इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयझॅक हरझॉग यांनी बुधवारी वेस्ट बँकमधील पॅलेस्टिनी गावांवर ज्यू वसाहतवाद्यांनी (Jewish settlers) केलेल्या ‘धक्कादायक आणि गंभीर’ हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी ताब्यातील प्रदेशात वाढणाऱ्या वसाहतवादी हिंसाचाराच्या लाटेला संपवण्याचे आवाहन केले.
राष्ट्राध्यक्ष हरझॉग यांचे पद मुख्यत्वे औपचारिक असले, तरी देशासाठी नैतिक दिशादर्शक म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. हरझॉग म्हणाले की, मूठभर गुन्हेगारांनी केलेला हा हिंसाचार धोक्याची पातळी ओलांडणारा आहे. त्यांनी सर्व सरकारी यंत्रणांना या प्रवृत्तीवर निर्णायकपणे कारवाई करण्याचे आदेश दिले.
मंगळवारी वेस्ट बँकमधील बीट लिड आणि दीर शराफ या पॅलेस्टिनी गावांवर डझनभर बुरखाधारी इस्रायली वसाहतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यांनी वाहने आणि मालमत्ता पेटवून दिली आणि नंतर त्यांची इस्रायली सैनिकांशी झटापट झाली.
इस्रायलच्या एका उच्च लष्करी कमांडरनेही या हल्ल्याचा निषेध केला. सेंट्रल कमांडचे प्रमुख मेजर जनरल अवी ब्लुथ म्हणाले की, वसाहतवादी समुदायातील अराजकतावादी गटाकडून होणारा असा हिंसाचार अस्वीकार्य आहे. या हिंसाचारामुळे दहशतवादविरोधी कारवायांवरून महत्त्वाचा फौजफाटा दुसरीकडे वळवावा लागत असल्याची टीकाही त्यांनी केली.
दोन वर्षांपूर्वी गाझा युद्ध सुरू झाल्यापासून तरुण वसाहतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अहवालानुसार, २००६ नंतर, याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात वेस्ट बँकमध्ये पॅलेस्टिनींवर सर्वाधिक (२६० हून अधिक) हल्ले नोंदवले गेले.
पॅलेस्टिनी आणि मानवाधिकार कार्यकर्ते असा आरोप करतात की, इस्रायली लष्कर आणि पोलीस वसाहतवाद्यांचे हल्ले रोखण्यात अपयशी ठरत आहेत. विशेषतः, इस्रायलच्या सरकारमध्येच अर्थमंत्री बेझलेल स्मोट्रिच आणि कॅबिनेट मंत्री इटामार बेन-ग्विर यांच्यासारख्या अति-उजव्या विचारसरणीच्या वसाहतवादी नेत्यांचा समावेश असल्याकडे ते बोट दाखवतात.
मंगळवारच्या घटनेत ४ इस्रायलींना अटक करण्यात आली, तर ४ पॅलेस्टिनी जखमी झाले. वसाहतवाद्यांनी चार दुधाचे ट्रक आणि शेतजमीन जाळल्याचा आरोप पॅलेस्टिनी अधिकाऱ्यांनी केला आहे. बीट लिडमधील एका पॅलेस्टिनी रहिवाशाने आपली भीती व्यक्त करताना म्हटले, "आम्ही आमचे संपूर्ण आयुष्य भीती आणि धोक्याच्या स्थितीत जगू शकत नाही".