पवित्र रमजान १४४७ हिजरीची जगभरात अत्यंत श्रद्धेने आणि साधेपणाने सुरुवात झाली आहे. अनेक देशांमध्ये मंगळवारी संध्याकाळी चंद्रदर्शन झाले आणि बुधवारपासून रोजे सुरू झाले. भारत आणि काही आशियाई देशांमध्ये चंद्र दिसल्याची खात्री झाल्यानंतर गुरुवार, १९ फेब्रुवारीपासून पहिला रोजा ठेवण्यात येत आहे. मशिदींमध्ये ईशा आणि तरावीहची नमाज सुरू झाली आहे. सर्वत्र भक्तीमय वातावरण असून लोक प्रार्थनेत (दुवा मागण्यात) मग्न आहेत. सगळीकडे संयम आणि माणुसकीचीच चर्चा पाहायला मिळत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रमजानच्या पवित्र महिन्यानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या. सोशल मीडियावरील एका पोस्टमध्ये मोदी यांनी ‘रमजान मुबारक‘ म्हणत, हा शुभ महिना समाजात एकतेची भावना अधिक दृढ करेल, अशी आशा व्यक्त केली. तसेच सर्वत्र शांतता आणि समृद्धी नांदावी, अशी सदिच्छाही त्यांनी व्यक्त केली.
Ramzan Mubarak!
— Narendra Modi (@narendramodi) February 18, 2026
May this auspicious month further the spirit of togetherness in our society. May there be peace and prosperity everywhere.
भारतात यंदा चंद्रदर्शनाबाबत लोकांमध्ये विशेष उत्साह होता. दिल्ली आणि एनसीआरमध्ये ढगाळ वातावरणामुळे चंद्र स्पष्ट दिसू शकला नाही. त्यानंतर सर्वांचे लक्ष इतर शहरांतील बातम्यांकडे लागले. बिहार आणि आसाममधून सर्वात आधी चंद्र दिसल्याची (हिलाल) माहिती मिळाली. पाटण्यातील फुलवारी शरीफ येथील 'इमारत-ए-शरिया'चे काझी रिझवान नदवी यांनी विविध ठिकाणांहून आलेल्या साक्षींची पडताळणी केली. खात्री झाल्यानंतर त्यांनी रमजान सुरू झाल्याची अधिकृत घोषणा केली. रांची, लोहरदगा, दरभंगा आणि गया येथूनही चंद्र दिसल्याचे वृत्त आले.
औरंगाबादच्या 'इदारा-ए-शरिया' आणि 'बिहार मिल्लत परिषदे'नेही चंद्र दिसल्याला दुजोरा दिला. काझी फैजान सरवर मिस्बाही यांनी सांगितले की, औरंगाबादमध्ये आकाश निरभ्र असल्याने चंद्र अगदी स्पष्ट दिसला. त्यानंतर अधिकृत घोषणा करण्यात आली. अशा प्रकारे देशाच्या विविध भागांतून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुरुवारी पहिला रोजा पाळला जात आहे.
अरब देशांमध्ये रमजानची सुरुवात एक दिवस आधीच झाली. सौदी अरेबियात मंगळवारी संध्याकाळी चंद्र दिसल्याने तिथे बुधवारपासून रोजे सुरू झाले. कतार, संयुक्त अरब अमिराती, कुवेत आणि बहरीननेही त्याच दिवसापासून रोजा ठेवण्याची घोषणा केली. पॅलेस्टाईन, सुदान, सोमालिया आणि जिबूतीमध्येही बुधवारी पहिला रोजा होता.
इराकमध्ये सुन्नी वक्फ बोर्ड आणि शिया धार्मिक प्राधिकरणांनी एकाच वेळी रमजान सुरू झाल्याची घोषणा केली. लेबनॉनमध्ये सुन्नी समुदायासाठी बुधवारपासून रमजान सुरू झाला. देशाचे ग्रँड मुफ्ती शेख अब्दुल लतीफ दरियान यांनी ही घोषणा केली.
इजिप्तमध्ये मंगळवारी चंद्र न दिसल्याने तिथे गुरुवारपासून रमजानला सुरुवात झाली. जॉर्डन, सीरिया, इंडोनेशिया, पाकिस्तान, इराण, ट्युनिशिया, अल्जेरिया आणि मलेशियानेही गुरुवारी पहिला रोजा जाहीर केला. तुर्की, ओमान, सिंगापूर आणि ऑस्ट्रेलियामध्ये खगोलीय गणनेच्या आधारे गुरुवारपासून रमजानची सुरुवात मानण्यात आली. चंद्र पाहण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींमुळे विविध देशांमध्ये तारखा वेगळ्या असू शकतात. कुठे डोळ्यांनी चंद्र पाहण्यावर भर दिला जातो, तर कुठे खगोलशास्त्राची मदत घेतली जाते. पण त्यामागची भावना एकच आहे - भक्ती आणि आत्मचिंतन.
सौदी अरेबियाचे राजे सलमान (King Salman) यांनी या मुहूर्तावर देशवासीयांना आणि जगभरातील मुस्लिमांना शुभेच्छा दिल्या. रमजान हा रहमत (कृपा) आणि मगफिरत (क्षमा) चा महिना असल्याचे ते म्हणाले. या महिन्यात केलेल्या प्रार्थनेचे पुण्य अनेक पटींनी वाढते. दोन्ही पवित्र मशिदींची सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल त्यांनी ईश्वराचे आभार मानले आणि पॅलेस्टाईनसह संपूर्ण जगात शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी प्रार्थना केली.
मक्केतील 'मस्जिद-अल-हरम' आणि मदिनेतील 'मस्जिद-अन-नबवी'मध्ये पहिल्या तरावीहसाठी लाखो भाविक उपस्थित होते. सगळीकडे उत्साहाचे वातावरण होते. लोक दूरदूरून आले होते आणि प्रशासनानेही विशेष व्यवस्था केली होती. 'जमजम' पाण्याचे पुरेसे वाटप करण्यात आले. गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी स्वतंत्र पथके तैनात होती. अनेक भाषांमध्ये डिजिटल मार्गदर्शन आणि अनुवादाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली होती. प्रत्येक नमाजी व्यक्तीला शांततेत प्रार्थना करता यावी, हाच यामागचा उद्देश होता. दोन्ही पवित्र मशिदींच्या प्रशासनाने रमजानसाठी विशेष नियोजन केले असून स्वच्छता, सुरक्षा आणि सेवेवर विशेष लक्ष दिले जात आहे.
जेरुसलेममधील अल-अक्सा मशिदीतही हजारो लोकांनी पहिली तरावीह अदा केली. मशिदीच्या आत आणि मोकळ्या अंगणात नमाजींची गर्दी होती. वातावरण अत्यंत भावूक होते, मात्र तिथे कडक सुरक्षा व्यवस्था तैनात होती. परिसरात मोठ्या संख्येने पोलीस होते. स्थानिक सूत्रांच्या माहितीनुसार, २०२६ च्या सुरुवातीपासून आतापर्यंत २५० पेक्षा जास्त पॅलेस्टिनींना अल-अक्सात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. काही धार्मिक नेत्यांवरही तात्पुरती बंदी घातली गेली आहे. त्यामुळे तिथे तणावाचे वातावरण आहे. असे असूनही लोक नमाजसाठी पोहोचले आणि त्यांच्या चेहऱ्यावर आशेचा किरण दिसत होता.
रमजानच्या निमित्ताने जगातील अनेक नेत्यांनी संदेश दिले. अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हा महिना आत्मचिंतन आणि आध्यात्मिक नूतनीकरणाचा असल्याचे म्हटले. रोजामुळे माणसाला स्वतःच्या आत डोकावण्याची संधी मिळते आणि तो कुटुंब व समाजाला जोडतो, असे सांगत त्यांनी करुणा आणि दातृत्वाच्या महत्त्वावर भर दिला. कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांनीही रमजानला कृतज्ञतेचा महिना म्हटले असून धार्मिक स्वातंत्र्य आणि परस्पर आदराची गरज अधोरेखित केली.
रमजान हा इस्लामिक चंद्र दिनदर्शिकेचा नववा महिना आहे. या महिन्यात मुस्लिम बांधव सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत रोजा (उपवास) ठेवतात. ते खाण्यापिण्यापासून दूर राहतात, वाईट सवयी टाळण्याचा प्रयत्न करतात. खोटे बोलणे आणि रागापासून दूर राहतात. गरजूंना मदत करतात तसेच जकात आणि फित्रा (दान) देतात. हा महिना आत्मसंयम शिकवतो आणि माणसाला संयमाची ताकद देतो.
संध्याकाळी इफ्तारची विशेष प्रतीक्षा असते. मशिदी आणि घरांमध्ये खजूर आणि पाण्याने रोजा सोडला जातो. अनेक ठिकाणी सामूहिक इफ्तारचे आयोजन केले जाते, जिथे गरीब आणि श्रीमंत एकाच पंगतीत बसतात. हीच रमजानची खरी सुंदरता आहे. यातून समानतेची जाणीव होते आणि मने जवळ येतात.
भारतापासून ते आखाती देशांपर्यंत मशिदींमध्ये तरावीहचा आवाज घुमत आहे. लहान मुलेही रोजा ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. बाजारपेठांमध्ये गर्दी वाढू लागली असून खजूर, शेवया आणि इफ्तारच्या वस्तूंची खरेदी जोरात सुरू आहे. पण या सर्वांमागचा खरा उद्देश भक्ती करणे, स्वतःमधील उणिवा ओळखणे आणि स्वतःला अधिक चांगले बनवणे हाच आहे.
वेगवेगळ्या देशांमध्ये रमजान सुरू होण्याची तारीख वेगळी असू शकते, पण त्याचा संदेश एकच आहे - माणुसकी, संयम आणि सत्कर्म. भूक आणि तहान काय असते, याची जाणीव हा महिना करून देतो. इतरांचे दुःख समजून घेण्याची संधी देतो. म्हणूनच रमजानला 'रहमतचा (कृपेचा) महिना' म्हटले जाते.
यंदाही जगभरात लोक शांततेसाठी प्रार्थना करत आहेत. विशेषतः ज्या भागात परिस्थिती कठीण आहे, त्यांच्यासाठी मशिदींमध्ये हात दुवा मागत आहेत. डोळे पाणावलेले आहेत आणि मनात आशा आहे. रमजान हा केवळ एक महिना नाही, तर तो आत्मा शुद्ध करण्याची, नाती घट्ट करण्याची आणि माणसाला माणसाशी जोडण्याची एक सुंदर काळ आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -