डॉक्टर आईचा त्याग फळाला; मारूफ आणि मसरूरने JEEमध्ये रचला इतिहास

Story by  Bhakti Chalak | Published by  Bhakti Chalak • 5 h ago
मारूफ अहमद खान आणि मसरूर अहमद खान यांच्यासमवेत त्यांची आई डॉ. झीनत बेगम
मारूफ अहमद खान आणि मसरूर अहमद खान यांच्यासमवेत त्यांची आई डॉ. झीनत बेगम

 

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने सोमवारी जेईई मेन २०२६ च्या पहिल्या सत्राचा निकाल जाहीर केला. यामध्ये भुवनेश्वरच्या दोन जुळ्या भावांनी रचलेला इतिहास सध्या देशभर चर्चेचा विषय ठरला आहे. मारूफ अहमद खान आणि मसरूर अहमद खान या दोन भावांनी जेईई परीक्षेत सारखेच गुण मिळवले आहेत. दोघांनीही प्रत्येकी २८५ गुण मिळवले असून त्यांना ९९.९९८४५४३ असा एकसमान पर्सेंटाईल मिळाला आहे. 

या यशाच्या आकड्यांपेक्षाही त्यामागे असलेल्या त्यांच्या आईच्या बलिदानाची गोष्ट अधिक प्रेरणादायी आहे. या विद्यार्थ्यांचे वडील डॉ. मन्सूर अहमद खान हे फिजिशियन असून आयआयटी भुवनेश्वरच्या वैद्यकीय विभागाचे प्रमुख आहेत. त्यांची आई डॉ. झीनत बेगम या स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. दोन्ही मुलांच्या तयारीला पाठबळ देण्यासाठी त्यांनी ओडिसा पॉवर ट्रान्समिशन कॉर्पोरेशन लिमिटेड रुग्णालयातील आपल्या सरकारी नोकरीचा राजीनामा दिला. त्यांनी मुलांच्या अभ्यासासाठी आपली वैद्यकीय कारकीर्द पणाला लावली आणि आज मुलांनी त्याचे सोने करून दाखवले आहे.

या यशाबद्दल बोलताना मसरूर अहमद खान म्हणाला, "मी दहावीपासून कोटा येथे आहे. गेल्या ३ वर्षांपासून शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली कोचिंग मटेरियलचा सराव करत आहे. मला नेहमीच माझ्या आजूबाजूच्या वातावरणातून प्रेरणा मिळत राहिली आणि त्यामुळेच जेईई मेनमध्ये मला चांगले गुण मिळाले. मी आणि माझ्या भावाने एकत्र मिळून अभ्यास केला. आमची अभ्यासाची वेळही सारखीच असते. आम्ही एकमेकांना नेहमी प्रोत्साहित केले आणि एकमेकांकडून खूप काही शिकलो."

दुसरा भाऊ मारूफ अहमद खान याने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, "सुरुवातीपासूनच आम्ही एकत्र अभ्यास केला आणि शंकांचे निरसनही एकत्रच केले. निकाल अपेक्षेप्रमाणे न आल्यास आम्ही एकमेकांना धीर द्यायचो. यामुळे आमच्यात स्पर्धा निर्माण झाली आणि आमची कामगिरी सुधारली. आम्ही भुवनेश्वरचे आहोत. माझी आई सध्या आमच्यासोबत राहते. तिने केवळ आमच्यासोबत राहण्यासाठी आपली नोकरी सोडली. आता माझे लक्ष्य जेईई ॲडव्हान्स्ड उत्तीर्ण होणे आणि त्यानंतर आयआयटी बॉम्बेमध्ये कॉम्प्युटर सायन्स शाखेत प्रवेश घेण्याकडे आहे. भविष्यात मला आयएएस अधिकारी बनायचे आहे."

मुलांच्या यशासाठी डॉक्टर आईचा मोठा त्याग 

या यशाच्या मागे त्यांच्या आईचा खूप मोठा आणि धाडसी निर्णय दडलेला आहे. पेशाने डॉक्टर असलेल्या त्यांच्या आईने मुले दहावीत असताना एक मोठा निर्णय घेतला. स्पर्धा परीक्षेचे गांभीर्य ओळखून त्यांनी आपल्या वैद्यकीय कारकिर्दीला पूर्णविराम दिला. त्या स्वतःची नोकरी सोडून मुलांसोबत राजस्थानमधील कोटा येथे राहायला गेल्या. या दोन्ही मुलांनी आपल्या आईच्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. 

सलग तीन वर्षे कोटा येथे राहून त्यांच्या आईने घराची जबाबदारी सांभाळली आणि मुलांना मानसिक आधार दिला आणि प्रोत्साहित केले. या दोन्ही मुलांसाठी हे यश केवळ आयआयटीमधील प्रवेशापुरते मर्यादित नसून आईने त्यांच्यावर दाखवलेल्या विश्वासाचे हे फळ आहे. व्यावसायिक यश बाजूला ठेवून मुलांच्या स्वप्नांना प्राधान्य देणाऱ्या एका आईची ही गोष्ट अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.

मुलांच्या या घवघवीत यशाबद्दल वडील डॉ. मन्सूर अहमद खान यांनी अभिमान व्यक्त केला आहे. ते म्हणाले, "माझ्या दोन्ही मुलांनी पहिल्याच प्रयत्नात मिळवलेले हे यश पाहून मला खूप आनंद झाला. लहानपणापासूनच ते एकमेकांची ताकद राहिले आहेत. एकमेकांच्या उणिवा दूर करत त्यांनी यशाकडे झेप घेतली आहे. मात्र या यशाचा खरा आधार त्यांची आई आहे."

ते पुढे म्हणाले की, "त्यांची आई स्वतः स्त्रीरोगतज्ज्ञ आहे. मुलांच्या भविष्यासाठी तिने एका खासगी रुग्णालयातील आपली नोकरी सोडण्याचा मोठा निर्णय घेतला. मी आयआयटी भुवनेश्वर येथे वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना, तिने मात्र कोटा येथे राहून पूर्णवेळ मुलांच्या प्रवासासाठी स्वतःला वाहून घेतले. मुलांचे अभ्यासाचे वेळापत्रक, आरोग्य आणि पोषण अशा प्रत्येक गोष्टीची तिने काळजी घेतली. हे यश जितके मुलांचे आहे तितकेच तिच्या त्यागाचेही आहे."


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter 



Latest News