डॉ. जफर डारिक कासमी
अल्लामा मुहम्मद इक्बाल यांच्या कवितेने जागृती, आत्म-साक्षात्कार आणि मातृभूमीवरील निष्ठेच्या संदेशाने संपूर्ण भारतीय उपखंडाला प्रेरणा दिली. विसाव्या शतकातील महान कवी, विचारवंत आणि सुधारकांमध्ये त्यांची गणना होते.
इक्बाल यांची काव्यदृष्टी बौद्धिक आणि आध्यात्मिक अशा दोन्ही पातळ्यांवरची होती. ही दृष्टी मानवतेला आत्म-जागरूकतेकडे, प्रतिष्ठेकडे आणि नैतिक उन्नतीकडे नेणारी होती. आपल्या कवितांमधून त्यांनी भारताची भूमी, संस्कृती, इतिहास, विविधता आणि नैतिक सौंदर्याबद्दलचा नितांत आदर व्यक्त केला.
त्यांची प्रसिद्ध कविता ‘तराना-ए-हिंदी’ (सारे जहाँ से अच्छा) ही मातृभूमीवरील प्रेमाची एक कालातीत अभिव्यक्ती आहे:
सारे जहाँ से अच्छा, हिंदोस्ताँ हमारा,
हम बुलबुलें हैं इस की, यह गुलिस्ताँ हमारा।
(भारत हा जगातील सर्वोत्तम देश आहे; आम्ही त्याचे बुलबुल आहोत, आणि ही आमची बाग आहे. — बांग-ए-दरा)
या ओळी इक्बाल यांचे त्यांच्या मातृभूमीशी असलेले भावनिक आणि आध्यात्मिक नाते दर्शवतात. त्यातून त्यांची एकता, बंधुत्व आणि राष्ट्रीय अभिमानाची भावना व्यक्त होते. त्यांच्या सुरुवातीच्या कविता भारताला त्यांच्या प्रेमाचे आणि अभिमानाचे केंद्र मानतात. ते भारताचा आत्मा, नैसर्गिक सौंदर्य आणि ऐतिहासिक वैभवाशी खोलवर जोडलेले होते. त्यांनी आपल्या कवितांमध्ये देशभक्तीची भावना ओतली.
इक्बाल यांचा विश्वास होता की, राष्ट्रीय ओळख ही वंश किंवा धर्मावर नव्हे, तर न्याय, बंधुत्व आणि नैतिक मूल्यांवर आधारित असली पाहिजे. त्यांची कविता ‘नया शिवाला’ (नवीन मंदिर) हा आदर्श सुंदरपणे प्रतिबिंबित करते:
मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना,
हिंदी हैं हम, वतन है हिंदोस्ताँ हमारा।
(धर्म आपल्याला आपापसात वैर ठेवायला शिकवत नाही. आपण भारतीय आहोत, आणि आपला देश हिंदुस्थान आहे. — बांग-ए-दरा, पृ. ९५)
हा शेर इक्बाल यांच्या भारतातील विविध समुदायांमधील सलोख्याच्या स्वप्नाचे प्रतीक आहे. त्यातून दिसते ती एकता आणि परस्पर आदराच्या माध्यमातून सामूहिक प्रगतीचा दृष्टीकोन.
इक्बाल हे मुस्लिम तत्त्वज्ञ असूनही, त्यांना भारताच्या प्राचीन आध्यात्मिक आणि तात्विक वारशाबद्दल नितांत आदर होता. त्यांनी वेदांत, बौद्ध धर्म आणि हिंदू तत्त्वज्ञानातील सखोल ज्ञानाचे कौतुक केले, त्यात त्यांना सत्याच्या शोधातील मानवतेचा सामायिक प्रयत्न दिसला. त्यांच्या ‘राम’ या कवितेत त्यांनी प्रभू रामांना आदरांजली वाहिली आणि त्यांना 'इमाम-ए-हिंद' (भारताचे आध्यात्मिक नेते) म्हटले:
है राम के वजूद पे हिंदोस्ताँ को नाज़,
अहल-ए-नज़र समझते हैं इस को इमाम-ए-हिंद।
(भारताला प्रभू रामाच्या अस्तित्वाचा अभिमान आहे; जाणकार लोक त्यांना भारताचे आध्यात्मिक नेते मानतात. — बांग-ए-दरा, पृ. २३१)
या ओळी इक्बाल यांचा विशाल दृष्टिकोन आणि भारताच्या नैतिक व आध्यात्मिक खोलीची त्यांना असलेली जाण अधोरेखित करतात.
इक्बाल यांच्या कवितेतून निसर्गाकडे पाहण्याची एका कलाकाराची दृष्टीही दिसून येते. त्यांनी भारतातील नद्या, पर्वत, झाडे आणि ऋतूंना जिवंत केले आणि त्यांना तात्विक अर्थाशी जोडले. ‘हिमालय’ सोबतच, त्यांची कविता ‘एक पहार और गुलेहरी’ (एक पर्वत आणि खार) निसर्गाच्या लहान तपशिलांमध्येही शहाणपण शोधण्याची त्यांची क्षमता दाखवते. अशा कृतींमधून त्यांची सौंदर्यदृष्टी आणि भारताच्या नैसर्गिक वैभवाबद्दलचा आदरच झळकतो.
इक्बाल यांनी भारताच्या बहुसांस्कृतिक वातावरणाचे, धार्मिक सहिष्णुतेचे आणि सांस्कृतिक सलोख्याचे कौतुक केले. त्यांच्या मते, भारताची खरी महानता तिच्या विविधतेत आणि परस्पर आदरात होती. त्यांच्या ‘हिमालय’ या कवितेत त्यांनी भारताच्या नैसर्गिक सौंदर्याचे आणि स्थिरतेचे प्रतीकात्मक वर्णन केले:
ऐ हिमाल! ऐ फसील-ए-किश्वर-ए-हिंदोस्ताँ,
चूमता है तेरी पेशानी को झुक कर आसमाँ।
(हे हिमालया! हे हिंदुस्थानच्या भूमीच्या किल्ल्या, आकाश वाकून तुझ्या कपाळाचे चुंबन घेते. — बांग-ए-दरा, पृ. १४)
इक्बाल यांच्यासाठी हिमालय केवळ नैसर्गिक भव्यतेचेच नव्हे, तर भारताची ताकद, स्थिरता आणि आध्यात्मिक भव्यतेचेही प्रतीक होता.
इक्बाल यांनी कवितेचा वापर नैतिक आणि बौद्धिक मार्गदर्शनाचे माध्यम म्हणून केला. त्यांनी भारतीयांना अज्ञान आणि गुलामगिरीतून वर उठून ज्ञान, आत्मनिर्भरता आणि नैतिक स्वातंत्र्याकडे जाण्याचे आवाहन केले. ‘खिज्र-ए-राह’मध्ये त्यांनी जोर दिला की, खरे स्वातंत्र्य केवळ राजकीय बदलावर नव्हे, तर ज्ञान, कृती आणि चारित्र्यावर अवलंबून असते. त्यांच्या कवितांनी भारतातील तरुणांमध्ये जागृती, धैर्य आणि जबाबदारीची भावना प्रेरित केली. त्यांचे हे विचार आजही तितकेच महत्त्वाचे आहेत.
त्यांनी आपल्या कवितेत भारताचा गौरवशाली भूतकाळही पुनरुज्जीवित केला. अशोक, प्रभू राम आणि महात्मा गांधी यांसारख्या व्यक्तींचा मानवता, न्याय आणि नैतिक शक्तीचे प्रतीक म्हणून सन्मान केला. ‘तराना-ए-हिंदी’ आणि ‘नया शिवाला’सारख्या त्यांच्या कविता भारताच्या ऐतिहासिक महानतेला एका अभिमानी, प्रबुद्ध राष्ट्राच्या दृष्टीशी जोडतात.
१९३० मध्ये आपल्या प्रसिद्ध 'अलाहाबाद भाषणा'दरम्यान इक्बाल यांनी घोषित केले की, भारताची महानता भौतिक प्रगतीत किंवा राजकीय सत्तेत नसून तिच्या आध्यात्मिक आणि बौद्धिक शक्तीमध्ये आहे - ती म्हणजे आपल्या लोकांना स्वतःला आणि देवाशी असलेले नाते समजून घेण्याची क्षमता. त्यांचा विश्वास होता की, जर भारतीयांनी नैतिकता, न्याय, ज्ञान आणि परस्पर आदराचा मार्ग अनुसरला तर देश पुन्हा एकदा विश्वगुरु बनू शकेल.
आपल्या भाषणांमध्ये इक्बाल नेहमी म्हणत की, भारताची खरी ताकद विविधतेतील एकतेत आहे. जरी लोक वेगवेगळ्या धर्मांचे, भाषांचे आणि संस्कृतींचे असले, तरी ते सामायिक आध्यात्मिक मूल्यांद्वारे एकत्र राहू शकतात, असा त्यांचा विश्वास होता. त्यांच्यासाठी, ही एकता भारताच्या महानतेचा सर्वात सुंदर आणि शक्तिशाली पैलू होती.
आपल्या व्याख्यानांमध्ये इक्बाल यांनी अध्यात्म, नैतिकता, ज्ञान आणि मानवता ही भारताच्या महानतेची खरी तत्त्वे अधोरेखित केली. त्यांनी प्रगती आणि एकतेचा संदेश दिला जो आजही संपूर्ण उपखंडासाठी तितकाच समर्पक आहे.
इक्बाल यांच्या विचारांमध्ये मानवी एकतेचा विषय वारंवार येतो. त्यांचा विश्वास होता की प्रेम, सहिष्णुता आणि परस्पर आदराच्या माध्यमातूनच भारताची महानता टिकून राहील. इक्बाल यांच्या मते धर्म हा मानवतेला जोडण्यासाठी होता, तोडण्यासाठी नाही. ते भारताकडे सलोख्याचे प्रतीक म्हणून पाहत होते.
इक्बाल यांच्या मते राष्ट्राची महानता त्याच्या भूगोलात नसून तेथील लोकांचे चारित्र्य, ज्ञान आणि ऐक्य यात असते. भारताचा चिरंतन गौरव हा विविधता आणि सहिष्णुतेवर अवलंबून आहे - हीच मूल्ये त्याला जगातील सर्वात उदात्त संस्कृतींपैकी एक बनवतात, याचीच आठवण त्यांची कविता आपल्याला सतत करून देते.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -