बेंगळुरू येथील सिटी मार्केट जामिया मशिदीचे मुख्य इमाम आणि जामिया-उल-उलूम अरेबिक कॉलेजचे मुख्य प्राचार्य मकसूद इम्रान रशादी
बेंगळुरू
लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी जुनैद अहमद याच्या ठावठिकाण्याबद्दल माहिती देणाऱ्यास राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) ५ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर, बेंगळुरू येथील सिटी मार्केट जामिया मशिदीचे मुख्य इमाम आणि जामिया-उल-उलूम अरेबिक कॉलेजचे मुख्य प्राचार्य मकसूद इम्रान रशादी यांनी समाजाने बक्षीसाची अपेक्षा न ठेवता, फरार दहशतवाद्याची माहिती देऊन राष्ट्रसेवा करावी, असे आवाहन केले आहे.
इंडिअन एक्स्प्रेससोबत बोलताना इमाम म्हणाले की, "इस्लाम धर्म कधीही दहशतवादी कृत्ये किंवा निरपराध लोकांच्या हत्येचे समर्थन करत नाही. एनआयएने फरार आरोपीबद्दल माहिती देणाऱ्यास ५ लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले असले, तरी समाजाने बक्षीसाकडे पाहू नये. अशा व्यक्तींना पकडून देऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुनिश्चित करणे हीच खरी देशसेवा ठरेल."
ते पुढे म्हणाले की, "मी राज्यातील सर्व मशिदींमध्ये ही माहिती पोहोचवणार आहे. जुनैद अहमद किंवा समाजासाठी घातक असलेल्या अशा व्यक्ती कोणाच्याही निदर्शनास आल्यास, त्याबद्दल तातडीने माहिती देण्यास सांगितले जाईल."
'देशाशी एकनिष्ठ राहणे नागरिकाचे प्राथमिक कर्तव्य'
इमाम पुढे म्हणाले की, "एकट्या बेंगळुरूमध्ये सुमारे ८०० आणि संपूर्ण कर्नाटक राज्यात २,००० पेक्षा जास्त मशिदी आहेत. एनआयएने प्रसारित केलेल्या पोस्टर्सच्या आधारे जुनैदचा शोध घेण्याचे आवाहन या मशिदींमधून केले जाईल. देशाशी एकनिष्ठ राहणे हे प्रत्येक नागरिकाचे प्राथमिक कर्तव्य आहे. कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या किंवा दहशतवादी कृत्यांमध्ये सहभागी असलेल्या कोणाबद्दलही अधिकाऱ्यांना माहिती द्यावी, असे आवाहन समाजाला केले जाईल."