलेली असते. दुसरीकडे, गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने नुकतेच चीनमध्ये शिकलेल्या हैदराबादस्थित डॉ. अहमद मोहिउद्दीन सय्यद याला त्याच्या दोन कथित साथीदारांसह अटक केली.

अधिकारी सांगतात की, हे तिघे 'रायसिन' (Ricin) नावाचे एक प्राणघातक विष तयार करत होते. एरंडाच्या बियांपासून बनवलेले हे विष, जैविक शस्त्रे वापरून दहशतवादी हल्ले करण्यासाठी वापरले जाणार होते. त्यांनी आधीच लखनऊ, दिल्ली आणि अहमदाबादमध्ये टेहळणी केली होती. या अटकेमुळे रासायनिक युद्धाचा प्रयोग करणाऱ्या जागतिक अतिरेकी नेटवर्कशी असलेले भयंकर संबंध उघड झाले.

दहशतवादी कटांमध्ये सुशिक्षित व्यावसायिकांचा सहभाग एक अस्वस्थ करणारा प्रश्न उपस्थित करतो, बुद्धिमत्तेचे विषारी विचारसरणीत रूपांतर कशामुळे होते? या डॉक्टरांचा एकेकाळी जीव वाचवण्याचा विश्वास होता.तेच आता मृत्यूचे साधक बनले. त्यांची ही अधोगती हेच दाखवते की, श्रद्धा सहानुभूतीपासून दूर जाते तेव्हा दिशाभूल करण्याची ताकद प्रभावी ठरते.

त्यांना विश्वास दिला गेला की धर्मासाठी मरणे उदात्त आहे. त्यावेळी ते हे विसरले की, श्रद्धेची खरी कसोटी सन्मानाने जगण्यात असते. आपल्या कुटुंबाची, व्यवसायाची आणि देशाची सचोटीने सेवा करण्यात असते. सन्मानाने जगण्यापेक्षा आयुष्यात कोणतेही ‘उच्च ध्येय’ असू शकत नाही.

कोणतीही संस्कृती कधीच परिपूर्ण नसते. तिला टिकवून ठेवणारी गोष्ट म्हणजे स्पष्ट विचार करण्याचे धैर्य, द्वेषाचा प्रतिकार करण्याची ताकद आणि विचारसरणीपेक्षा जीवनाला निवडण्याचे शहाणपण.

भारतासमोरील आव्हान केवळ शिक्षा देण्याचे नाही, तर ते रोखण्याचेही आहे. जे दहशतीचा कट रचतात त्यांच्यावर राज्याने कठोर कारवाई केलीच पाहिजे. पण त्याचबरोबर 'कट्टरतावादविरोधी' (deradicalisation) एक समांतर मोहीमही राबवली पाहिजे. ही मोहीम मने धुक्यात फार दूर जाण्यापूर्वीच त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे.

प्रत्येक भारतीयाला मग तो कोणत्याही धर्माचा असो, या प्रयत्नाचा भाग व्हावे लागेल. पालक, शिक्षक आणि समाजातील नेत्यांनी तरुणांवर लक्ष ठेवले पाहिजे, ऑफलाइन आणि ऑनलाइन दोन्ही… संशयाने नव्हे, तर काळजीने. उन्मादालाच श्रद्धा समजत नाही याची त्यांनीखात्री करून घेतली पाहिजे.

कारण कट्टरतावाद कधीही आरडाओरडा करत येत नाही. तो शांतपणे झिरपतो, अशा धुक्याप्रमाणे जो जाळण्यापूर्वीच आंधळा करतो.

(लेखक ‘आवाज द व्हॉइस’चे मुख्य संपादक आहेत.)


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter