टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात भारताने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाचे मनापासून अभिनंदन केले आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताने न्यूझीलंडचा पराभव करून सलग दुसऱ्यांदा विश्वविजेतेपदावर नाव कोरले. या यशानंतर पंतप्रधानांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि अधिकृत निवेदद्वारे खेळाडूंच्या जिद्दीचे आणि मेहनतीचे कौतुक केले आहे.
पंतप्रधान मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटले की, "संपूर्ण देश आज आनंदाने भारावून गेला आहे. टी-२० विश्वचषक जिंकल्याबद्दल टीम इंडियाचे खूप खूप अभिनंदन! या विजयाने १४० कोटी भारतीयांची मान अभिमानाने उंचावली आहे. मैदानावर तुम्ही दाखवलेली जिद्द, सांघिक कामगिरी आणि संयम खरंच वाखाणण्याजोगा आहे."
"तरुणांसाठी प्रेरणादायी कामगिरी"
पंतप्रधानांनी पुढे नमूद केले की, भारतीय खेळाडूंनी संपूर्ण स्पर्धेत ज्या प्रकारे खेळ केला, तो केवळ क्रिकेटपुरता मर्यादित नसून तो भारतीय तरुणांच्या जिद्दीचे प्रतीक आहे. "तुमची ही कामगिरी आगामी पिढीतील खेळाडूंसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल. तुम्ही केवळ सामने जिंकले नाहीत, तर कोट्यवधी लोकांची मनेही जिंकली आहेत," अशा शब्दांत त्यांनी खेळाडूंना दाद दिली.
अंतिम सामन्यात संजू सॅमसनची वादळी फलंदाजी आणि जसप्रीत बुमराहची भेदक गोलंदाजी यांचा विशेष उल्लेख करत पंतप्रधानांनी संपूर्ण संघाच्या एकजुटीचे कौतुक केले. या विजयामुळे भारताची क्रीडा क्षेत्रातील प्रतिमा जागतिक स्तरावर अधिक उंचावली असल्याचेही त्यांनी सांगितले.
देशभरात जल्लोषाचे वातावरण
पंतप्रधानांच्या या शुभेच्छांनंतर क्रीडा विश्वात आणि राजकीय वर्तुळातूनही टीम इंडियावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारताने तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकून नवा इतिहास रचला आहे. पंतप्रधानांनी या विजयाला 'ऐतिहासिक आणि अविस्मरणीय' असे संबोधले असून, सर्व खेळाडूंना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.