दुबईचे क्राउन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम यांच्या हस्ते सन्मान स्विकारताना शिक्षणतज्ज्ञ रूबल नागी
मुंबईतील प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ रूबल नागी यांनी बुधवारी दुबईत आयोजित वर्ल्ड गव्हर्नमेंट समिटमध्ये 'ग्लोबल टीचर प्राईज २०२६' हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार पटकावला आहे. 'जेम्स एज्युकेशन' तर्फे देण्यात येणाऱ्या या पुरस्काराला शिक्षण क्षेत्रातील नोबेल म्हणून ओळखले जाते. या पुरस्काराचे हे दहावे वर्ष असून रूबल नागी यांना १० लाख डॉलर्सचे बक्षीस मिळाले आहे. दुबईचे क्राउन प्रिन्स शेख हमदान बिन मोहम्मद बिन रशीद अल मक्तूम यांच्या हस्ते रूबल नागी यांना हा बहुमानाचा चषक प्रदान करण्यात आला.
'लिव्हिंग वॉल्स ऑफ लर्निंग'
रूबल नागी यांनी दुर्लक्षित भिंतींचे रूपांतर शैक्षणिक भित्तीचित्रांमध्ये केले आहे. या भित्तीचित्रांच्या माध्यमातून त्या वाचन, लेखन आणि अंकगणितासह विज्ञान, इतिहास, सार्वजनिक आरोग्य आणि पर्यावरणाविषयीची जागरूकता पसरवत आहेत. त्यांच्या या अनोख्या कार्याची दखल घेऊनच त्यांना हा सन्मान मिळाला आहे. गेल्या दोन दशकांपासून त्यांनी कलेचा शैक्षणिक साधन म्हणून वापर करून १० लाखांहून अधिक मुलांना मुख्य प्रवाहातील शिक्षणाशी जोडले आहे. या जागतिक पुरस्कारासाठी १३९ देशांमधून ५००० पेक्षा जास्त नामांकने आणि अर्ज आले होते, त्यातून रूबल नागी यांची निवड झाली आहे.
काश्मीरमधून कौतुकाचा वर्षाव
मूळच्या जम्मू-काश्मीरच्या असलेल्या रूबल नागी या एक कलाकार, शिक्षिका आणि समाजपरिवर्तक म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या या विजयामुळे जम्मू-काश्मीरमधील नागरिकांनी त्यांचे भरभरून कौतुक केले असून त्यांना राज्याची कन्या म्हणून संबोधले आहे. यापूर्वी हा सन्मान मिळवलेले रणजितसिंह डिसले यांनीही रूबल यांच्या यशाचे कौतुक केले आहे. पुरस्कार मिळाल्याचा आनंद व्यक्त करताना रूबल नागी यांनी भारतात असलेल्या त्यांच्या पतीला फोन करून ही बातमी दिली. या संवादाचा व्हिडिओ सध्या एक्स सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे.
समाजकार्याचा वसा
'रूबल नागी आर्ट फाऊंडेशन' या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी भारतभर ८०० हून अधिक शैक्षणिक केंद्रे उभारली आहेत. १०० पेक्षा जास्त अल्प उत्पन्न असलेल्या वस्त्या आणि गावांमध्ये मुलांसाठी सुरक्षित आणि प्रेरणादायी जागा त्यांनी निर्माण केल्या. ही केंद्रे शाळाबाह्य मुलांना पुन्हा नियमित शिक्षणाकडे वळवण्यासाठी मदत करतात. तसेच शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत करणे, मानसिक आधार देणे आणि सर्जनशील उपक्रम राबवणे अशा प्रकारचे काम या केंद्रांमध्ये केले जाते.
भिंतींना शिक्षणाचे वर्ग बनवणे, ही नागी यांच्या कामाची मुख्य संकल्पना आहे. त्या स्वतः भारतभर फिरून शैक्षणिक केंद्रांमधील मुलांशी संवाद साधतात आणि शिक्षकांना मार्गदर्शन करतात. त्यांनी ६०० पेक्षा जास्त शिक्षक आणि स्वयंसेवकांना प्रशिक्षित केले आहे. मुलांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक गरजा पूर्ण करणारे एक उत्तम मॉडेल त्यांनी तयार केले आहे.
रूबल नागी यांच्या उपक्रमांमुळे मुलांच्या शिक्षणातील गोडी लक्षणीयरीत्या वाढली आहे. 'मिसाल मुंबई' या उपक्रमाचे नेतृत्व देखील त्यांनी केले असून त्याअंतर्गत १,५०,००० घरांची दुरुस्ती आणि रंगकाम करण्यात आले. सध्या ही संस्था देशातील १६३ हून अधिक झोपडपट्ट्या आणि ग्रामीण भागात कार्यरत आहे. या फाउंडेशनचा मुख्य उद्देश मुलांचा विकास करून त्यांना जबाबदार आणि नीतिमान नागरिक बनवणे हा आहे.
पुरस्काराच्या रकमेतून उभारणार शैक्षणिक केंद्रे
पुरस्कारापोटी मिळालेल्या १० लाख डॉलर्सच्या रकमेचा विनियोग त्या सध्याची केंद्रे वाढवण्यासाठी, शिक्षकांना प्रशिक्षित करण्यासाठी आणि एका मोफत व्यावसायिक प्रशिक्षण संस्थेच्या स्थापनेसाठी करणार आहेत. या संस्थेत तरुणांना व्यावसायिक कौशल्ये आणि डिजिटल साक्षरतेचे मोफत प्रशिक्षण दिले जाईल. वंचित मुले आणि तरुणांना स्वावलंबी बनवणे आणि त्यांना सन्मानजनक रोजगार मिळवून देणे, हे त्यांचे मुख्य ध्येय आहे.
'ग्लोबल टीचर प्राईज' हा पुरस्कार 'जेम्स एज्युकेशन' कडून दिला जातो आणि 'वर्की फाऊंडेशन' द्वारे युनेस्कोच्या सहकार्याने याचे आयोजन केले जाते. शिक्षण क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या अपवादात्मक शिक्षकांचा गौरव करणे, हा या पुरस्काराचा मुख्य हेतू आहे.