आगीमुळे बेघर झालेल्या तीन हिंदू कुटुंबांसाठी मुस्लीम तरुण बनला देवदूत!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 16 h ago
त्रिपुरातील पिडीत हिंदू कुटुंबांला मदत करताना अफताब अली आणि त्याचे सहकारी
त्रिपुरातील पिडीत हिंदू कुटुंबांला मदत करताना अफताब अली आणि त्याचे सहकारी

 

नुरुल हक

त्रिपुराच्या उत्तर जिल्ह्यातील कैलाशहर येथील गोरनगरमधील तीन हिंदू कुटुंबांचे सर्व काही एका भीषण आगीत भस्मसात झाले. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली होती. ही तिन्ही कुटुंबे बागांमध्ये काम करून आपला उदरनिर्वाह चालवत असत.

आगीने त्यांचे घर, फर्निचर, साठवलेले पैसे आणि भविष्यातील आशा क्षणात खाक केल्या. अवघ्या काही क्षणांत सर्व काही राख झाले आणि ही कुटुंबे बेघर झाली आणि उघड्यावर आली. कडाक्याच्या थंडीत मुले आणि वृद्धांसह तीन कुटुंबांतील एकूण १४ लोकांना जळणाऱ्या ढिगाऱ्यासमोर रात्र काढावी लागली.

अशा कठीण प्रसंगी परिसरातील अफताब अली हा मुस्लीम तरुण मदतीला धावून आला. त्याने आपल्या घराचे दरवाजे या कुटुंबांसाठी उघडले आणि बाधितांच्या निवाऱ्यासाठी तीन खोल्यांची सोय केली. अफताब अलीने या कुटुंबांच्या गरजांचीही पूर्ण काळजी घेतली. त्याने स्वयंपाकाची भांडी, गॅस सिलिंडर, रेशन, अंथरुण-पांघरूण आणि इतर जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे या कुटुंबांना अन्न आणि जीवनावश्यक वस्तूंची कमतरता भासली नाही.

दरम्यान, शेख फाउंडेशननेही या बाधित कुटुंबांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला. फाउंडेशनने एक महिन्याचे रेशन, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य आणि सर्व बाधितांसाठी कपडे पुरवले. मदत पोहचवण्यासाठी शेख फाउंडेशनचे सल्लागार आणि समाजसेवक मकबूल अली यांच्यासह इतर सदस्यांनी या कुटुंबांची भेट घेतली.

गोरनगर ग्रामपंचायतीचे सदस्य अब्बास अली अल-जलिली, शेख जसिमुद्दीन, ताजुल इस्लाम आणि स्थानिक तरुण याह्या खान यांनीही पीडित कुटुंबांची भेट घेऊन त्यांना आधार दिला.
 

'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter