भक्ती चाळक
सोमवारी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आयपीएलच्या इतिहासात एका नव्या नावाचा डंका वाजला. २१ वर्षांच्या साकिब हुसेनने राजस्थान रॉयल्सविरुद्ध पदार्पणातच अवघ्या २४ धावांत ४ विकेट घेत चोख कामगिरी बजावली आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
संघर्षातून गवसली नवी दिशा
बिहारच्या गोपाळगंज या छोट्याशा गावातून आलेल्या साकिबचा आयपीएलपर्यंतचा प्रवास अत्यंत कठीण होता. त्याचे वडील रोजंदारीवर मजुरी करून दिवसाला दोनतीनशे रुपये कमवतात. पाच जणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे त्यांना कठीण जाते. अशा परिस्थितीत डॉक्टर किंवा इंजिनिअर होण्याचे स्वप्न पाहणे अशक्यच होते. सुरुवातीला साकिबला भारतीय सैन्यात भरती होऊन देशाची सेवा करण्याची इच्छा होती. पण क्रिकेटने त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकले.
लष्कराच्या भरतीसाठी धावताना गवसला हिरा
साकिबसारख्या हिऱ्याचा शोध क्रिकेटच्या मैदानावर लागला नाही, हे त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य. गोपाळगंज क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दिवंगत तुन्ना गिरी मॉर्निंग वॉकला गेले होते. एकदा त्यांनी मिंज स्टेडीयमवर लष्कराच्या शारीरिक चाचणीसाठी सराव करणाऱ्या साकिबला पाहिले. त्याचा वेग पाहून गिरी थक्क झाले. त्यांनी ही माहिती पाटण्यातील जेननेक्स्ट क्रिकेट अकादमीचे प्रशिक्षक रॉबिन सिंग यांना दिली. आणि तिथूनपुढे सुरु झाला साकिबचा क्रिकेटसाठीचा प्रवास.
साकिबची परिस्थिती अत्यंत बेताची असल्याने त्याला सुरुवातीच्या काळात पाटण्याला प्रशिक्षणासाठी येणेही परवडणारे नव्हते. रॉबिन सिंग यांनी मोफत प्रशिक्षणाची तयारी दर्शवली, पण प्रवासाचा खर्चही पेलवणारा नव्हता. अखेर काही महिन्यांनंतर गोपाळगंज क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष दिवंगत तुन्ना गिरी यांनी रॉबिन सिंग यांना जिल्ह्यात जेननेक्स्ट अकादमीची शाखा उघडण्यास सांगितले.
याबाबत बोलताना रॉबिन सिंग म्हणतात की, “गिरी यांनी मला गोपाळगंजमध्ये अकादमीसाठी जागा उपलब्ध करून दिली. साकिब तिथे नियमित येण्यास तयार झाला.आणि तिथून त्याचे प्रशिक्षण सुरु झाले.”

साकिबचे प्रशिक्षक रॉबिन सिंग
बिहार क्रिकेट लीगमध्ये दमदार कामगिरी
बिहार क्रिकेट लीगच्या (बीसीएल) चाचणीसाठी जेव्हा साकिब गेला, तेव्हा त्याच्याकडे क्रिकेटसाठी लागणारे खास स्पाईक्स शूज नव्हते. चेंडू टाकताना तो मैदानावर घसरून पडला. पण त्याने टाकलेला चेंडू इतका वेगवान होता की गया ग्लॅडिएटर्सचे मालक अशोक कुमार यांनी त्याला तातडीने संघात घेण्याचा निर्णय घेतला. ज्या खेळाडूला यापूर्वी जिल्हा स्तरावरचा अनुभव नव्हता, त्याने चाचणी सामन्यात रणजीचा अनुभव असलेल्या फलंदाजांना शून्यावर बाद करून सर्वांना चकित केले.
या दमदार कामगिरीनंतर साकिबने कूच बिहार ट्रॉफी आणि विनू मंकड ट्रॉफीमध्ये बिहारचे प्रतिनिधित्व केले, एनसीए हाय परफॉर्मन्स कॅम्प आणि एमआरएफ पेस फाउंडेशनमध्ये स्थान मिळवले आणि अखेरीस तो आयपीएलमध्ये पोहोचला.
Sakib Hussain — "Spike shoes are quite expensive. If we buy them, where will we get the money to eat?"
— ` (@WorshipDhoni) April 14, 2026
Sakib's Mother — "I sold my own jewelry to buy him those shoes"
Their sacrifices have truly paid off. 🥹❤️ pic.twitter.com/ehLzuziq7i
आयपीएलपर्यंत पोहोचण्यासाठीचा त्याचा प्रवास अत्यंत खडतर होता. क्रिकेट खेळण्यासाठी लागणारे स्पाइक शूज विकत घेणे त्याच्यासाठी कठीण होते. साकिबने एका मुलाखतीत भावनिक होत त्यावेळची द्विधा मनःस्थिती सांगितली.
तो म्हणाला होता की, "क्रिकेटसाठी लागणारा तो बूट खूप महाग येतो. बॉलिंगसाठी लागणारे स्पाईक्स बूट १० ते १५ हजार रुपयांना मिळतात. आता आम्ही जर इतक्या महागड्या शूजवर पैसे खर्च केले असते, तर घरात खायचे वांदे झाले असते."
मुलाच्या जिद्दीमुळे आईचा धाडसी निर्णय
आपल्या मुलाची खेळाबद्दलची जिद्द आणि आर्थिक परिस्थितीमुळे त्याची झालेली द्विधावस्था पाहून त्याच्या आईने आयुष्यातील सर्वात मोठा आणि धाडसी निर्णय घेतला. त्याच्या आईने केलेला त्याग खऱ्या अर्थाने त्याच्यासाठी क्रिकेटची प्रेरणा ठरला.
माध्यमांशी बोलताना साकिबची आई सुबुक्तारा खातून या भावूक झाल्या. त्या म्हणतात, "तो माझ्याकडे आला आणि रडायला लागला की, माझ्याकडे शूज नाहीत, मी कसा खेळू? त्याला शूज घेऊन देण्याइतके पैसे माझ्याकडे नव्हते. मग मी माझे स्वतःचे दागिने विकले आणि त्याला ते महागडे शूज घेऊन दिले."

साकिब हुसेनचे कुटुंब
या संघर्षानंतर अखेर आयपीएल २०२६ च्या लिलावात सनरायझर्स हैदराबादने ३० लाख रुपयांना त्याला आपल्या ताफ्यात सामील केले. १३ एप्रिल २०२६ ला त्याला पदार्पणाची संधी मिळाली आणि त्याने त्याचे सोने केले. सहकारी पदार्पणवीर प्रफुल हिंगेसोबत मिळून त्याने राजस्थानची फलंदाजीला खिंडार पाडले. पदार्पणात ४ विकेट घेणारा तो सातवा भारतीय गोलंदाज ठरला असून त्याने अश्विनी कुमारच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे.
साकिबने आपल्या या यशाचे श्रेय हैदराबादचे गोलंदाजी प्रशिक्षक वरुण ॲरॉन यांना दिले आहे. साकिब म्हणाला, "प्रशिक्षक वरुण ॲरॉन हे गेल्या चार वर्षांपासून माझ्यावर काम करत आहेत. त्यांनीच मला पदार्पणाच्या सामन्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार केले."
आयपीएलमधील दमदार कामगिरीनंतर माजी क्रिकेटपटू इरफान पठाणनेदेखील साकिबचे कौतुक केले. त्याने आपल्या सोशल मीडियावर लिहिले की, "बिहारचा साकिब हुसेन भारतीय सैन्याचा भाग होऊ इच्छित होता. तो नक्कीच अत्यंत तंदुरुस्त आहे. त्याच्या आयपीएल कारकिर्दीची ही एक शानदार सुरुवात आहे."
Sakib Hussain from Bihar wanted to be part of Indian Army. He certainly looks solid fit. Brilliant start to his IPL Career.
— Irfan Pathan (@IrfanPathan) April 13, 2026
आयपीएलमध्ये चमकलेल्या या नव्या ताऱ्याने हजारो तरुणांना स्वप्न पाहण्याचे धाडस दिले आहे. साकिबचा आत्ता सुरु झालेला हा प्रवास त्याला कुठपर्यंत घेऊन जाणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -
Awaz Marathi WhatsApp Group
Awaz Marathi Facebook Page
Awaz Marathi Twitter