अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स (राजपुत्र) मोहम्मद बिन सलमान (MBS) यांच्या सन्मानार्थ व्हाईट हाऊसमध्ये एका शानदार मेजवानीचे (Dinner) आयोजन केले होते. या कार्यक्रमाचे खास आकर्षण ठरला तो फुटबॉल सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो!
मंगळवारी झालेल्या या कार्यक्रमात रोनाल्डो 'ईस्ट रूम'मध्ये पुढच्या रांगेत बसला होता. जिथे राष्ट्राध्यक्ष आणि राजपुत्र दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांना आणि ॲपलचे सीईओ टिम कुक व टेस्लाचे संस्थापक एलॉन मस्क यांसारख्या बड्या उद्योगपतींना संबोधित करत होते.
आपल्या भाषणात ट्रम्प यांनी रोनाल्डोचा विशेष उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, त्यांनी आपला १९ वर्षांचा मुलगा, बॅरन ट्रम्प याची ओळख रोनाल्डोशी करून दिली.
ट्रम्प गमतीने म्हणाले, "बॅरनला त्याला (रोनाल्डो) भेटता आले. आणि मला वाटते की, आता तो त्याच्या वडिलांचा (माझा) थोडा जास्त आदर करतो, फक्त यासाठी की मी तुमची ओळख करून दिली." बॅरन हा रोनाल्डोचा "मोठा फॅन" असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले आणि रोनाल्डोला भेटून तो खूप प्रभावित झाला होता.
MBS ची 'ती' पहिलीच भेट
२०१८ मध्ये पत्रकार जमाल खशोगी यांच्या हत्येनंतर सौदी अरेबियावर आलेली राजनैतिक एकाकीपणाची (diplomatic isolation) छाया दूर सारत, राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांनी व्हाईट हाऊसला ही पहिलीच भेट दिली. अमेरिकन गुप्तचर संस्थांनी खशोगी यांच्या हत्येमागे राजपुत्राचा हात असण्याची शक्यता वर्तवली होती, जी त्यांनी नाकारली होती.
रोनाल्डोचे सौदी कनेक्शन
४० वर्षीय पोर्तुगीज स्टार रोनाल्डो हा २०२२ च्या अखेरीस सौदी क्लब 'अल-नसर'मध्ये सामील झाल्यापासून सौदी फुटबॉल लीगचा चेहरा बनला आहे. त्याचा करार वर्षाला २० कोटी डॉलर्सचा (सुमारे १६०० कोटी रुपये) असल्याचे सांगितले जाते. अल-नसर क्लबची मालकी सौदीच्या 'सॉव्हरिन वेल्थ फंड'कडे आहे, ज्याचे अध्यक्ष खुद्द राजपुत्र आहेत.
वर्ल्ड कपचे वारे
सौदी अरेबिया २०३४ च्या फिफा वर्ल्ड कपचे यजमानपद भूषवणार आहे. रोनाल्डोने या बिडचा (bid) जोरदार प्रचार केला होता. "२०३४ चा वर्ल्ड कप आतापर्यंतचा सर्वोत्तम असेल," असा विश्वास त्याने व्यक्त केला होता.
दुसरीकडे, पुढील वर्षी (२०२६) अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी पोर्तुगाल पात्र ठरला आहे. रोनाल्डो विक्रमी सहाव्यांदा वर्ल्ड कप खेळणार आहे. या स्पर्धेच्या 'ड्रॉ'साठी५ डिसेंबरला वॉशिंग्टनमध्ये कार्यक्रम होणार असून, त्याला ट्रम्प उपस्थित राहणार आहेत.