शारिक अदीब अन्सारी
नव्वदच्या दशकात जेव्हा हुंडा आणि लग्नातील बडेजाव म्हणजे प्रतिष्ठेचे लक्षण मानले जाई, तेव्हा माझे वडील मरहूम अब्दुल मजीद अदीब अन्सारी यांनी एका जुन्या आणि वाईट प्रथेला हात घातला होता. आजही दुर्दैवाने समाजात पैशांवरूनच माणसाची किंमत ठरवली जाते. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद भागात त्यांनी पसमांदा मुस्लिम समाजातील हुंडा, अफाट खर्चिक लग्ने आणि गरिबांची होणारी आर्थिक ओढाताण यांविरुद्ध एक मोहीम उभी केली होती. हा केवळ हौसेपोटी दिलेला नारा नव्हता, तर समाजाला सुधारावे या तळमळीतून उचललेले ते एक पाऊल होते.
त्यांचा उद्देश समाज उलथवून लावणे हा नव्हता, तर तो सुधारावा असा होता. निकाहला पुन्हा त्या जुन्या पवित्र आणि साध्या स्वरूपात आणायचे होते, जिथे लग्न म्हणजे केवळ एक जबाबदारी आणि दोघांमधील समानतेचा करार असेल. तिथे लग्नाचा बाजार भरू नये, लेकीचे लग्न म्हणजे बापाच्या डोक्यावर कर्जाचे ओझे असू नये. लग्न हा आनंदाचा सोहळा असावा, भीतीचा नाही.
मुळात इस्लाममध्ये मुलीच्या घरच्यांकडे संपत्ती किंवा भेटवस्तूंची मागणी करणे हे चुकीचे मानले आहे. याउलट, वराने वधूला 'महर' देऊन तिचा सन्मान करावा, असे धर्म सांगतो. प्रेषित मोहम्मद (स.) यांनी नेहमीच साध्या लग्नांचा पुरस्कार केला. "सर्वात उत्तम निकाह तोच, जो अत्यंत साधा आणि कोणालाही न सोसणारा असेल," असे त्यांनी शिकवले.
समाजातील गरिबांनी या विचाराचे लगेच स्वागत केले. त्यांच्यासाठी ही केवळ चर्चा नव्हती, तर जगण्यातील एक मोठा आधार होता. ज्या कुटुंबांसाठी मुलीचे लग्न म्हणजे अपमान आणि आयुष्यभराचे कर्ज असे समीकरण बनले होते, त्यांना या मार्गामुळे सन्मान मिळाला. गरिबांच्या रोजच्या जगण्यातील वेदनेला या मोहिमेने हात घातल्यामुळे ती यशस्वी झाली.
मात्र, ही सुधारणेची गाडी जेव्हा श्रीमंतांच्या दारात पोहोचली, तेव्हा ती तिथेच अडकली. ज्यांच्याकडे पैसा आणि सत्ता होती, ते व्यासपीठावर सुधारणेच्या गप्पा मारू लागले. पण जेव्हा त्यांच्या स्वतःच्या थाटामाटाचा आणि प्रदर्शनाचा प्रश्न आला, तेव्हा त्यांनी लगेच काखा वर केल्या. सुधारणेचे नियम केवळ इतरांसाठी असावेत, स्वतःसाठी नको, अशी त्यांची वागणूक होती. ही मोहीम विचारांच्या कमकुवतपणामुळे नाही, तर श्रीमंतांच्या नैतिक हिमतीच्या अभावामुळे मागे पडली.
काळ बदलला, पिढ्या बदलल्या, पण भारतीय समाजात लग्नाचे स्वरूप अजूनही 'श्रीमंतीचे प्रदर्शन' असेच राहिले आहे. पाहुणचार आणि कुटुंबाची इज्जत या नावाखाली लग्नाचे मोठे सोहळे आजही केले जातात. भारतीय मुस्लिम समाजात आजही 'जहेज' म्हणजेच हुंडा देण्याची प्रथा लपून-छपून सुरूच आहे. ती आनंदाने दिली जाते असे भासवले जात असले, तरी प्रत्यक्षात तो मुलीच्या बापावर असलेला मोठा दबाव असतो. हे धर्माच्या मूळ शिकवणीच्या पूर्णपणे विरोधात आहे.
नुकतीच दिल्लीच्या इंडिया इस्लामिक कल्चरल सेंटरमध्ये 'जमात-उल-कुरेश'ने एक बैठक घेतली होती. यात हुंडा बंद करणे आणि साधी लग्ने करण्यावर मोठी भाषणे झाली. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना वाळीत टाकण्याचे ठरावही झाले. असे वाटले की, आता समाज खऱ्या अर्थाने सुधारेल. पण बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात, हेच इतिहासाने पुन्हा दाखवून दिले.
याच बैठकीनंतर, जमात-उल-कुरेशच्या अध्यक्षांनी मला त्यांच्या पुतण्याच्या लग्नाचे निमंत्रण दिले. मी त्या सोहळ्याला जाऊ शकलो नाही, पण नंतर त्या लग्नाबद्दल जे ऐकले ते अस्वस्थ करणारे होते. ज्या नेत्यांच्या साक्षीने साध्या लग्नाची शपथ घेतली गेली, ते सर्वजण या शाही सोहळ्यात मिरवत होते. ज्या जागेत बसून उधळपट्टीचा निषेध केला, त्याच जागी तोच थाटमाट आणि श्रीमंतीचे प्रदर्शन पाहायला मिळाले.
हा केवळ विरोधाभास नाही, तर हा उघडउघड दुटप्पीपणा आहे. आपण गरिबांना साधेपणाचे डोस पाजतो आणि श्रीमंतांच्या चुकांकडे डोळेझाक करतो. नैतिकतेचे ओझे नेहमी दुर्बलांच्या खांद्यावर दिले जाते आणि सत्तेसमोर आपण गप्प बसतो. अशा वागण्यामुळे कोणत्याही सुधारणेची विश्वासार्हता संपते. जे नेतृत्व आपल्या स्वतःच्या आयुष्यात स्वतःच्याच तत्त्वांचे पालन करू शकत नाही, ते नेतृत्व नसून केवळ एक 'दिखावा' आहे.
जर आपल्याला खरोखर साधेपणा आणि मूल्यांची चाड असेल, तर लग्नाची पद्धतच मुळापासून बदलावी लागेल. साधा निकाह, मोजक्या लोकांचे जेवण आणि हुंड्याचा पूर्ण त्याग करणे आवश्यक आहे. लग्नात वाचवलेला पैसा लेकीच्या भविष्यासाठी किंवा समाजातील शिक्षण आणि आरोग्यासाठी वापरला पाहिजे. तरच भाषणांचे रूपांतर कृतीत होईल.
याउलट, मुंबईच्या वांद्रे भागात अमरोहा कुरेशी समाजाने आयोजित केलेले सामूहिक विवाह एक आदर्श उदाहरण आहे. तिथे कोणतेही मोठे स्टेज नव्हते किंवा पैशांचे प्रदर्शन नव्हते, तिथे होती केवळ समानता आणि जबाबदारीची जाणीव.
खरा प्रश्न हा नाही की हुंडा किंवा उधळपट्टी चुकीची आहे का? हे आपल्याला आधीच माहीत आहे. खरा प्रश्न हा आहे की, सत्याच्या बाजूने उभे राहण्यासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करण्याची आपली हिंमत आहे का? जोपर्यंत आपण ही हिंमत दाखवत नाही, तोपर्यंत आपले ठराव कागदावरच राहतील आणि समाज सुधारणेचे दावे पोकळ ठरतील. खरी सुधारणा तिथूनच सुरू होते, जिथे आपण इतरांना सांगतो तोच नियम स्वतःलाही लागू करतो.
(लेखक 'ऑल इंडिया पसमांदा मुस्लिम महाज'चे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत.)
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -