आवाज द व्हॉइस मराठी, जळगाव
राजकीय पटलावर सध्या जाती-धर्माच्या नावावर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. निवडणुकांच्या धामधुमीत धार्मिक ध्रुवीकरणाचे प्रयत्न होत असताना, जळगाव जिल्ह्यातील यावल शहरात माणुसकीचा धर्म अधोरेखित करणारी एक अत्यंत दुर्मिळ आणि हृदयस्पर्शी घटना घडली आहे. ८० वर्षे आपल्या घरात सावलीसारख्या राहिलेल्या एका मुस्लिम कारागिराचे निधन झाल्यावर, एका हिंदू कुटुंबाने त्यांचा जनाजा (तिरडी) आपल्याच घरातून काढून जातीय सलोख्याचे एक अनोखे उदाहरण जगासमोर ठेवले आहे.
२०व्या वर्षी सुरू झाला सोनार कुटुंबियांसोबतचा प्रवास
ही कहाणी आहे कय्युम खान नूर खान यांची. यावलमधील देवरे-सोनार कुटुंब त्यांना प्रेमाने 'खान बाबा' म्हणायचे. वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी कय्युम खान हे अशोक देवरे-सोनार यांच्याकडे सराफी कारागीर म्हणून कामाला आले होते. तेव्हापासून आजतागायत म्हणजे सलग ८० वर्षे ते याच कुटुंबाचा अविभाज्य भाग बनून राहिले. मालक आणि नोकर असे नाते कधी मागे पडले आणि कय्युम खान या घराचे आधारस्तंभ कधी झाले, हे कोणाला कळलेच नाही. वयाची १०० वर्षे पूर्ण होईपर्यंत त्यांनी देवरे कुटुंबाशी अत्यंत निष्ठेने आणि प्रामाणिकपणे रक्ताच्या नात्यापलीकडचे ऋणानुबंध जपले.
जेव्हा खानबाबा कायमचे सोडून गेले...
वृद्धापकाळाने खान बाबांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी मिळताच देवरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. पुणे आणि मुंबईत शिक्षणासाठी वा कामानिमित्त असलेली या कुटुंबातील मुले, नातवंडे आणि जावई आपल्या लाडक्या बाबांना शेवटचा निरोप देण्यासाठी तातडीने यावलमध्ये दाखल झाले. जरी खान बाबांचे मूळ कुटुंब काजीपुरा भागात राहत असले आणि त्यांचे पुतणे (सादिक खान आणि जाकीर खान) अंत्यविधीची तयारी करत असले, तरी देवरे कुटुंबाने एक भावनिक विनंती केली.
हिंदू घरातून निघाला जनाजा
अशोक देवरे, ज्योती देवरे आणि ऋषी देवरे यांनी खान कुटुंबाला विनंती केली की, बाबांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य आमच्या घरात व्यतीत केले आहे. त्यामुळे त्यांचा जनाजा आणि अंतिम प्रवास आमच्याच घरातून निघावा. सोबतच अंतिम दर्शन घेण्यासाठी पुणे आणि मुंबई येथे देवरे-सोनार कुटुंबाची मुलं, मुली, जावई हे येणार असून एक दिवसाचा अवधी द्यावा अशी विनंती केली. खान कुटुंबानेही या प्रेमाचा मान राखला आणि बुधवारी सकाळी एका हिंदू घराच्या उंबरठ्यावरून मुस्लिम रितीरिवाजानुसार खान बाबांचा जनाजा निघाला.
धर्माच्या सीमा ओलांडणारा निरोप
या अंत्ययात्रेचे दृश्य पाहून उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे ओलावले होते. सोनार कुटुंबातील सदस्यांनी खान बाबांच्या पार्थिवाला खांदा दिला आणि कब्रस्तानमध्ये दफनविधीवेळी स्वतः पुढाकार घेतला. एवढेच नाही तर, मुस्लिम धर्मशास्त्रानुसार आवश्यक असणारी 'मूठ माती' देण्याचा विधीही या हिंदू कुटुंबाने पूर्ण केला.
आजच्या काळात जिथे धर्माच्या नावावर भिंती उभारल्या जात आहेत, तिथे यावलमधील या घटनेने माणुसकीचा धर्म सर्वश्रेष्ठ असल्याचे सिद्ध केले आहे. ८० वर्षांची सेवा आणि १०० वर्षांच्या आयुष्याचा हा प्रवास एका हिंदू घराच्या अंगणातून संपला असला तरी, मागे राष्ट्रीय एकात्मतेचा एक अजरामर वारसा ठेवून गेला आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -