भक्ती चाळक
प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि सामाजिक कार्यकर्ते हुसैन मन्सुरी यांनी पुन्हा एकदा आपल्या कृतीतून समाजासमोर आदर्श ठेवला आहे. त्यांनी नुकतीच पुण्यातील 'प्रेरणा असोसियशन्स फॉर द ब्लाईंड्स' या संस्थेतील काही अंध व्यक्तींची भेट घेतली. या भेटीदरम्यान त्यांनी दाखवलेली आपुलकी आणि प्रेम पाहून अनेकांची मने भरून आले.
हुसैन मन्सुरी यांच्या कामाचा चाहतावर्ग मोठा आहे. त्यांच्या याच कामाला पाहून पुण्यात शिक्षण घेणारा आशीष गोरथकर कर हा तरुण आपल्या चार मित्रांसह त्यांना भेटण्यासाठी मुंबईत आला होता. या भेटीचा अनुभव आशीषने 'आवाज-द-व्हॉईस मराठी'ला प्रतिक्रिया देताना अत्यंत भावूक शब्दांत मांडला आहे.
आशीष तुकाराम गोरथकर हा मूळचा नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील टेंभुर्णी गावचा रहिवासी आहे. तो सध्या पुण्यातील एसपी कॉलेजमध्ये दुसऱ्या वर्षाला शिकत आहे. आशीष आपल्या भेटीचा अनुभव सांगताना म्हणाला, "आम्ही एकूण ५ जण कामानिमित्त मुंबईला गेलो होतो. तसेच आम्हाला हुसैन सरांना देखील भेटायचे होते. मुंबईला पोहोचल्यावर आम्ही वेटिंग हॉलमध्ये थांबलो होतो. तिथूनच आम्ही हुसैन सरांना फोन लावला. विशेष म्हणजे, फोन केल्यावर अवघ्या २-३ मिनिटांत सर आम्हाला भेटायला तिथे पोहोचले."
आग्रहाने खाऊ घातले
हुसैन मन्सुरी तिथे पोहोचले आणि त्यांनी सर्वांची आस्थेने चौकशी केली. आशीष म्हणाला, "सर आल्यावर त्यांनी सर्वात आधी आपुलकीने आमची चौकशी केली. आम्ही खास त्यांना भेटायला गेलो असल्याने त्यांना फार आनंद झाला. भेटीनंतर काही वेळातच मन्सुरी सरांनी आमच्या जेवणाची व्यवस्था केली. आमचे जेवण झाले असल्याचे आम्ही त्यांना सांगितले, तरीही त्यांनी आम्हाला जेवण करण्याचा आग्रह धरला. त्यांनी प्रेमाने आमच्यासाठी जेवण मागवले आणि आम्हाला खाऊ देखील घातले."
संवादादरम्यान हुसैन मन्सुरी यांनी सर्वांच्या अडचणी समजून घेतल्या. त्यांनी आशीष आणि त्यांच्या मित्रांशी त्यांनी मनमोकळा संवाद साधला. आशीष काय करतो, त्याचे शिक्षण काय सुरू आहे, याची माहिती घेतली. याबद्दल आशीष सांगतो, "आमच्यामध्ये खूप चांगला संवाद झाला. ते एकदम मोकळेपणाने बोलत होते. जाताना त्यांनी आम्हा ५ जणांना काही आर्थिक मदत केली. इतकेच नाही तर आम्हाला पुढे अंधेरीला जायचे होते, तर त्यांनी आम्हाला दादर स्टेशनवर नेले आणि स्वतः ट्रेनमध्ये बसवून दिले. आणि शेवटी 'मी तुमच्या मोठ्या भावासारखा आहे' असे आपुलकीने सांगितले. "
रील नव्हे तर रिअल हिरो...
सोशल मीडियाच्या जमान्यात 'इन्फ्लुएन्सर' अनेकजण असतात, पण 'इम्पॅक्ट' घडवणाऱ्यांपैकी हुसैन मन्सुरी हे एक. मुंबईच्या रस्त्यांवर परोपकारी वृत्तीने वावरणाऱ्या हुसैन यांची ओळख आज देशभरात पोहोचली आहे. एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या हुसैन वेटरची नोकरी करून आणि कष्टाने त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. परिस्थितीची जाण ठेवत ते जात, धर्म आणि पंथाच्या पलीकडे जाऊन माणुसकीच्या नात्याने सेवा करतात.
टाटा मेमोरियल हॉस्पिटलमधील कर्करोगग्रस्त रुग्णांना आर्थिक मदत करणे असो, किंवा रस्त्यावर बेवारस पडलेल्या देवतांच्या फोटोज सन्मानाने विसर्जित करून धार्मिक एकतेचा संदेश देणे असो, हुसैन यांच्या प्रत्येक कृतीत संवेदनशीलता दिसते. कोविड काळात त्यांनी केलेले अन्नदान आणि वैद्यकीय मदत आजही अनेकांच्या स्मरणात आहे. सोशल मीडियावर १ कोटींहून अधिक लोक त्यांच्याशी जोडले गेले आहेत, ते फक्त मनोरंजनासाठी नव्हे, तर त्यांच्या विचारांमुळे. भविष्यात स्वतःची सेवाभावी संस्था उभारून कर्करोग रुग्ण आणि गरीब मुलांच्या शिक्षणासाठी व्यापक काम करण्याचा त्यांचा मानस आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -