रमजान अनुभवण्यासाठी भारतातील 'ही' सर्वोत्तम ठिकाणे

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 3 h ago
हैदराबादी चारमिनारच्या नाईट बाजारातील दृश्य
हैदराबादी चारमिनारच्या नाईट बाजारातील दृश्य

 

रमजान हा वर्षातील असा काळ आहे जेव्हा जगभरातील मुस्लिम समाज उपवास, प्रार्थना, भक्ती, आत्मचिंतन आणि दानधर्म करतात. गजबजलेल्या बाजारपेठा, मस्जिदींवरची रोषणाई आणि इफ्तारच्या वेळी सजलेली खाद्यपदार्थांची दुकाने यामुळे शहराला चार चांद लागतात. भारतात या संपूर्ण महिन्यात एक समृद्ध सांस्कृतिक दृश्य पाहायला मिळते. प्रत्येक शहर हा सण आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करते. गजबजलेली स्ट्रीट फूड संस्कृती आणि मस्जिदींमधील विशाल जनसमुदाय अशा वातावरणात रमजानचा अनुभव घेण्यासाठी भारतातील काही सर्वोत्तम ठिकाणांची माहिती घेऊया. 

जुनी दिल्ली, दिल्ली
 

रमजानच्या उत्सवाचा विचार करताना जुनी दिल्ली वगळणे अशक्य आहे. भारताच्या इस्लामिक वारशाचे केंद्र असलेले हे ठिकाण रमजानमध्ये पाहण्यासारखे असते. दरवर्षी या पवित्र महिन्यातील इथला उत्साह सांस्कृतिक घटकांमुळे पर्यटकांना आश्चर्यचकित करते. तरावीहच्या प्रार्थनेसाठी देशातील सर्वात मोठ्या मस्जिदींपैकी एक असलेल्या जामा मस्जिदीत हजारो लोक जमतात. रात्रीच्या वेळी चांदनी चौकच्या गल्ल्या कबाब, बिर्याणी, निहारी आणि फिरणीसारख्या गोड पदार्थांमुळे खवय्यांसाठी नंदनवन बनतात. याशिवाय इथल्या रात्रीच्या बाजारपेठांमधून पर्यटक पारंपारिक कपडे, अत्तर आणि प्रार्थनेसाठी लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करू शकतात.

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), महाराष्ट्र
 

ऐतिहासिक महत्त्वामुळे या शहरात रमजानचा अनुभव वैशिष्ट्यपूर्ण असतो. व्यापारासाठी प्रसिद्ध असलेल्या ऐतिहासिक पठाण गेट परिसरात रात्रीचा रमजान बाजार भरतो. येथे हलीम आणि निहारीसारखे पारंपारिक हैदराबादी व मुघलाई पदार्थ मिळतात. संपूर्ण महिनाभर शहरात एखाद्या महोत्सवासारखे वातावरण असते. येथील रस्ते सायंकाळच्या वेळी सरबत, शेवया आणि खजुरासारख्या खास पदार्थांनी सजलेले असतात.

भोपाळ, मध्य प्रदेश
 

अफगाण आणि मुघल वास्तुकलेचा प्रभाव असलेल्या भोपाळच्या जुन्या शहरात रमजानचा एक वेगळाच अनुभव येतो. स्थानिक परंपरेनुसार याठिकाणी इफ्तार सफा आयोजित केला जातो. यात लांब कापड पसरून त्यावर इफ्तारचे विविध पदार्थ वाढले जातात. यामुळे बंधुभाव आणि एकतेची भावना वाढीस लागते. केवळ या महिन्यात बनवले जाणारे भोपाळी पुलाव आणि शाम्मी कबाब उत्सवाचा आनंद द्विगुणित करतात.

जुनागड, गुजरात
 

गुजरातमधील जुनागड येथे रमजानच्या उत्सवात स्थानिक सुफी परंपरांची झलक पाहायला मिळते. तरावीहच्या प्रार्थनेनंतर शहरातील दर्ग्यांमध्ये कव्वालीचे कार्यक्रम रंगतात. या कार्यक्रमांना हजारो लोक हजेरी लावतात. यामुळे आध्यात्मिक वातावरण अधिक प्रसन्न होते. संतांच्या सन्मानार्थ अन्नदान करण्याची न्याज ही स्थानिक प्रथा येथील दीर्घकालीन आध्यात्मिक परंपरांचे दर्शन घडवते.

रमजानच्या रात्री अहमदाबादचे जुने शहर, विशेषतः जामा मशीद परिसरात चैतन्य पसरते. तीन दरवाजा आणि माणेक चौक येथील इफ्तार विक्रेते गुजराती चवीचे कबाब आणि मटण समोसे विकण्यासाठी प्रसिद्ध आहेत. प्राचीन मशिदी आणि इंडो-इस्लामिक वास्तुकलेचे नमुने शहराचे आध्यात्मिक आकर्षण वाढवतात.

मालेरकोटला, पंजाब
 

पंजाबमधील एकमेव मुस्लिम बहुसंख्य शहर असलेल्या मालेरकोटलामध्ये इस्लामिक आणि पंजाबी संस्कृतीचा सुंदर संगम दिसतो. जातीय सलोख्याचे प्रतीक म्हणून 'सांझी इफ्तार' विधी अंतर्गत विविध समुदायांचे लोक एकत्र येऊन उपवास सोडतात. शीख आणि हिंदू मंदिरांचे प्रमुख त्यांच्या मुस्लिम शेजाऱ्यांना इफ्तारसाठी आमंत्रित करतात. गोड शेवया आणि 'भुट्टेया दा कबाब' (मक्याचे कबाब) ही येथील खाद्यसंस्कृतीची खास वैशिष्ट्ये आहेत.

कटक, ओडिशा
 

कटक येथील रमजान उत्सवात 'कदम-ए-रसूल' दर्गा आकर्षणाचे केंद्र असतो. रमजानच्या १७ व्या दिवशी बदरच्या युद्धाच्या स्मरणार्थ 'जुलूस-ए-मोहम्मदी' मिरवणूक काढली जाते. ही एक वैशिष्ट्यपूर्ण ऐतिहासिक परंपरा आहे. येथील प्रसिद्ध 'दही वडा आलू दम'चे स्टॉल्स रमजानच्या रात्री उशिरापर्यंत उघडे असतात, ज्यामुळे उत्सवाला स्थानिक चव मिळते.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter