प्रचारादरम्यान युसूफ पठाण यांनी मांडली प्रतिभावान प्रशिक्षकाची व्यथा!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 9 h ago
AI निर्मित प्रातिनिधिक चित्र
AI निर्मित प्रातिनिधिक चित्र

 

जावेद अख्तर, कोलकाता

पश्चिम बंगालमधील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या पक्षाचा म्हणजे तृणमूल काँग्रेसचा (TMC) प्रचार करताना, खासदार आणि माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण यांना राज्यातील क्रीडा प्रतिभेच्या उपेक्षेची एक हृदयस्पर्शी कथा पाहायला मिळाली.

शक्तीपूरमधील स्थानिक फुटबॉल प्रशिक्षक समीर सरदार यांचा एक व्हिडिओ युसूफ पठाण यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओने बंगालच्या क्रीडा जगातील एक कडू सत्य सर्वांसमोर आणले आहे.

युसूफ पठाण बेलडांगा येथील शक्तीपूरमध्ये एका निवडणूक सभेसाठी जात होते. रामनगर घाटावर त्यांची भेट स्थानिक फुटबॉल प्रशिक्षक समीर सरदार यांच्याशी झाली. समीर यांनी पठाण यांना आपल्या घरी येण्याचे आग्रहाचे आमंत्रण दिले. समीर यांचा साधा स्वभाव पाहून युसूफ पठाण यांना त्यांचा आग्रह मोडता आला नाही.

समीर आपल्या कुटुंबासह एका साध्या झोपडीत राहतात. तिथे युसूफ पठाण चक्क जमिनीवर बसले आणि त्यांनी समीर यांच्या घरच्यांसोबत भात आणि बंगालचा प्रसिद्ध पदार्थ 'सुक्तो'वर ताव मारला. जेवताना त्यांनी जेव्हा आजूबाजूला पाहिले, तेव्हा संपूर्ण घर चकाकणाऱ्या ट्रॉफी आणि पदकांनी भरलेले पाहून त्यांना धक्काच बसला. ते दृश्य मनाला स्पर्श करणारे होते, पण तितकेच अस्वस्थ करणारेही होते.

घरातील त्या ट्रॉफी आणि पदकं ही समीर यांच्या तारुण्यातील त्यांच्या अफाट कौशल्याची साक्ष देत होती. पण दुसरीकडे, त्याच घराच्या भिंती इतक्या कमकुवत झाल्या होत्या की त्या कधीही कोसळतील अशी भीती वाटत होती. हे पाहून पठाण यांचे मन भरून आले.

ज्या सन्मानांनी एखाद्या राजवाड्याची शोभा वाढली असती, ते सर्व पुरस्कार आज एका अशा छताखाली धूळ खात पडले आहेत, जे कधीही कोसळू शकते. ही मोठी शोकांतिका आहे.

समीर सरदार यांची ही व्यथा म्हणजे भारताच्या क्रीडा व्यवस्थेच्या अपयशाचा सर्वात मोठा पुरावा आहे. आपल्या खेड्यापाड्यांत कौशल्याची मुळीच कमतरता नाही, पण कमतरता आहे ती योग्य संधी आणि सरकारी मदतीची. समीर यांनी आपले संपूर्ण आयुष्य फुटबॉलसाठी वाहिले आहे. आजही ते ग्रामीण बंगालमधील लहान मुलांना फुटबॉलचे बारकावे शिकवत आहेत.

ते भविष्यातील चमकते तारे घडवत आहेत, पण प्रश्न असा उरतो की त्यांचे स्वतःचे भविष्य काय? जो खेळाडू आपल्या मूलभूत गरजांसाठी झगडत आहे, त्याच्यासाठी त्या सोन्या-चांदीच्या पदकांचे काय मोल?

f

युसूफ पठाण यांनी समीर सरदार यांचे कौतुक करणारा व्हिडिओ पोस्ट केला खरा, पण आता लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. खासदार महोदयांनी या खेळाडूचे जगणे सुसह्य करण्यासाठी काहीतरी करावे, अशी भावना नागरिक व्यक्त करत आहेत. खासदार केवळ जेवण करून निघून जाणार की समीर यांच्या कोचिंग इन्स्टिट्यूटसाठी ठोस काही करणार, याचीच चर्चा सध्या स्थानिक लोकांमध्ये सुरू आहे.

युसूफ पठाण यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, त्यांनी शेजाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि त्यांच्या कुटुंबासोबत वेळ घालवला. पण क्रीडाप्रेमींचे म्हणणे आहे की, आता फक्त समस्या ऐकण्याचे दिवस राहिले नाहीत, तर प्रत्यक्ष तोडगा काढण्याची गरज आहे.

समीर सरदार यांच्यासारख्या प्रशिक्षकांना केवळ सहानुभूती नको आहे. त्यांना हवंय एक सन्मानजनक आयुष्य आणि आधुनिक सोयीसुविधांनी सज्ज असे कोचिंग सेंटर, जेणेकरून ते आणखी उत्तम खेळाडू तयार करू शकतील.

ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या नोंदीनुसार, समीर सरदार हे बंगाल फुटबॉल अकादमीसारख्या नामांकित संस्थांशी जोडलेले होते.

समीर हे एक अनुभवी खेळाडू आहेत आणि त्यांचा खेळाप्रती असलेला उत्साह आजही कायम आहे. जिल्हा आणि राज्य पातळीवर पदके जिंकूनही निवृत्तीनंतर जे अंधारात हरवून जातात, अशा हजारो अनामिक नायकांपैकी ते एक आहेत. ज्या बंगालमध्ये फुटबॉलला धर्माचा दर्जा दिला जातो, तिथे एका दिग्गज प्रशिक्षकावर अशी वेळ येणे ही खरोखरच लाजीरवाणी गोष्ट आहे.

युसूफ पठाण यांच्या या भेटीमुळे एक मोठी चर्चा सुरू झाली आहे. आपली व्यवस्था या खेळाडूंची दखल घेणार का? त्यांना तो मान-सन्मान कधी मिळणार का, ज्याचे ते खरे मानकरी आहेत? की एखादा बडा नेता येईल, फोटो काढेल आणि निघून जाईल? समीर सरदार यांना आज मदतीची आणि बदलाची गरज आहे.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter 



Latest News