निखत फातिमा : कौशल्य विकासातून मुस्लिम महिलांचे सक्षमीकरण करणारे धाडसी नेतृत्व

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 d ago
निखत फातिमा
निखत फातिमा

 

श्रीलता एम

एकटी व्यक्ती इतक्या लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्या आयुष्यात आदर, प्रतिष्ठा आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देऊ शकते का? जर तुमच्याकडे खूप पैसा असेल तर हे कदाचित शक्य आहे. मात्र, एका सामान्य महिलेने गेल्या तीन दशकांपासून दोन किंवा त्यापेक्षा जास्त शैक्षणिक केंद्रांचे नेतृत्व करणे, ही केवळ ध्येयपूर्ती नसून प्रभावी सामाजिक परिवर्तनाचा एक उत्कृष्ट नमुना आहे.

निखत फातिमा सोहेल या चेन्नईमधील 'एमडब्ल्यूए' (MWA) मॅट्रिक्युलेशन स्कूलच्या प्रमुख आहेत. त्या 'ॲकॅडमी फॉर वुमन'च्या सह-अध्यक्ष असून मुस्लिम तरुण आणि महिलांच्या शिक्षणाशी संबंधित इतर अनेक संस्थांशी जोडल्या गेल्या आहेत. त्यांच्या या प्रवासाची सुरुवात 'सॅक्रेड हार्ट स्कूल'मध्ये शिक्षण घेत असतानाच झाली. याच शाळेत जयललिता, जयंती नटराजन आणि कनिमोझी यांसारख्या प्रसिद्ध व्यक्ती शिकल्या आहेत. एनसीसीमध्ये असताना निखत यांनी अनाथालयाशी संबंधित प्रकल्पांमध्ये भाग घेतला आणि तिथूनच त्यांच्या मनात शिक्षण आणि समाजसेवेची ओढ निर्माण झाली.

त्यांनी शिकण्यात अडचणी येणाऱ्या मुलांसाठी पाच शिक्षण केंद्रे सुरू केली आणि १५०० विद्यार्थी असलेल्या शाळेचे नेतृत्व केले. 'एआयएच' (AIH) अंतर्गत 'ॲकॅडमी फॉर वुमन'च्या सह-अध्यक्ष म्हणून केलेल्या कामाबद्दल त्या सांगतात की, "मी तामिळनाडूमध्ये मुलींसाठी आणि त्यांच्या सामाजिक उत्थानासाठी ३० वर्षे काम केले आहे." लहानपणी शाळेत असताना मुलांच्या आणि निराश्रितांच्या मदतीसाठी निर्माण झालेली त्यांची ही ओढ आज शेकडो तरुणांच्या, विशेषतः मुलींच्या जीवनात प्रकाश निर्माण करत आहे.

त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या काळातच त्यांची 'ॲकॅडमी'च्या सह-अध्यक्षपदी निवड झाली. या संस्थेच्या विश्वस्तांमध्ये आर्कोटचे नवाब आणि निखत यांच्या आजी-आजोबांचा समावेश होता. त्यांचे कुटुंंब पिढ्यानपिढ्या नवाबांच्या जवळचे राहिले आहे. एक महिला म्हणून हे पद मिळवणे सोपे होते का, असे विचारले असता त्या म्हणतात की, "ते कधीच सोपे नसते. मात्र जेव्हा तुम्हाला संधी मिळते, तेव्हा तुम्हाला मुलींचे सक्षमीकरण करायचे असते आणि वातावरण महिलांसाठी पोषक ठेवायचे असते."

त्यांच्या रिअल इस्टेट व्यवसायाचे उदाहरण देताना त्या सांगतात की, हे केवळ व्यावसायिक मॉडेल नसून प्रशिक्षणाचे एक केंद्र आहे. त्या सांगतात की, "मी अशा तरुणांना शोधते ज्यांना रोजगाराची गरज आहे. यात परित्यक्ता महिला, विधवा आणि समाजातील अशा लोकांचा समावेश असतो ज्यांच्याकडे पदवी नाही आणि जे मुख्य प्रवाहातील नोकऱ्यांपासून दूर आहेत. ते सुरुवातीला २०,००० रुपयांच्या पगारासाठी येतात. मी त्यांना प्रशिक्षण देते आणि अशा नोकऱ्या शोधून देते जिथे त्यांची कमाई दरमहा ३०,००० रुपयांपर्यंत पोहोचू शकते." या तरुण-तरुणींना इंग्रजी बोलायला शिकवले जाते, जे त्यांच्यासाठी सक्षमीकरणाचे एक मोठे साधन ठरते.

१५०० विद्यार्थी असलेल्या 'एमडब्ल्यूए' शाळेला या वर्षी दिव्यांग स्नेही (Ramp-friendly) बनवण्याचा त्यांचा विचार आहे. शाळेत जास्तीत जास्त दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रवेश मिळावा, अशी त्यांची इच्छा आहे. २०२७ मध्ये ही शाळा आपले शताब्दी वर्ष साजरे करणार असून शाळेतील २० टक्के विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाते. ही शाळा खेळांपासून धर्मापर्यंत आणि इंग्रजी भाषेच्या कौशल्यापासून राज्याच्या अभ्यासक्रमापर्यंत सर्व बाजूंनी विद्यार्थ्यांचा विकास करण्यावर भर देते.

देशाच्या इतर भागांच्या तुलनेत तामिळनाडूमध्ये शिक्षणाने मुस्लिम महिलांच्या उत्थानात मोठी मदत केली आहे, असे त्यांना वाटते. याचे श्रेय त्या पेरियार चळवळीला आणि द्रविडी संस्कृतीला देतात. येथील संस्कृती सर्वसमावेशक असून लोक धर्मापेक्षा त्यांच्या तमिळ ओळखीला प्राधान्य देतात. त्या म्हणतात की, "दक्षिण भारतातील लोक संधींसाठी लढायला हवे हे समजण्याइतपत हुशार आहेत. त्यामुळे दक्षिण भारतातील मुस्लिम उत्तरेकडील मुस्लिमांच्या तुलनेत अधिक सुस्थितीत आहेत आणि इतर समुदायांशी त्यांचे संबंधही सौहार्दपूर्ण आहेत. येथील ब्राह्मणांमध्येही 'जगा आणि जगू द्या' अशी भावना राहिली आहे. जोपर्यंत उत्तरेतील फूट पाडणारे वारे आपल्या राज्यात शिरत नाहीत, तोपर्यंत सर्व काही ठीक आहे."

तामिळनाडूतील मुस्लिम शैक्षणिक संस्था आणि संघटनांच्या मंडळावर (OMEIAT) असल्यामुळे त्या या अंतर्गत असलेल्या ३०० शाळांच्या कामकाजात महत्त्वाची भूमिका बजावतात. सॅक्रेड हार्ट स्कूलच्या माजी विद्यार्थिनी असलेल्या निखत या शाळेच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या (SHAA) अध्यक्षही होत्या. मात्र, 'एएचआय' अंतर्गत 'ॲकॅडमी फॉर वुमन'च्या प्रमुख म्हणून त्यांचे योगदान सर्वात मोठे आहे. ही संस्था मुलींसाठी विविध अभ्यासक्रम चालवते. यात समुपदेशन, फॅशन डिझाइन आणि शिवणकामाच्या कोर्सेसमध्ये १८० मुलींनी प्रवेश घेतला आहे.

पैशांशी संबंधित सामाजिक संस्था चालवण्याचे रहस्य सांगताना त्या म्हणतात की, यासाठी अमाप संपत्तीची गरज नाही. तुम्हाला पैशापेक्षा वेळेची जास्त गरज आहे आणि तुमचे आर्थिक व्यवस्थापन उत्तम असायला हवे. केवळ दानशूरपणा करण्यापेक्षा त्यातून उत्पन्न निर्माण करण्याचा प्रयत्न करायला हवा, असे त्या मानतात. त्या त्यांच्या प्रशिक्षण संस्थांमध्ये हीच रणनीती वापरतात. विद्यार्थ्यांसाठी प्रायोजक शोधले जातात. त्यातून नफा मिळत नाही, पण तोटाही होत नाही. यशस्वी होण्यासाठी नोकरीच्या बाजारपेठेची माहिती असणे आवश्यक असल्याचे त्या सांगतात. त्या म्हणतात की, "सध्या सायकॉलॉजी विषयाच्या शिक्षकांची मोठी मागणी आहे. त्यामुळे एक वर्षाचा डिप्लोमा पूर्ण करणाऱ्या मुलींना शाळा आणि इतर संस्थांमध्ये सहज नोकऱ्या मिळतात."

स्वतःच्या धर्मासोबतच इतर धर्मांच्या ग्रंथांची माहिती असणेही महत्त्वाचे असल्याचे त्या मानतात. त्या म्हणतात की, "आम्हाला आजच्या मुलांपेक्षा रामायणाबद्दल जास्त माहिती आहे. यामुळे आमचा दृष्टिकोन व्यापक होतो. म्हणूनच आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना धर्माबद्दल शिकवतो. कारण कोणताही धर्म द्वेष शिकवत नाही." अज्ञानामुळे समाजांमध्ये संशय आणि गैरसमज निर्माण होतात, असे त्यांना वाटते. इस्लामबद्दल बोलताना त्या सांगतात की, 'सलाम अलैकुम' चा अर्थ 'तुमच्यावर शांतता असो' असा होतो. मग एखादी व्यक्ती दुसऱ्याचे वाईट चिंतण्याची इच्छा कशी करू शकते?

५५ वर्षांच्या निखत फातिमा यांना तीन मुले आणि नातवंडे आहेत. आता त्यांना आपल्या जबाबदाऱ्यांमधून निवृत्त व्हायचे आहे. "मी आधीच यापैकी बहुतेक संस्थांचे नेतृत्व दुसऱ्यांकडे सोपवले आहे," असे त्या सांगतात. त्यांच्या बोलण्यातून अनेक दशकांच्या सेवेनंतर मिळणारे समाधान स्पष्टपणे जाणवते.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter