टीम इंडिया पुन्हा एकदा 'विश्वविजेता'! न्यूझीलंडचा ९६ धावांनी धुव्वा उडवत भारताने राखले जेतेपद

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
भारतीय क्रिकेट संघ विजयाचा जल्लोष करताना
भारतीय क्रिकेट संघ विजयाचा जल्लोष करताना

 

अहमदाबाद

टीम इंडियाने पुन्हा एकदा क्रिकेट विश्वावर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. रविवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी पराभव करत ऐतिहासिक विजय मिळवला. या विजयासह भारत सलग दोनदा टी-२० विश्वचषक जिंकणारा पहिला संघ ठरला असून, एकूण तीन वेळा हे जेतेपद पटकावून भारताने नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे.

अहमदाबादच्या ८६,००० हून अधिक प्रेक्षकांनी भरलेल्या मैदानावर भारताने नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ५ बाद २५५ धावांचा डोंगर उभा केला. टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील ही आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या ठरली. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ १९ षटकांत केवळ १५९ धावांवर आटोपला.

फलंदाजांचा झंझावात : संजू सॅमसनची वादळी खेळी

भारताच्या डावाची सुरुवात सलामीवीर अभिषेक शर्मा आणि संजू सॅमसन यांनी स्फोटक पद्धतीने केली. अभिषेकने अवघ्या २१ चेंडूत ५२ धावा कुटल्या, ज्यात त्याने स्पर्धेतील सर्वात वेगवान अर्धशतक (१८ चेंडू) साजरे केले. त्यानंतर संजू सॅमसनने ४६ चेंडूत ८९ धावांची जबरदस्त खेळी करत न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. त्याला इशान किशन (५४ धावा) आणि शेवटच्या षटकात शिवम दुबे (२६ धावा) यांनी मोलाची साथ दिली.

गोलंदाजांची भेदक कामगिरी

२५६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात खराब झाली. जसप्रीत बुमराहने आपल्या पहिल्याच चेंडूवर गडी बाद करून न्यूझीलंडला मोठा धक्का दिला. बुमराहने ४ षटकांत केवळ १५ धावा देत ४ महत्त्वाचे बळी घेतले. अक्षर पटेलनेही ३ गडी बाद करत न्यूझीलंडच्या मधल्या फळीचे कंबरडे मोडले. न्यूझीलंडकडून केवळ टिम सायफर्ट (५२ धावा) आणि मिचेल सँटनर (४३ धावा) यांनी थोडा प्रतिकार केला, पण तो पुरेसा ठरला नाही.

ऐतिहासिक विक्रम आणि सोहळा

या विजयासह सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने अनेक विक्रम मोडले. भारत हा स्वतःच्या देशात विश्वचषक जिंकणारा पहिला संघ ठरला आहे. तसेच, सलग दोन वेळा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा मानही भारताने मिळवला आहे. जसप्रीत बुमराहला त्याच्या उत्कृष्ट गोलंदाजीसाठी 'सामनावीर' तर संपूर्ण स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या संजू सॅमसनला 'मालिकावीर' पुरस्काराने गौरवण्यात आले.

सामना संपताच संपूर्ण स्टेडियममध्ये एकच जल्लोष सुरू झाला. खेळाडूंनी मैदानावर तिरंगा फडकवत विजयाचा आनंद साजरा केला. २०२३ च्या एकदिवसीय विश्वचषकातील पराभवाच्या जखमा भरून काढत भारताने अहमदाबादच्याच मैदानावर हा ऐतिहासिक विजय मिळवला, ही चाहत्यांसाठी सर्वात मोठी दिवाळी ठरली.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter