मलिक असगर हाशमी
भारतात सध्या 'आय लव्ह मुहम्मद' हे एक छोटेसे वाक्य एका मोठ्या वादाचे कारण बनले आहे. रस्त्यांवर गर्दी जमत आहे, गाड्यांवर स्टिकर लावले जात आहेत आणि भिंतींवर संदेश लिहिले जात आहेत. काही लोक यावरून असा काही गोंधळ घालत आहेत, जणू काही ही संघर्षाची घोषणाच आहे. घोषणाबाजी होत आहे, अटकसत्र सुरू आहे आणि वातावरण तणावपूर्ण होत चालले आहे. पण तुम्ही ज्या मुहम्मद पैगंबरांवर प्रेम करण्याचा दावा करत आहात, त्यांनी कधी आपल्या नावावर अशा गोंधळाला योग्य ठरवले होते का? हा खरा प्रश्न आहे. त्यांचे नाव द्वेष आणि संघर्षाचे प्रतीक आहे की शांती, दया आणि बंधुभावाचे?
प्रेषित मुहम्मद (स.) यांचे नाव घेणे ही एक जबाबदारी आहे; आपण त्यांच्या दाखवलेल्या मार्गावर चालू, हे एक वचन आहे. त्यांचा मार्ग संयमाचा, संवादाचा, माफीचा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माणुसकीचा होता. त्यांनीच मदिनेमध्ये ज्यू, ख्रिश्चन आणि वेगवेगळ्या टोळ्यांना एकत्र आणून सामायिक नागरिकत्व दिले. 'मदिना चार्टर'च्या माध्यमातून त्यांनी जगाला असे पहिले संविधान दिले, जे धार्मिक आणि सांस्कृतिक विविधतेचे खुल्या दिलाने स्वागत करते.
आज जे लोक ‘आय लव्ह मुहम्मद’च्या नाऱ्याच्या नावाखाली द्वेष पसरवत आहेत, त्यांना प्रेषितांच्या त्या साधेपणाची आणि सहिष्णुतेची आठवण का येत नाही? त्यांनी तर सर्व अडचणी असूनही ती स्वीकारली होती. कोणाच्या नावावर राग आणि तोडफोड करणे, ही प्रेम करण्याची पद्धत आहे का? प्रेमासाठी संयम लागतो, समजूतदारपणा हवा असतो आणि सर्वात जास्त सत्याची आस लागलेली असते.
जर खरोखरच मुहम्मद साहेबांवर प्रेम असेल, तर त्या प्रेमाचा सर्वात पहिला पुरावा हा असायला हवा की, आपण त्यांच्या शांती आणि सलोख्याच्या त्या संदेशाला स्वीकारावे. हाच संदेश आज 'मक्का चार्टर'च्या रूपात जगासमोर आहे. मक्का चार्टर हा केवळ एक दस्तऐवज नाही, तर ते एक नैतिक संविधान आहे. हा एक मानवी करार आहे, ज्याला १३९ देशांच्या इस्लामी नेत्यांनी आणि १३०० पेक्षा जास्त मुस्लिम विद्वानांनी मिळून मंजूर केले आहे. मे २०१९ मध्ये मक्केच्या पवित्र भूमीवर 'मुस्लिम वर्ल्ड लीग'ने आयोजित केलेल्या परिषदेत हा चार्टर सादर करण्यात आला. इस्लामचा खरा चेहरा उदारता, सहिष्णुता आणि माणुसकी हा आहे, याच विचारावर त्याचा पाया रचला गेला होता.
जगाला अतिरेकीवाद, दहशतवाद, सांप्रदायिक द्वेष आणि इस्लामोफोबिया यांसारख्या आजारांमधून बाहेर काढणे, हा मक्का चार्टरचा उद्देश आहे. कोणताही धर्म, वंश किंवा जातीला दुसऱ्यापेक्षा श्रेष्ठ मानता येणार नाही, असे यात नमूद करण्यात आले आहे. सर्व माणसे देवाच्या नजरेत समान आहेत आणि कोणतीही धार्मिक श्रेष्ठता केवळ नैतिकता आणि वागणुकीतून सिद्ध होते, नाव किंवा ओळखीने नाही.
धर्मांचा उद्देश संघर्ष नाही, तर सहकार्य आहे, असे मक्का चार्टर सांगतो. विविधता हे संघर्षाचे कारण नाही, तर संवादाचे माध्यम आहे. अनुयायांच्या चुकांवरून कोणत्याही धर्माला दोष लावता कामा नये. रागाच्या किंवा उत्साहाच्या भरात इस्लामच्या नावावर हिंसा किंवा द्वेष पसरवण्याचा कोणत्याही मुस्लिमाला अधिकार नाही.
‘आय लव्ह मुहम्मद’ म्हणण्याचा अर्थ हा नाही की आपण इतरांशी लढावे. याचा अर्थ हा आहे की आपण त्यांच्यासारखे बनण्याचा प्रयत्न करावा - माफ करणारे, प्रत्येक धर्माच्या लोकांसोबत न्यायाने वागणारे आणि मनापासून प्रेम करणारे. मुहम्मद साहेबांनी त्या लोकांनाही माफ केले होते, ज्यांनी त्यांच्यावर दगड फेकले होते. मग आज आपण त्यांच्या नावावर कोणाचा अपमान का करावा?
आज जेव्हा कोणी मुहम्मद साहेबांच्या नावावर रस्त्यावर उतरतो आणि द्वेष पसरवतो, तेव्हा तो केवळ देशाच्या कायद्याचेच उल्लंघन करत नाही, तर मुहम्मद साहेबांच्या शिकवणीचाही अपमान करतो. भारताचे संविधान सर्वांना धार्मिक स्वातंत्र्य देते. पण त्याचा अर्थ असा नाही की कोणी आपल्या धर्माच्या नावावर अशांतता पसरवेल किंवा इतरांच्या अधिकारांचे हनन करेल. प्रेमाच्या नावावर द्वेष पसरवणे, हा इस्लाम आणि प्रेषित मुहम्मद या दोघांच्याही विरोधातील सर्वात मोठा गुन्हा आहे.
मक्का चार्टर आजच्या जगासाठी एक महत्त्वाचे मार्गदर्शन आहे. तो सांगतो की, कशाप्रकारे धार्मिक श्रद्धा या राजकीय स्वार्थाचे साधन बनल्या आहेत. त्यांना योग्य दिशा देण्यासाठी इस्लामच्या खऱ्या मूल्यांना पुन्हा कसे जिवंत करावे लागेल, हेही तो सांगतो. सर्व देशांनी पर्यावरणाचे रक्षण केले पाहिजे, दहशतवादाविरोधात एकत्र आले पाहिजे, महिलांना आणि मुलांना सन्मान व अधिकार दिले पाहिजेत आणि धार्मिक स्थळांची पवित्रता जपली पाहिजे, असे हा चार्टर सांगतो.
या चार्टरच्या माध्यमातून मुस्लिमांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे की, ते केवळ उपदेश देऊ नयेत, तर व्यावहारिक पावले उचलावीत. शिक्षणाला प्रोत्साहन द्यावे, अतिरेकीवादाचा सामना करावा आणि इस्लामचे ते रूप सादर करावे, जे शांती, प्रेम आणि करुणेवर आधारित आहे.
जे लोक आज मुहम्मद साहेबांच्या नावावर रस्त्यावर गर्दी करत आहेत, त्यांनी मक्का चार्टर वाचला पाहिजे, समजून घेतला पाहिजे आणि आपल्या जीवनात उतरवला पाहिजे. त्यांना हे समजले पाहिजे की, प्रेषितांचे नाव केवळ नाऱ्यांमध्ये नाही, तर आपल्या आचरणात दिसले पाहिजे. आज मुस्लिमांची सर्वात मोठी जबाबदारी हीच आहे की, त्यांनी आपल्या प्रिय प्रेषितांच्या शिकवणी आपल्या वागण्यातून दाखवाव्यात. जेणेकरून जग स्वतःच म्हणेल, "खरोखर, हे मुहम्मद यांचे अनुयायी आहेत."
या चार्टरच्या माध्यमातून हे स्पष्ट करण्यात आले आहे की, वैयक्तिक स्वातंत्र्याला अराजकता बनू देता कामा नये. धार्मिक स्वातंत्र्याचा अर्थ असा नाही की कोणीही कोणत्याही पवित्र गोष्टीचा अपमान करेल किंवा इतरांच्या भावना दुखावेल. हा चार्टर प्रत्येक धर्माची, प्रत्येक जातीची आणि प्रत्येक संस्कृतीची प्रतिष्ठा जपण्याची वकिली करतो.
मक्का चार्टर हा एक जागतिक संदेश आहे. माणुसकी सर्वात श्रेष्ठ आहे आणि इस्लाम तिची सर्वात मोठी समर्थक शक्ती आहे, हेच तो सांगतो. हा दस्तऐवज केवळ मुस्लिमांनाच नाही, तर संपूर्ण जगाला एका अशा मार्गावर चालण्याचे आवाहन करतो, जिथे संवाद आहे, सामंजस्य आहे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हृदयांना जोडणारे प्रेम आहे.
जर "आय लव्ह मोहम्मद" म्हणायचे असेल, तर ते प्रेम या गोष्टीत असले पाहिजे की तुम्ही त्यांचे चारित्र्य स्वीकारावे. तुम्ही गरिबांना मदत करावी, तुम्ही शेजाऱ्यांची काळजी घ्यावी, तुम्ही मुलांना प्रेम द्यावे, तुम्ही महिलांचा आदर करावा आणि तुम्ही प्रत्येक धर्माच्या लोकांसोबत न्यायाने वागावे. हीच खरी प्रेषितांची परंपरा आहे.
मुहम्मद साहेबांनी आपल्याला लढण्यासाठी नाही, जोडण्यासाठी पाठवले आहे. त्यांनी कुराणच्या माध्यमातून वारंवार न्याय, सत्य, संयम आणि करुणेचा संदेश दिला आहे. जर आपण ही मूल्ये आपल्या जीवनात उतरवत नसू, तर आपण त्यांचे नाव वापरण्याचे अधिकारी नाही.
आजच्या जगात, जिथे धार्मिक ओळख राजकारणाचे साधन बनत चालली आहे, तिथे मक्का चार्टर एका प्रकाशाप्रमाणे समोर येतो. तो केवळ मुस्लिमांनाच नाही, तर संपूर्ण मानवतेला हे आठवण करून देतो की, आपले हेतू, आपले कर्म आणि आपले प्रेम जर खरे असेल, तर ते द्वेषाचे उत्तर प्रेमाने देतील, हिंसेचे उत्तर संयमाने देतील आणि खोटेपणाचा सामना सत्याने करतील.
तर पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही ‘आय लव्ह मोहम्मद’ म्हणाल, तेव्हा स्वतःला प्रामाणिकपणे विचारा, की मी खरोखरच मुहम्मद साहेबांच्या मार्गावर चालत आहे का? माझ्या प्रेमात त्यांच्या शिकवणीचा प्रकाश आहे का? माझे प्रेम मानवतेसाठी दिलासा बनत आहे की दुसऱ्यांसाठी त्रास? जर उत्तर 'हो' असेल, तर हे प्रेमही खरे आहे आणि त्याचा आवाजही जगाला ऐकू येईल. "ते मुहम्मद आहेत, ज्यांचे प्रेम तलवारीने नाही, तर शिकवणीने सिद्ध होते."
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -