भारतीय मुस्लिमांच्या देशप्रेमावर आणि राष्ट्रनिष्ठेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्यांना सणसणीत चपराक देत, भारतीय मुत्सद्दी मोहम्मद हुसेन यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत (UNHRC) पाकिस्तानला खडे बोल सुनावले आहेत. "ज्या देशाचा मानवाधिकाराचा रेकॉर्ड जगातील सर्वात वाईट आहे, त्यांनी इतरांना उपदेश देण्याचा प्रयत्न करणे हे अत्यंत हास्यास्पद आहे," अशा शब्दात हुसेन यांनी पाकिस्तानचा ढोंगीपणा जगासमोर आणला.
जिनिव्हा येथे सुरू असलेल्या मानवाधिकार परिषदेच्या ६०व्या सत्रात, भारताचे प्रतिनिधित्व करताना मोहम्मद हुसेन यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, "पाकिस्तान या मंचाचा गैरवापर करून भारताविरुद्ध खोटेनाटे आरोप करत आहे, ज्यामुळे केवळ त्यांचा ढोंगीपणा उघड होतो. त्यांनी भारताविरुद्ध अपप्रचार करण्याऐवजी, आपल्याच देशातील धार्मिक आणि वांशिक अल्पसंख्याकांवर होणाऱ्या सरकारी अत्याचाराकडे आणि भेदभावाकडे लक्ष द्यावे."
विशेष म्हणजे, ज्यावेळी पाकिस्तानचे प्रतिनिधी अब्बास सरवर यांनी भारताविरुद्ध काश्मीरच्या मुद्द्यावर आरोप केले, त्याचवेळी पाकव्याप्त काश्मीरमध्ये (PoJK) पाकिस्तान सरकारच्या दडपशाहीविरोधात तीव्र आंदोलन पेटले होते. युनायटेड काश्मीर पीपल्स नॅशनल पार्टीचे (UKPNP) प्रवक्ते नासिर अझीझ खान यांनी परिषदेतच पाकिस्तानच्या अत्याचारांची माहिती दिली. त्यांनी सांगितले की, २९ सप्टेंबर रोजी पाकव्याप्त काश्मीरमध्ये संपूर्ण बंद आणि 'व्हील-जॅम' आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला दडपण्यासाठी इस्लामाबादने रेंजर्स तैनात केले, इंटरनेट सेवा बंद केली आणि संचारबंदी लादली.
पाकव्याप्त काश्मीरची राजधानी मुझफ्फराबादमध्ये स्वस्त वीज, अनुदानित गहू आणि चांगल्या आरोग्य सुविधांच्या मागणीसाठी अनेक दिवसांपासून निदर्शने सुरू आहेत. या शांततापूर्ण आंदोलनाला हिंसक वळण लागून आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला असून, २२ हून अधिक जण जखमी झाले आहेत.
एकीकडे आपल्याच ताब्यातील काश्मीरमध्ये लोकांवर अत्याचार करायचे आणि दुसरीकडे भारतावर खोटे आरोप करायचे, या पाकिस्तानच्या दुटप्पी भूमिकेचे वस्त्रहरण मोहम्मद हुसेन यांनी आपल्या प्रभावी युक्तिवादाने केले. एका भारतीय मुस्लिमानेच भारताची बाजू इतक्या ठामपणे मांडल्याने, आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तान तोंडावर आपटले आहे.