आयुष्यात खडतर संघर्ष असेल तर स्वप्न पाहणे आणि ते प्रत्यक्षात आणणे तितकेसे सोपे नसते. पण, चंद्रपूर जिल्ह्यातील वडसी या छोट्याशा गावातील एका मजुराच्या लेकीने हा समज मोडून काढला आहे. वडिलांनी भंगार गोळा करण्यासाठी केलेला मैलोन्मैल प्रवास आणि आईने शेतात रात्रंदिवस गाळलेला घाम, याच्या जोरावर शिक्षणाची पायाभरणी झालेल्या करिश्मा मेश्राम हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) वनसेवा परीक्षेत 'सहाय्यक वनसंरक्षक' (Assistant Conservator of Forests) पदावर झेप घेतली आहे.
नुकत्याच लागलेल्या या निकालात करिष्माने केवळ यशच मिळवले नाही, तर राज्यातील अनुसूचित जाती (SC) महिला उमेदवारांमध्ये ती प्रथम क्रमांकाने पात्र ठरली आहे.
करिश्माचे वडील, अनिरुद्ध हे अनेक वर्षे सायकलवरून खेडोपाडी फिरून भंगार गोळा करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. सध्या ते आणि तिची आई शेतमजुरी करून घर चालवतात. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असतानाही त्यांनी मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी कधीच टाळली नाही. या संघर्षमय प्रवासात करिश्माचे काका भास्कर मेश्राम यांनीही मोलाची आर्थिक मदत केली.
आपल्या परिस्थितीचे भान ठेवत आणि 'शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन आहे' हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विचार मनात बाळगून करिष्माने अभ्यासाला सुरुवातीपासूनच प्राधान्य दिले. तिचे प्राथमिक शिक्षण वडसीच्या जिल्हा परिषद शाळेत, तर माध्यमिक शिक्षण गोंदेडा गुरुदेव माध्यमिक शाळेत झाले. नवरगावच्या ज्ञानेश महाविद्यालयातून बी.एस्सी. पूर्ण केल्यानंतर तिने नागपूरमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले.
तिने 'नेट' (NET) परीक्षा देऊन प्राध्यापक होण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र, खाजगी महाविद्यालयांमध्ये 'डोनेशन'च्या अडथळ्यामुळे तो पर्याय शक्य झाला नाही. त्यामुळे तिने जिद्दीने स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडला.
नागपूरमध्ये एका सामाजिक संस्थेच्या मदतीने तिने काही काळ काढला. २०१७-१८ मध्ये 'बार्टी'ची (BARTI) शिष्यवृत्ती मिळाली आणि तिने पुण्यात तयारी सुरू केली. पण कोरोना काळात तिला गावी परतावे लागले. स्पर्धेतून बाहेर पडू की काय, अशी भीती मनात असतानाच, पुन्हा 'बार्टी'तर्फे UPSC साठी शिष्यवृत्ती मिळाली आणि तिला दिल्लीला जाण्याची संधी मिळाली.
प्रशिक्षणानंतर ती पुन्हा पुण्यात परतली. पुण्यात राहण्याचा, खाण्याचा आणि अभ्यासाचा खर्च भागवण्यासाठी तिने खानावळीमध्ये आणि अभ्यासिकेत अर्धवेळ काम केले. परिश्रम आणि चिकाटीला पर्याय नाही, हे तिने आपल्या कृतीतून सिद्ध केले.
आपल्या या यशाबद्दल बोलताना करिष्मा म्हणते, "अनेकदा अपयश आले; पण प्रत्येक वेळी मी स्वतःला उभं केलं. परिस्थिती बदलायची असेल तर अभ्यास आणि आत्मविश्वास हाच मार्ग आहे."
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -