लादेनने सौदी-अमेरिका मैत्रीत विष कालवले - सौदी राजपुत्र

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमवेत सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमवेत सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान

 

मंगळवारी व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान, सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी ९/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा ठपका ओसामा बिन लादेनवर ठेवला. लादेनने सौदी-अमेरिका संबंध ताणण्यासाठीच हे कृत्य केले, असे त्यांनी सांगितले.

एका अमेरिकन पत्रकाराने 'वॉशिंग्टन पोस्ट'चे स्तंभलेखक जमाल खशोगी यांच्या हत्येबाबत राजपुत्रांना प्रश्न विचारला. तसेच, ९/११ हल्ल्यातील पीडितांचे कुटुंबीय या भेटीमुळे 'संतापले' असल्याचेही त्या पत्रकाराने म्हटले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे आरोप फेटाळून लावले. त्यांनी ABC वाहिनीच्या प्रतिनिधीला पाहुण्यांना पेचात पाडल्याबद्दल  चांगलेच फटकारले.

क्राउन प्रिन्स यांनी खशोगी यांच्या हत्येवर जास्त बोलणे टाळले. तरीही ते म्हणाले, "अमेरिकेतील ९/११ च्या पीडित कुटुंबांबद्दल मला दुःख वाटते. पण तुम्हाला माहित आहे, आपण वास्तवावर लक्ष केंद्रित केले पाहिजे."

ते पुढे म्हणाले, "ओसामा बिन लादेनने त्या घटनेत सौदी लोकांचा वापर एकाच मुख्य उद्देशासाठी केला. तो उद्देश म्हणजे हे नाते नष्ट करणे. अमेरिका आणि सौदीचे संबंध संपवणे हाच त्याचा हेतू होता."

क्राउन प्रिन्स असेही म्हणाले की, जो कोणी लादेनचे हे नॅरेटिव्ह स्वीकारतो, तो बिन लादेनच्या उद्देशाला मदत करत आहे. त्यामुळे, 'जगाची सुरक्षा' आणि 'पर्यटन' वाढवण्यासाठी, ९/११ च्या मास्टरमाइंडला चुकीचे सिद्ध करणे आवश्यक आहे.

खशोगी यांच्याबद्दल ते नंतर म्हणाले, "पत्रकाराबद्दल सांगायचे तर, कोणत्याही खऱ्या कारणाशिवाय एखाद्याचा जीव जाणे हे ऐकणे खरोखरच वेदनादायी आहे."

क्राउन प्रिन्स म्हणाले, "आम्ही सौदी अरेबियामध्ये तपासाच्या बाबतीत सर्व योग्य पावले उचलली आहेत. पुन्हा असे काहीही घडू नये, याची खात्री करण्यासाठी आम्ही आमची यंत्रणा सुधारली आहे."

"हे वेदनादायी आहे आणि ती एक मोठी चूक होती. असे पुन्हा कधीही होणार नाही यासाठी आम्ही आमचे सर्वोत्तम प्रयत्न करत आहोत," असेही त्यांनी स्पष्ट केले.

ट्रम्प यांनी मंगळवारी हे देखील जाहीर केले की, सौदी अरेबियाने अमेरिकेत ६०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यास सहमती दर्शवली आहे. तसेच, सौदीच्या राजपुत्राने ही गुंतवणूक १ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत (एक लाख कोटी डॉलर्स) वाढवण्याचे आश्वासन दिले आहे.

सौदीचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांचा उल्लेख करत ट्रम्प म्हणाले, "तुम्ही अमेरिकेत ६०० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यास सहमती दर्शवली आहे, त्याबद्दल मी तुमचे आभार मानू इच्छितो. आणि ते माझे मित्र असल्यामुळे, ते ही रक्कम १ ट्रिलियनपर्यंत नेऊ शकतात, पण मला त्यांच्यावर (त्यासाठी) काम करावे लागेल."