आवाज द व्हॉइस विशेष
मोहनदास करमचंद गांधी, भारताचे राष्ट्रपिता. त्यांचे संपूर्ण जीवन हे सत्याच्या शोधाची आणि अहिंसेच्या प्रयोगाची जणू एक गाथाच आहे. आणि या गाथेचा एक अविभाज्य आणि तितकाच महत्त्वाचा अध्याय म्हणजे हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी त्यांनी केलेले अथक प्रयत्न. आज समाजात धार्मिक विद्वेषाचे वातावरण वाढीस लागलेले असताना गांधीजींनी इस्लाम आणि प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या शिकवणीकडे कोणत्या नजरेने पाहिले, हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. याविषयीचा गांधीजींचा दृष्टीकोन केवळ राजकीय नव्हता, तर तो त्यांच्या आध्यात्मिक आणि मानवी मूल्यांचा पाया होता.
बालपणीच रुजलेली सलोख्याची मुळे
गांधीजींचा जन्म गुजरातच्या अशा एका किनारी भागात झाला, जिथे समुद्राच्या लाटांप्रमाणेच विविध संस्कृतींचे प्रवाहही येऊन मिळत. त्यांचे वडील उदारमतवादी वैष्णव परंपरेतील होते. त्यामुळे घरात जैन, पारशी आणि मुस्लिम मित्रांचे येणे-जाणे नेहमीच असे. लहानपणापासूनच त्यांना एका बहुधर्मीय वातावरणाचे बाळकडू मिळाले. समुद्रापलीकडील एका अज्ञात आणि साहसी जगाचे प्रतिनिधी म्हणून ते मुस्लिमांकडे पाहत. हीच सकारात्मक प्रतिमा त्यांच्या मनात कायम राहिली आणि पुढे त्यांच्या राजकीय वाटचालीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचा आधार बनली.
त्यांच्याच कुटुंबातील एक प्रसंग त्यांच्या विचारांची दिशा स्पष्ट करतो. गांधीजींच्या आजोबांचा एका स्थानिक शासकाशी वाद झाला होता. त्यावेळी मुस्लिम सैनिकांनीच त्यांच्या घराचे रक्षण केले आणि त्यात एका मुस्लिम सैनिकाला आपले प्राणही गमवावे लागले. त्या मुस्लिम सैनिकाचे स्मारक आजही त्यांच्या घराजवळच्या वैष्णव मंदिरात आहे. या घटनांनी गांधीजींच्या मनात मुस्लिम, जैन आणि पारशी हे आपले नैसर्गिक मित्र आणि सहकारी आहेत, ही भावना दृढ केली.
इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेत झाली इस्लामची नव्याने ओळख
लहानपणी मिळालेले संस्कार इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेतील अनुभवांमुळे अधिक पक्के झाले. इंग्लंडमध्ये कायद्याचे शिक्षण घेत असताना, त्यांना थॉमस कार्लाइल यांचे 'हीरोज, हीरो-वर्शिप' हे पुस्तक वाचायला मिळाले. त्यातील 'द हीरो ॲज प्रोफेट' हा प्रेषित मुहम्मद (स.) यांच्यावरील लेख वाचून ते खूप प्रभावित झाले. प्रेषितांचे धाडस, त्यांचे साधे आणि निस्वार्थ जीवन यांनी गांधीजींच्या मनावर खोलवर परिणाम केला.
पुढे दक्षिण आफ्रिकेत एका मुस्लिम व्यापारी फर्मचे वकील म्हणून काम करत असताना, त्यांना मुस्लिम समाजाला जवळून अनुभवण्याची संधी मिळाली. ते मुस्लिम व्यापाऱ्यांच्या घरात राहत, त्यांच्या सवयी, विचार आणि दृष्टीकोण, महत्वकांक्षा समजून घेत. ते म्हणतात, "२० वर्षे मी मुस्लिम मित्रांमध्ये राहिलो. त्यांनी मला आपल्या कुटुंबातील सदस्याप्रमाणे वागवले." दक्षिण आफ्रिकेत वंशभेदाविरोधात लढा देताना हिंदू आणि मुस्लिम दोघेही समान अत्याचाराचे बळी ठरले होते. या सामायिक संघर्षाने त्यांच्यातील बंधुत्वाची भावना अधिक घट्ट केली.
गांधीजींनी केला इस्लामचा अभ्यास
गांधीजी केवळ अनुभवावर थांबले नाहीत. त्यांनी इस्लामचा सखोल अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सेल यांचे कुराणचे भाषांतर वाचले, प्रेषितांची चरित्रे (सीरत) अभ्यासली आणि हदीसची पुस्तकेही वाचली. उर्दू भाषेवर प्रभुत्व मिळवून त्यांनी थेट उर्दूतील इस्लामिक साहित्य वाचायला सुरुवात केली. मौलाना अबुल कलाम आझाद, मुहम्मद अली जौहर यांसारख्या इस्लामिक विद्वानांशी आणि स्वातंत्र्यलढ्यातील सहकाऱ्यांशी त्यांनी सतत संवाद साधला आणि इस्लामचे तत्त्वज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न केला.
प्रेषितांच्या जीवनातील साधेपणा, त्यांचा आत्म-त्याग, दिलेले वचन पाळण्याची वृत्ती आणि ईश्वरावरील अतूट श्रद्धा आदि गोष्टींनी गांधीजी खूप प्रभावित झाले. ते म्हणाले होते, "जेव्हा मी प्रेषितांच्या चरित्राचा दुसरा खंड वाचून पूर्ण केला, तेव्हा मला दुःख झाले की त्यांच्या महान जीवनाबद्दल वाचायला माझ्यासाठी अधिक काही शिल्लक नाही." त्यांनी प्रेषितांच्या शिकवणीला 'मानवतेचा खजिना' म्हटले.
विचारांतून कृतीकडे नेणारी खिलाफत चळवळ
गांधीजींचे विचार केवळ पुस्तकांपुरते मर्यादित राहिले नाहीत. त्यांनी ते कृतीत उतरवले. त्याचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे 'खिलाफत चळवळ'. पहिल्या महायुद्धानंतर, तुर्कस्तानच्या खलिफाचे पद धोक्यात आल्याने भारतीय मुस्लिम अस्वस्थ झाले होते. गांधीजींनी त्यांच्या या धार्मिक भावनेचा आदर केला आणि खिलाफत चळवळीला काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा दिला. "आपल्या मुस्लिम बांधवांना त्यांच्या धार्मिक गरजेच्या वेळी मदत करणे, हे आपले कर्तव्य आहे," असे त्यांचे मत होते.
त्यांनी असहकार चळवळीला खिलाफत चळवळीशी जोडून हिंदू-मुस्लिम ऐक्याचे घडवलेले विराट दर्शन घडवले भारताच्या इतिहासात अभूतपूर्व होते. मौलाना मुहम्मद अली आणि शौकत अली या 'अली बंधूं'सोबत गांधीजी देशभरात फिरले. या काळात, "देश का बंधू चित्तरंजन, देश का शोभा गांधीजी, खुदा का प्यारा मुहम्मद अली" यांसारखी लोकगीते लोकांच्या तोंडी होती.
फाळणीच्या वेदना आणि महात्म्याचे बलिदान
खिलाफत चळवळीनंतरच्या काळात, काही राजकीय कारणांमुळे आणि मोहम्मद अली जिना यांच्या द्विराष्ट्र सिद्धांतामुळे, हिंदू-मुस्लिम संबंधात कटुता येत गेली. गांधीजींनी मात्र शेवटपर्यंत हिंदू-मुस्लीम ऐक्याचा पुरस्कार केला आणि फाळणीला विरोध केला. कारण त्यांच्यासाठी ही केवळ जमिनीची फाळणी नव्हती, तर ती दोन हृदयांची फाळणी होती.
स्वातंत्र्य आले, पण रक्ताच्या थारोळ्यात. नोआखली आणि बिहारमधील दंगलींनी गांधीजींना आतून हादरवून सोडले. ऐंशीच्या उंबरठ्यावर असलेला वृद्ध, वैर आणि संघर्ष संपवून शांतता आणि सदिच्छा प्रस्थापित करण्यासाठी पायी फिरत होता. मुस्लिमांच्या अत्याचाराने त्रस्त झालेल्या हिंदूंना धीर देण्यासाठी ते नोआखलीला गेले, तर हिंदूंनी केलेल्या अत्याचाराने त्रस्त झालेल्या मुस्लिमांचे अश्रू पुसण्यासाठी ते पाटण्याला गेले.
गांधीजींच्या प्रार्थना सभांमध्ये गीता, कुराण, बायबल आणि गुरु ग्रंथ साहिब या सर्वांचे पठण होत असे. पण त्यांचा हा सर्वधर्मसमभावाचा संदेश काही कट्टरपंथीयांना सहन झाला नाही. आणि ३० जानेवारी १९४८ रोजी, प्रार्थनेला जात असतानाच नथुराम गोडसे नावाच्या एका विवेकशून्य माथेफिरूने त्यांची हत्या केली.
गांधीजींच्या एकात्मतेच्या विचारांची आजच्या काळातील प्रासंगिकता
गांधीजींचा मृत्यू झाला खरा, पण त्यांचे विचार आजही तितकेच जिवंत आहेत. आज पुन्हा एकदा धर्माच्या नावावर द्वेष पसरवला जात असताना गांधीजींचे जीवन आणि कार्य आपल्याला त्यांच्या स्वप्नातील 'रामराज्या'ची आठवण करून देते. ज्यामध्ये प्रत्येक धर्मीयाला पूर्ण स्वातंत्र्य आणि समानता असेल.
गांधी म्हणायचे, "केवळ सहन करण्यापुरते नव्हे, तर स्वतःच्या धर्माप्रमाणे आपण इतर धर्मांचा आदर करायला शिकत नाही, तोपर्यंत पृथ्वीवर चिरस्थायी शांतता नांदणार नाही." आज गांधीजयंतीच्या दिवशी आपण सर्वांनी त्यांच्या याच विचाराचे स्मरण करून समाजात प्रेम, सलोखा आणि बंधुभाव वाढवण्याचा संकल्प करणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.