पश्चिम आशियातील भीषण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इराणने भारताचा ध्वज असलेल्या दोन द्रवरूप पेट्रोलियम गॅस (LPG) वाहक जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्याची परवानगी दिली आहे. 'रॉयटर्स'ने या प्रकरणाची थेट माहिती असलेल्या चार स्रोतांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. भारतासाठी जाणारी जहाजे या जागतिक ऊर्जा व्यापाराच्या अत्यंत महत्त्वाच्या मार्गावरून सुरक्षितपणे जाऊ शकतील, याची पुष्टी भारतातील इराणचे राजदूत मोहम्मद फताली यांनी केली आहे.
भारताकडे जाणारी जहाजे होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षितपणे जाऊ शकतील का, या प्रश्नावर उत्तर देताना फताली म्हणाले, "हो, कारण भारत आणि इराण मित्र आहेत. आपण भविष्याकडे पाहू शकता आणि मला वाटते दोन-तीन तासांनंतर याची प्रचिती येईल. कारण आमचा असा विश्वास आहे की इराण आणि भारत हे मित्र आहेत. आपले हितसंबंध सामायिक आहेत आणि आपले नशीबही एकमेकांशी जोडलेले आहे." त्यांनी दोन्ही देशांमधील परस्पर जबाबदारीवरही भर दिला. ते पुढे म्हणाले की, "भारतीय जनतेचे दुःख हे आमचे दुःख आहे आणि तसेच उलटही आहे. याच कारणास्तव भारत सरकार आम्हाला मदत करते आणि आम्ही भारत सरकारला मदत केली पाहिजे. आपले हित आणि भविष्य सामायिक आहे."
दरम्यान, 'रॉयटर्स'ने दोन स्रोत आणि 'लॉयड लिस्ट इंटेलिजन्स'च्या जहाज वाहतूक आकडेवारीचा दाखला देत म्हटले आहे की, सौदी अरेबियाचे तेल घेऊन जाणारे एक कच्चे तेलवाहू जहाज १ मार्चच्या सुमारास होर्मुझची सामुद्रधुनी पार करून शनिवारी भारतात पोहोचण्याची शक्यता आहे.
दुसरीकडे, इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी रशियन तेलाबाबतच्या भूमिकेवरून अमेरिकेवर टीका केली आहे. रशियन तेलाची आयात थांबवण्यासाठी पूर्वी दबाव आणणारे वॉशिंग्टन आता भारतासह इतर देशांना रशियन कच्चे तेल खरेदी करण्यासाठी "विनवणी" करत असल्याचे अराघची यांनी म्हटले आहे. त्यांनी 'X' वरील एका पोस्टमध्ये नमूद केले की, "रशियाकडून तेल आयात करणे थांबवण्यासाठी अमेरिकेने कित्येक महिने भारतावर दादागिरी केली. मात्र, इराणसोबतच्या दोन आठवड्यांच्या युद्धानंतर व्हाईट हाऊस आता भारतासह जगाला रशियन कच्चे तेल खरेदी करण्याची विनवणी करत आहे." अराघची यांनी इराणविरुद्धच्या "बेकायदेशीर युद्धाला" पाठिंबा देणाऱ्या युरोपियन देशांवरही टीका केली. "इराणवरील बेकायदेशीर युद्धाला पाठिंबा दिल्यास रशियाविरुद्ध अमेरिकेचा पाठिंबा मिळेल, असे युरोपला वाटले होते. हे अत्यंत खेदजनक आहे," असेही त्यांनी म्हटले आहे.