बॉलिवूडचे स्टार जोडपे ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन यांनी त्यांच्या एआय-जनरेटेड डीपफेक व्हिडिओंप्रकरणी गुगल आणि त्याची व्हिडिओ-शेअरिंग साईट असलेल्या यूट्यूबवर खटला दाखल केला आहे. या प्रकरणी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली असून, ४ कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे. यासोबतच, अशा प्रकारची आक्षेपार्ह सामग्री तयार करणे आणि ती प्रसारित करण्यावर कायमची बंदी घालण्याची विनंतीही याचिकेत केली आहे.
बच्चन दाम्पत्याच्या म्हणण्यानुसार, यूट्यूबवर त्यांचे "अत्यंत आक्षेपार्ह", "लैंगिकदृष्ट्या स्पष्ट" आणि "काल्पनिक" एआय व्हिडिओ पसरवले जात आहेत. यामुळे त्यांची प्रतिमा मलिन होत आहे. त्यांनी दाखल केलेल्या दीड हजार पानांच्या याचिकेत अशा अनेक व्हिडिओंच्या लिंक्स आणि स्क्रीनशॉट्सचा पुरावा म्हणून समावेश केला आहे.
याचिकाकर्त्यांनी असाही युक्तिवाद केला आहे की, युट्यूबची धोरणे चिंताजनक आहेत. कारण या बनावट व्हिडिओंचा वापर इतर एआय मॉडेल्सना प्रशिक्षित करण्यासाठी केला जाऊ शकतो, ज्यामुळे भविष्यात अशा खोट्या माहितीचा आणि व्हिडिओंचा प्रसार अनेक पटींनी वाढण्याचा धोका आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने या प्रकरणी गुगलच्या वकिलांना १५ जानेवारीपर्यंत लेखी उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.