महमूद अक्रम : ४०० भाषा वाचणारा आणि लिहिणारा १९ वर्षांचा अजब किमयागार

Story by  आवाज़ मराठी | Published by  admin2 • 18 h ago
महमूद अक्रम
महमूद अक्रम

 

श्रीलता एम.

भाषिक विविधता म्हणजे गोंधळ की सांस्कृतिक श्रीमंती? जिथे दर काही किलोमीटरवर भाषा बदलते अशा भारतात हा प्रश्न नेहमीच पडतो. पण तमिळनाडूच्या १९ वर्षीय महमूद अक्रमसाठी हा प्रश्न अस्तित्वातच नाही.

अक्रमला तब्बल ४०० भाषा वाचता आणि लिहिता येतात. त्यापैकी ४६ भाषा त्याला चांगल्या समजतात. तमिळ, इंग्रजी, हिंदी, उर्दू, अरबी, जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश, चिनी, जपानी आणि कोरियन अशा १० भाषांमध्ये तो अगदी अस्खलितपणे संवाद साधू शकतो. त्याचा हा प्रवास खूप लवकर सुरू झाला. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी त्याने इंग्रजी मुळाक्षरे आणि तमिळची सर्व २९९ अक्षरे काही आठवड्यांतच आत्मसात केली होती. आठ वर्षांचा होईपर्यंत तो ५० भाषा वाचू, लिहू आणि टाईप करू शकत होता.

त्याच्या या कौशल्याची दखल जागतिक विक्रमांनीही घेतली. वयाच्या दहाव्या वर्षी त्याने भारताचे राष्ट्रगीत २० वेगवेगळ्या लिपींमध्ये एका तासापेक्षा कमी वेळात लिहून दाखवले. बाराव्या वर्षी एका स्पर्धेत त्याने केवळ तीन मिनिटांत एका वाक्याचा इतर ७० भाषातज्ज्ञांपेक्षा जास्त भाषांमध्ये अनुवाद केला.

अक्रमचे वडील स्वतः १६ भाषांचे जाणकार आहेत. त्यामुळे लहानपणापासूनच अक्रमवर विविध आवाज आणि लिपींचे संस्कार झाले. तरीही, लिहिता येणे आणि भाषा समजणे यात तो स्पष्ट फरक करतो. तो सांगतो, "मला ४०० भाषा वाचता-लिहिता येत असल्या तरी, त्यातील ४६ भाषाच मला पूर्णपणे समजतात."

अक्रमसाठी भाषा हे केवळ एक माध्यम आहे. चीन आणि भारताची तुलना करताना तो म्हणतो की, दोन्ही देश भाषिक विविधतेने नटलेले खंडासारखे आहेत. चीनमध्ये मँडरिन भाषा अनिवार्य केल्यामुळे तिथल्या स्थानिक भाषा संपत चालल्या आहेत. भारतातही सर्व राज्यांमध्ये एकच भाषा सक्तीची केली, तर आपल्या प्रादेशिक भाषांचेही तसेच होईल. "एकाच भाषेचा फायदा म्हणजे एकता वाढते, पण तोटा हा की यामुळे अनेक सुंदर भाषा कायमच्या संपून जातील," असे मत त्याने व्यक्त केले.

भाषा शिकण्याची त्याची जिद्द आजही कायम आहे. लोक वर्ष महिन्यांमध्ये मोजतात, पण अक्रम आपला वेळ आठवड्यांमध्ये विभागतो. त्याचा प्रत्येक आठवडा एका विशिष्ट भाषेला समर्पित असतो. तो शिस्तीचा कडक आहे. ज्या आठवड्यात तो जी भाषा शिकतो, त्या भाषेतच त्याच्या फोनची आणि सोशल मीडियाची सेटिंग असते. तो त्याच भाषेत बातम्या, चित्रपट आणि रिल्स पाहतो.

संस्कृतबद्दल विचारले असता तो म्हणाला की, त्याने प्रयत्न केला पण योग्य साधनसामग्री अभावी तो प्रयत्न सोडून दिला. शिक्षकाकडून शिकण्याच्या पारंपरिक पद्धतीपेक्षा त्याला स्वतःहून शिकणे जास्त आवडते. "संस्कृत ही आता व्यवहारातील भाषा उरलेली नाही. मी भविष्याचा विचार करणारा माणूस आहे आणि मला वाटते की संस्कृत भविष्यातील भाषा नाही," असे तो स्पष्टपणे सांगतो. लॅटिन भाषेबाबतही त्याचे हेच मत आहे.

अक्रमचा एक महत्त्वाचा विचार असा आहे की, "जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीशी त्याच्या मातृभाषेत बोलतो, तेव्हा आपण केवळ त्याच्या मेंदूपर्यंत नाही तर थेट हृदयापर्यंत पोहोचतो." जर एखादा विदेशी पर्यटक तमिळनाडूत येऊन तमिळ बोलला, तर येथील लोकांशी त्याचे नाते अधिक घट्ट होईल, असे त्याला वाटते.

अक्रमला शालेय शिक्षण पूर्ण करताना खूप संघर्ष करावा लागला. ठराविक साच्यातील शिक्षण पद्धतीमुळे त्याच्या भाषेच्या आवडीला तिथे वाव नव्हता. अखेर त्याने मुक्त विद्यापीठातून शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. त्याने चार वर्षे ऑस्ट्रियामध्ये राहून जर्मन भाषेसह आपल्या आवडीचे विषय शिकले. सध्या तो एकाच वेळी तीन पदव्यांचे शिक्षण घेत आहे: इंग्लंडमधील मुक्त विद्यापीठातून भाषाशास्त्र (Linguistics), मद्रास विद्यापीठातून इंग्रजी साहित्य आणि अलागप्पा विद्यापीठातून ॲनिमेशन.

परदेशी भाषा शिकवणे हे त्याचे ध्येय आहे. एखाद्या जर्मन व्यक्तीला जर्मन भाषेतूनच हिंदी शिकवता आली, तर ज्ञानाची दारे खऱ्या अर्थाने उघडतील, असे त्याला वाटते. तो आपल्या वडिलांच्या 'अक्रम ग्लोबल लॅन्वेजेस इन्स्टिट्यूट'मध्ये शिकवतो.

लहानपणीच अक्रमला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी मिळाली. दहा वर्षांचा असताना त्याला दक्षिण आफ्रिकेचे नागरिकत्व देऊ करण्यात आले होते, तर आग्नेय आशियातील अनेक शाळांनी त्याला अतिथी शिक्षक म्हणून निमंत्रित केले होते. भारतात मुस्लिम म्हणून वाढताना आलेल्या अनुभवावर तो मोजक्या शब्दांत भाष्य करतो. दहा वर्षांपूर्वी सरकारी मदत मिळणे कठीण होते आणि आमच्या समस्या ऐकायला कोणी तयार नसायचे, पण आता परिस्थिती बदलत आहे, असे तो म्हणतो.

आज त्याचे सर्वात मोठे स्वप्न 'तिरुक्कुरल'चा अनेक भाषांमध्ये अनुवाद करणे हे आहे. गप्पांच्या शेवटी तो अरबीमध्ये काही शब्द उच्चारतो: 'मरहबा' (नमस्कार), 'शुकन' (धन्यवाद), 'कैफ अल-हाल?' (कसे आहात) आणि 'अलहम्दुलिल्लाह' (देवाच्या कृपेने सर्व काही ठीक आहे).