देशातील नक्षलवादी चळवळीला आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का बसला आहे. नक्षलवाद्यांची सर्वात घातक मानली जाणारी 'पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी' (PLGA) बटालियन १ चा प्रमुख आणि मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी नेता माडवी हिडमा हा सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ठार झाला आहे. मंगळवारी आंध्र प्रदेशातील अल्लूरी सीताराम राजू जिल्ह्यात ही मोठी कारवाई करण्यात आली.
विशेष म्हणजे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या मोस्ट वॉन्टेड नक्षलवाद्याचा खात्मा करण्यासाठी ३० नोव्हेंबर ही 'डेडलाईन' निश्चित केली होती. सुरक्षा दलांनी ही मुदत संपण्यापूर्वी १२ दिवस आधीच त्याला यमसदनी धाडून एक मोठे यश मिळवले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या तीन राज्यांच्या सीमेवर (tri-junction) असलेल्या पुलागंडीच्या घनदाट जंगलात ही चकमक झाली. हिडमा हा २६ हून अधिक मोठ्या नक्षलवादी हल्ल्यांमध्ये थेट सहभागी होता, ज्यामुळे तो देशातील सर्वात धोकादायक बंडखोर नेत्यांपैकी एक मानला जात होता.
गृहमंत्री अमित शहा यांनी यापूर्वीच देशातून नक्षलवाद संपवण्यासाठी ३१ मार्च २०२६ ही अंतिम मुदत निश्चित केली आहे. एका सुरक्षा आढावा बैठकीत, शहा यांनी नक्षलविरोधी मोहिमेत गुंतलेल्या वरिष्ठ सुरक्षा अधिकाऱ्यांना ३० नोव्हेंबरपूर्वी हिडमाला संपवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार सुरक्षा दलांनी हे मिशन फत्ते केले.
माडवी हिडमा हा केवळ PLGA बटालियनचा कमांडर नव्हता, तर तो माओवादी मध्यवर्ती समितीचा (Central Committee) सदस्यही होता. १९८१ मध्ये सुकमा येथे जन्मलेला हिडमा, बस्तरमधील असा एकमेव आदिवासी सदस्य होता जो नक्षलवाद्यांच्या या सर्वोच्च नेतृत्वाच्या गटात सामील झाला होता. त्याला नक्षलवाद्यांच्या संघटनेतील सर्वात तरुण सीसी मेंबर मानले जात होते.
हिडमाच्या खात्म्यामुळे डाव्या विचारसरणीच्या अतिरेकी चळवळीचे कंबरडे मोडले आहे. या मोठ्या यशानंतर, गृहमंत्र्यांनी दिलेल्या मार्च २०२६ च्या मुदतीपूर्वीच देशातील नक्षलवाद संपुष्टात येण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.