मन्सूरुद्दीन फरिदी
दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात विद्यार्थी असतानाच सय्यद साहिल आगा यांचे मन कथाकथनात रमले. त्यांना या कलेतील सुफी आणि खानकाह (दर्गा) यांचा संबंध विशेष भावतो. त्यांच्या मते, हे शांतता आणि प्रेमाचा संदेश देणारे माध्यम आहे. त्यातून देशभक्ती, एकता आणि धार्मिक सलोखा वाढीस लागतो. एवढेच नाही, तर गंगा-जमुनी संस्कृतीचे संवर्धनही होते.
आज ते भारत आणि परदेशात कथाकथनाचे कार्यक्रम करतात. "ही कला मला आत्मिक समाधान देते, त्यामुळे मी आनंदी आणि समाधानी आहे," असे भारताचे हे प्रसिद्ध कथाकार सांगतात.
१९८२ मध्ये जन्मलेल्या सय्यद साहिल आगा यांनी दिल्लीच्या जामिया मिलिया इस्लामियामधून पदवी पूर्ण केली. त्यानंतर श्रीराम सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्समधून अभिनयात पदव्युत्तर पदविका मिळवली. त्यांचे वडील सय्यद मन्सूर आगा हे ज्येष्ठ उर्दू पत्रकार आहेत, पण साहिल यांनी मात्र कथाकथनाच्या जगात स्वतःचे वेगळे नाव कमावले.
"लोकांना वाचण्यापेक्षा ऐकायला जास्त आवडते, हे मला जाणवले. त्यामुळेच भूतकाळाची ओळख करून देण्यासाठी आणि त्यातून धडा घेण्यासाठी गोष्टी सांगितल्या पाहिजेत, असे मला वाटले." विशेष म्हणजे, त्यांनी आधी 'दास्तान-ए-हिंद' हे पुस्तक लिहिले. नंतर त्यातील कथा व्हिडिओ स्वरूपात सादर केल्या. सुरुवातीला लेखक म्हणून ओळख मिळाल्यावर त्यांनी कथाकथनाच्या क्षेत्रात पाऊल टाकले.
भारतात कथाकथनाची परंपरा शतकानुशतके जुनी आहे. पण १९२८ मध्ये मीर बाकर अली यांच्या मृत्यूनंतर ही कला जवळजवळ संपली होती. मात्र, २००५ मध्ये शम्सुर रहमान फारुकी, नसीरुद्दीन शाह आणि महमूद फारुकी यांनी तिला पुनरुज्जीवित केल्याचे ते सांगतात.
सय्यद साहिल आगा यांचा उद्देश केवळ कथा सांगणे हा नाही, तर भारतीय संस्कृतीचा प्रचार करणे हा आहे. या प्राचीन कलेला पुनरुज्जीवित करून लोकप्रिय करणाऱ्या कलाकारांमध्ये त्यांचे नाव येते. त्यांनी ही कला उच्चभ्रू आणि साहित्यिकांच्या छोट्या बैठकांमधून बाहेर काढून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली.
एवढेच नाही, तर त्यांनी पारंपरिक कथाकथनाला एक नवी शैली दिली. त्यांनी 'म्युझिकल स्टोरीटेलिंग' (संगीतमय कथाकथन) ही संकल्पना मांडली. यात भारतीय ऑपेरा आणि शास्त्रीय संगीताची जोड कथांना दिली. हा प्रयोग लोकांना खूप आवडला आणि त्यामुळे ही कला नव्या पिढीसाठी रंजक बनली.
सय्यद साहिल आगा यांनी भारत आणि परदेशात अनेक कथा सादर केल्या आहेत. यामध्ये 'दास्तान-ए-मेहबूब-ए-इलाही', 'दास्तान-ए-अमीर खुसरो', 'दास्तान-ए-गालिब', 'दास्तान-ए-दाग', 'दास्तान-ए-मीर', 'दास्तान-ए-शाएब अख्तर', 'जश्न-ए-जावेद अख्तर', दिल्लीच्या कवींच्या कथा, 'दास्तान-ए-आखिरी दास्तानगो', 'दास्तान-ए-तकसीम', 'दास्तान-ए-इश्क', 'दास्तान-ए-फतेह' आणि 'दास्तान-ए-सुलतान सलाहुद्दीन' यांचा समावेश आहे.
त्यांनी टीव्हीवरही काम केले आहे. दूरदर्शन उर्दूसाठी त्यांनी 'गालिब उमराव बेगम' हा विशेष कार्यक्रम लिहिला आणि सादर केला. तसेच, 'झी सलाम'साठी त्यांनी कथाकथन केले, जी एक सविस्तर मालिका म्हणून प्रसारित झाली.
टेलिव्हिजनशिवाय त्यांनी 'परी खाना' आणि 'सनम खाना' या बॉलिवूड चित्रपटांसाठीही लेखन केले आहे. द्वेष माणसाला फक्त वेदना आणि दुःखात बुडवतो, पण या गोष्टी तात्पुरत्या असतात, असे ते मानतात. प्रत्येकाच्या हृदयात प्रेमाची भावना असतेच.
"जेव्हा मी मंचावरून खाली येतो, तेव्हा लोक धर्माचा विचार न करता मला मिठी मारतात. हे खूप प्रोत्साहन देणारे असते. आपण जे काही केले ते चांगले होते, हा विश्वास यामुळे निर्माण होतो," असे ते मोठ्या समाधानाने सांगतात.
साहिल आगा यांची दुसरी आवड म्हणजे 'विंटेज कार'. त्यांच्याकडे ५० सुस्थितीत असलेल्या जुन्या गाड्यांचा संग्रह आहे. यात एकेकाळी राजे आणि नवाबांच्या मालकीच्या गाड्यांचाही समावेश आहे.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -