मुरदाबादेतील इक्रम हुसेन यांच्या कोरीव कामाने भारावले पंतप्रधान मोदी!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 Months ago
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इक्रम हुसेन यांच्या कोरीव कामाचे कौतुक करताना
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इक्रम हुसेन यांच्या कोरीव कामाचे कौतुक करताना

 

दयाराम वशिष्ठ

उत्तर प्रदेशातील मुरदाबाद येथील इक्रम हुसेन तेव्हा १५ वर्षांचे होते. मुरदाबादच्याच एका गुरुद्वारातील व्यवस्थापकांनी त्यांना त्यांच्या आईचे नाव एका ॲल्युमिनियमच्या प्लेटवर कोरायला सांगितले. इक्रम शाळेत कधीच गेले नव्हते, पण वडिलांकडून धातूवर नक्षीकाम करण्याची कला त्यांनी नक्कीच आत्मसात केली होती. नावाचा विषय आला तेव्हा इक्रम थोडे संकोचले आणि प्रांजळपणे म्हणाले, "मी शिकलेला नाही, तुम्हीच हे नाव कागदावर लिहून द्या, म्हणजे मी ते व्यवस्थित कोरू शकेन."

त्यांनी त्या प्लेटवर इतके देखणे नाव कोरले की, त्या बदल्यात त्यांना १० रुपये मिळाले. या दहा रुपयांनी त्यांना विलक्षण आत्मविश्वास दिला आणि त्यांनी हेच काम गांभीर्याने करण्याचा निर्णय घेतला. आज तेच ६१ वर्षांचे इक्रम हुसेन एक राष्ट्रीय पुरस्कार विजेते कलाकार आहेत आणि त्यांच्या कलेची प्रशंसा खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

पंतप्रधान मोदी जेव्हा भारावून गेले...

गेल्या वर्षी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित १२ व्या 'ग्रामीण भारत महोत्सवात' पंतप्रधान नरेंद्र मोदी इक्रम यांच्या कोरीव कामाने भारावून गेले होते. तो क्षण इक्रम यांच्या आयुष्यातील सर्वात अभिमानास्पद ठरला. इक्रम एका ३ फुटी पितळी बरणीवर पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या दिवंगत आईची प्रतिमा कोरीत होते. पंतप्रधानांनी त्यांचे काम अत्यंत बारकाईने पाहिले आणि त्यांच्या या कलेची तसेच निष्ठेची पाठ थोपटून कौतुक केले.

गरिबीचा संघर्ष आणि वारसा

'पितळनगरी' म्हणून ओळखले जाणारे मुरदाबाद आपल्या देखण्या नक्षीकामासाठी जगभर प्रसिद्ध आहे. घरच्या आर्थिक ओढग्रस्तीमुळे आपल्याला शिक्षण घेता आले नाही, अशी खंत इक्रम आजही व्यक्त करतात. मात्र, त्यांनी कधीही उमेद हारली नाही. वयाच्या अवघ्या सातव्या वर्षापासून त्यांनी आपले आजोबा आणि वडील हाजी अब्दुल हमीद यांच्याकडे पितळावर नक्षीकाम करण्याचे धडे गिरवायला सुरुवात केली. त्यांचे काका हाजी गुलाम नबी हे देखील मुरदाबादेतील नामांकित कलाकार होते.

शिक्षणाबाबत विचारले की आजही त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावतात. घराची परिस्थिती इतकी बेताची होती की, शाळा सोडून कामाला लागण्याशिवाय त्यांच्याकडे गत्यंतर नव्हते. अख्खे कुटुंब रात्रंदिवस मेहनत करायचे, तरीही आठवड्याला हातावर जेमतेम पाच-सात रुपये पडायचे. पण इक्रम यांनी परिस्थितीला आपली कमजोरी बनू दिले नाही. काम करता करता त्यांनी कोरीव कामातील बारकावे इतके आत्मसात केले की, ते कोणत्याही चेहऱ्याची हुबेहूब प्रतिमा पितळावर उतरवू लागले.

सन्मानाची मोहोर आणि यशाची भरारी

इक्रम यांच्या कष्टाचे चीज झाले आणि २००४ मध्ये उत्तर प्रदेश सरकारने त्यांच्या उत्कृष्ट कोरीव कामासाठी त्यांना सन्मानित केले. तेव्हा मिळालेले ५,००० रुपयांचे रोख पारितोषिक त्यांच्यासाठी खूप मोठी रक्कम होती. इक्रम सांगतात की, जेव्हा ते बँकेत चेक जमा करायला गेले, तेव्हा बँक मॅनेजरने त्यांना सन्मानाने चहा दिला. हा मान-सन्मान त्यांच्यासाठी स्वप्नवत होता.

आज इक्रम हुसेन यांचा स्वतःचा व्यवसाय असून त्यांनी बँकेच्या कर्जावर कंपनी सुरू केली आहे. एकेकाळी आठवड्याला पाच रुपये कमावणारा हा कारागीर आज अनेक लोकांना रोजगार आणि प्रशिक्षण देत आहे. बिहार सरकारने ४०० हून अधिक कारागिरांना प्रशिक्षण देण्यासाठी त्यांची खास नियुक्ती केली आहे. त्यांच्या या कलेची नोंद 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड'मध्येही झाली आहे.

कलेतून जपला सामाजिक सलोखा

इक्रम हुसेन यांनी आपली कला केवळ व्यवसायापुरती मर्यादित न ठेवता, ती सामाजिक सलोखा जपण्यासाठी वापरली आहे. त्यांनी आपल्या वस्तूंवर सर्वधर्मीय प्रतीके कोरून बंधुभावाचा संदेश दिला आहे. समाजात प्रेम आणि भाईचारा वाढवण्यासाठी त्यांनी केलेल्या या कामाबद्दल त्यांना २०२२ मध्ये 'नॅशनल अवॉर्ड'ने गौरवण्यात आले.

"आपण सर्व एकाच फांदीची फुले आहोत, फक्त आपले रंग वेगळे आहेत. आपण द्वेषापेक्षा प्रेमाला महत्त्व दिले पाहिजे," असे इक्रम सांगतात. त्यांच्या कलेचा नमुना म्हणून त्यांनी एका फुलदाणीवर कोरलेले राम मंदिर आणि सुवर्ण मंदिरावरील ४० इंची फुलदाणीचे काम लखनौ संग्रहालयात पाहायला मिळते. त्यांना आतापर्यंत २० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

शून्यातून विश्व निर्माण कसं करावं, याचा इक्रम हुसेन यांनी दिलेला हा वस्तुपाठ आहे. त्यांचा संघर्ष, चिकाटी आणि कलेप्रती असलेली निष्ठा आजच्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter