पल्लब भट्टाचार्य
आजच्या जगात धार्मिक अस्मितांवरून समाज अधिकाधिक दुभंगत चालला आहे. अनेकदा धर्माचा वापर मने जोडण्यापेक्षा ती तोडण्यासाठीच जास्त केला जातो. अशा वेळी आपण एक महत्त्वाची गोष्ट विसरून जातो. ती म्हणजे, ज्या धर्मांवर मतभेद निर्माण करण्याचा आरोप होतो, तेच धर्म मानवतेच्या काही अत्यंत उदात्त आणि सामायिक प्रथांचेही जतन करतात. या प्रथांमध्ये 'उपवास' ही एक अशी शांत पण अत्यंत प्रभावी गोष्ट आहे, जी जगातील जवळपास सर्वच प्रमुख धर्मांना एकाच धाग्यात बांधते.
उपवास हा केवळ एखादा किरकोळ धार्मिक विधी नाही. तर ती एक सामायिक नैतिक भाषा आहे; जी आत्मसंयम, करुणा, नम्रता आणि जीवनाचा सखोल अर्थ शोधायला शिकवते. आज जेव्हा धार्मिक मतभेद सर्वाधिक टोकदार झालेले दिसतात, तेव्हा ही प्राचीन प्रथा आपल्याला एकतेचा एक भक्कम पाया देते.
खंड आणि धर्म कोणताही असो, स्वतःला शिस्त लावण्यासाठी आणि आत्मिक उन्नतीसाठी उपवासाचा मार्ग स्वीकारला गेला आहे. मुस्लिम बांधव रमजान महिन्यात पहाटेपासून ते सूर्यास्तापर्यंत अन्न आणि पाण्याविना रोजा ठेवतात. हे केवळ धर्माचे पालन नाही, तर तो सदाचाराचा आणि गरिबांबद्दल सहानुभूती निर्माण करण्याचा एक मार्ग आहे.

येशू ख्रिस्तांनी रानावनात काढलेल्या ४० दिवसांच्या स्मरणार्थ ख्रिश्चन बांधव 'लेंट'च्या काळात उपवास करतात. मनःशांती आणि पश्चात्ताप करण्यासाठी ते या संयमाचा वापर करतात. तर ज्यू बांधव 'योम किप्पूर' (प्रायश्चित्ताचा दिवस) या दिवशी उपवास करतात. या दिवशी ते शारीरिक गरजा बाजूला ठेवून पूर्णपणे क्षमाशीलता, समेट आणि स्वतःला नव्याने घडवण्यावर लक्ष केंद्रित करतात.
हिंदू धर्मात विविध प्रकारची व्रते आणि उपवास केले जातात. संयमामुळे शरीर आणि मन दोन्ही शुद्ध होतात आणि स्वतःवरील ताबा वाढतो, अशी त्यांची श्रद्धा आहे. जैन धर्मात तर उपवासाला आध्यात्मिक जीवनाचा गाभा मानले जाते. कर्माची बंधने तोडण्याचा आणि अहिंसा व क्षमाशीलता अंगी बाणवण्याचा तो एक मार्ग मानला जातो.
बौद्ध धर्माचे अनुयायी आपली सजगता वाढवण्यासाठी आणि वासनांची आसक्ती कमी करण्यासाठी पवित्र दिवशी उपवास करतात. तर बहाई धर्माचे अनुयायी नवीन वर्षाची आध्यात्मिक तयारी म्हणून एकोणीस दिवसांचा उपवास करतात. शीख धर्मात जरी कर्मकांडात्मक उपवासाला नकार दिला असला, तरी शरीराला कष्ट देण्यापेक्षा मानसिक शिस्त आणि इच्छांवर नियंत्रण मिळवण्यावर भर देऊन त्यांनीही तोच आंतरिक उद्देश जपला आहे.
यात विशेष लक्षवेधी गोष्ट म्हणजे केवळ उपवासाची सर्वव्यापकता नाही, तर वेगवेगळ्या परंपरांमधील त्याच्या उद्देशातील साधर्म्य थक्क करणारे आहे. सगळीकडेच उपवासाचा मुख्य उद्देश हा अतिरेक टाळणे, अहंकार दूर करणे आणि मानवी जीवन हे केवळ भौतिक उपभोगांवर चालत नाही, याची जाणीव करून देणे हाच आहे. इथे भूक आपल्याला खूप काही शिकवून जाते. जे लाखो लोक नाईलाजाने सहन करतात, तेच दुःख आपण स्वेच्छेने अनुभवतो, तेव्हा त्यातून जी माणुसकी आणि करुणा शिकायला मिळते, ती कोणत्याही प्रवचनातून मिळू शकत नाही.
याच कारणामुळे अनेक धर्मांमध्ये उपवास आणि दानधर्म या गोष्टी हातात हात घालून चालतात. रमजानमध्ये उदारता आणि दातृत्वावर खूप भर दिला जातो. ख्रिश्चनांच्या 'लेंट'मध्ये गरिबांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले जाते. ज्यू परंपरेत प्रायश्चित्ताचा संबंध न्यायाशी जोडला आहे. तर हिंदू आणि जैन प्रथांमध्ये उपवासासोबतच दानालाही खूप महत्त्व आहे. या सर्व गोष्टींमधून एकच सातत्यपूर्ण संदेश मिळतो, तो म्हणजे, जी आध्यात्मिक शिस्त इतरांसाठी आपली मने खुली करत नाही, ती शिस्त अपूर्णच आहे.
याच सामायिक नैतिक दृष्टिकोनामुळे, दुभंगलेल्या जगात माणसांना जोडणारा दुवा बनण्याची ताकद उपवासात आहे. जेव्हा विविध धर्मांच्या लोकांना याची जाणीव होते की, एका उदात्त हेतूसाठी आपले शेजारीही भुकेच्या वेदना सहन करतात, तेव्हा त्यांच्यातील संशय आणि अविश्वास कमी होऊ लागतो. उपवासाच्या निमित्ताने होणारे सर्वधर्मसमभावाचे कार्यक्रम, जसे की रमजानमधील सामूहिक इफ्तार, हे दाखवून देतात की, जेव्हा लोक धार्मिक तत्त्वांविषयी वाद घालण्याऐवजी आपले अनुभव वाटून घेण्यासाठी एकत्र येतात, तेव्हा त्यांच्यातील संवाद किती सहज आणि मनमोकळा होतो.
उपवास सोडताना एकत्र बसलेली माणसे हे अनुभवतात की, या संयमातून ते जे काही शोधत आहेत ते जवळपास सारखेच आहे. मग ती मनःशांती असो, नैतिक स्पष्टता असो किंवा स्वतःपेक्षा एका मोठ्या शक्तीशी जोडले गेल्याची भावना असो. अशा प्रकारच्या भेटीगाठींमुळे समोरच्या व्यक्तीतील माणूस समजून घेता येतो आणि अज्ञानावर पोसलेल्या भीती व द्वेषाच्या कथा फिक्या पडू लागतात.
उपवास हा धार्मिक सीमा ओलांडून आजच्या चंगळवादाच्या आणि अतिरेकाच्या संस्कृतीलाही थेट आव्हान देतो. सततचा उपभोग आणि झटपट समाधान मिळवण्यावर भर देणाऱ्या आजच्या समाजात, जाणीवपूर्वक 'पुरे झाले' असे म्हणणे हे प्रस्थापित संस्कृतीला दिलेले एक मोठे उत्तर ठरते. जेव्हा विविध धर्मांचे लोक एकत्रितपणे ही गोष्ट स्वीकारतात, तेव्हा त्यातून संयम, वंचितांची काळजी आणि पृथ्वीप्रती असलेली जबाबदारी अशी सामायिक नीतिमत्ता वाढीस लागते. या अर्थाने, उपवास ही केवळ एक आध्यात्मिक कृती नसून ती एक सामाजिक कृतीही आहे. ती मानवतेला याची आठवण करून देते की, संयम हा कमकुवतपणा नसून ती एक मोठी ताकद असू शकते.
या सर्व प्रक्रियेत कोणत्याही धर्माला आपले तात्विक वेगळेपण पुसून टाकण्याची अजिबात गरज नाही. एकतेसाठी सगळेच एकसारखे असण्याची सक्ती नसते. लोकांना एकत्र बांधणाऱ्या उपवासाच्या ताकदीचे रहस्य याच गोष्टीत दडले आहे की, तो प्रत्येक भाविकाला आपापल्या परंपरेशी जोडलेले ठेवूनही, सर्व मानवांची सामायिक उद्दिष्टे ओळखण्याची संधी देतो. प्रत्येक धर्म आपापल्या पवित्र ग्रंथांतून आणि तत्त्वज्ञानातून उपवासाचा अर्थ लावतो, तरीही प्रत्यक्ष अनुभवलेला उपवास हा सीमा ओलांडून सगळ्यांना एकाच धाग्यात बांधतो.
धार्मिक तणावामुळे राजकारण आणि समाजजीवनाला वेगळेच वळण मिळत असताना, असा सामायिक दुवा शोधणे ही आता केवळ आदर्शवादाची गोष्ट राहिलेली नसून ती काळाची गरज बनली आहे. उपवास आपल्याला एक दुर्मिळ संधी देतो. अशी एक प्रथा जी सर्व परंपरांमध्ये अत्यंत आदरणीय आहे आणि तरीही ती लोकांना एकत्र आणण्यासाठी पुरेशी खुली आहे. जेव्हा भुकेचा वापर भेदभाव करण्यासाठी न करता, सामायिक आशा आणि मानवी मर्यादांची जाणीव करून देण्यासाठी केला जातो, तेव्हा ती सर्वांना समजणारी एक सामायिक भाषा बनते. त्या भाषेत, श्रद्धा ही दरी निर्माण करणारी गोष्ट न राहता ती पुन्हा एकदा माणसांना जोडणारा एक 'पूल' बनून समोर येते.
(लेखक आसामचे माजी पोलीस महासंचालक असून ते सामाजिक आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या विषयांवर नियमित लेखन करतात.)
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -