सीमेवर रणकंदन! पाकिस्तानने अफगाणिस्तानमधील तळांवर केले हवाई हल्ले

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 2 h ago
पाकिस्तानने अफगाणिस्तानमधील तळांवर केले हवाई हल्ले
पाकिस्तानने अफगाणिस्तानमधील तळांवर केले हवाई हल्ले

 

इस्लामाबाद 

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील सीमावर्ती भागात सध्या कमालीचा तणाव निर्माण झाला असून पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या हद्दीतील दहशतवादी तळांवर मोठे हवाई हल्ले केले आहेत. या भीषण कारवाईत डझनावारी दहशतवादी ठार झाले असून त्यांचे अनेक तळ उद्ध्वस्त झाल्याचा दावा पाकिस्तानी लष्कराकडून करण्यात आला आहे. अफगाणिस्तानच्या खोस्त आणि कुनार या प्रांतांमध्ये हे हल्ले करण्यात आले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानच्या लष्करी चौक्यांवर आणि सीमावर्ती भागांत अफगाणिस्तानमधून होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण वाढले होते. या हल्ल्यांना उत्तर देण्यासाठी पाकिस्तानने हे पाऊल उचलले आहे. विशेषतः तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (TTP) या संघटनेच्या दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यासाठी हे हवाई हल्ले करण्यात आले. यापूर्वी पाकिस्तानने अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारला आपल्या भूमीवरून दहशतवादी कारवाया थांबवण्याचे अनेकदा आवाहन केले होते, मात्र त्याला यश न आल्याने ही आक्रमक कारवाई करण्यात आली.

अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारने या हल्ल्यांचा तीव्र निषेध केला असून याला पाकिस्तानचे थेट आक्रमण म्हटले आहे. अफगाण लष्करानेही पाकिस्तानच्या या कारवाईला सीमेवर गोळीबाराने उत्तर दिले असून यामुळे दोन्ही देशांमधील संघर्ष अधिकच चिघळण्याची चिन्हे आहेत. या हवाई हल्ल्यात काही नागरी वस्त्यांनाही फटका बसल्याचे आणि काही नागरिक जखमी झाल्याचे वृत्त अफगाण प्रसारमाध्यमांनी दिले आहे.

ड्युरंड लाईनवर म्हणजेच दोन्ही देशांच्या सीमेवर पाकिस्तान कुंपण घालण्याचे काम करत असल्यापासून हा तणाव सातत्याने वाढत आहे. तालिबानने कधीही ही आंतरराष्ट्रीय सीमा मान्य केलेली नाही. आता थेट हवाई हल्ले झाल्यामुळे दोन्ही देशांमधील राजनैतिक संबंधही धोक्यात आले आहेत. सध्या सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणावर लष्करी हालचाली वाढल्या असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.