खदिजा अल-कुब्रा : १४०० वर्षांपूर्वीच्या बिझनेस आयकॉन!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

जेब अख्तर 

सहाव्या शतकातील अरबस्तान. स्त्रियांचे जग घराच्या चार भिंतींत अडकले होते. शिक्षण किंवा स्वातंत्र्याचा विचारही कोणाच्या मनात नव्हता. अशा काळात एक महिला पुढे आली. तिने परिस्थितीशी तडजोड केली नाही. उलट तिने परिस्थितीच बदलून टाकली.

त्या होत्या खदिजा बिंत खुवैलद. पहिल्या पतीच्या निधनानंतर त्यांनी पतीचा व्यवसाय तर सांभाळलाच, पण त्या मक्केतील सर्वात प्रतिष्ठित महिला व्यावसायिक बनल्या. त्याच आत्मविश्वासाने त्यांनी प्रेषित मुहम्मद बिन अब्दुल्ला यांना लग्नाचा प्रस्ताव दिला.

ज्या समाजात स्त्रियांचा आवाज अनेकदा दाबला जात असे, तिथे खदिजा यांनी केवळ आपला आवाज उठवला नाही, तर सन्मान आणि प्रभावही निर्माण केला. त्यांची कहाणी सांगते की खरी उद्योजकता म्हणजे फक्त व्यवसाय उभा करणे नव्हे, तर आपल्या परिस्थितीची आणि मानसिकतेची बंधने तोडणे होय.

खदिजा बिंत खुवैलद यांचे जीवन आजही भारतीय मुस्लिम महिलांसाठी केवळ शक्तीचा स्रोत नाही, तर एक धडा आहे. हे कसे ते आपण समजून घेऊया.

स्वावलंबनाचे उदाहरण

वडील खुवैलद यांच्या निधनानंतर खदिजा यांनी कौटुंबिक व्यवसाय हाती घेतला. त्यांचे उंटांचे व्यापारी ताफे मक्केहून सीरिया, येमेन आणि बसरापर्यंत प्रवास करत असत. मसाल्याचे पदार्थ, कापड, परफ्यूम आणि धान्याचा व्यापार चालत असे. आपल्या एजंट्समध्ये त्या प्रामाणिकपणा आणि कार्यक्षमतेसाठी ओळखल्या जात. इतिहासकार इब्न साद लिहितात, "मक्केच्या बाजारात जर कुठल्या नावाची हमी असेल, तर ते नाव खदिजा यांचे होते."

भारतीय संदर्भात खदिजा बिंत खुवैलद आजही मुस्लिम महिलांसाठी शक्ती आणि प्रेरणेचे प्रतीक आहेत. त्यांची कहाणी दाखवून देते की स्वावलंबन ही आधुनिक संकल्पना नाही, तर ती आपल्या परंपरांमध्ये खोलवर रुजलेली आहे.

आज केरळमधील नझरीन बानो मसाला निर्यातीत नाव कमवत आहेत किंवा अलिगडमधील शाहीन मु्नवर 'इक्रा डिझाइन्स'द्वारे प्रत्येक घरात रोजगार पोहोचवत आहेत; या महिला मक्केच्या रस्त्यांवर शतकांपूर्वी सुरू झालेल्या त्याच वारशाचे प्रतिबिंब आहेत.

खदिजा आपल्या काळातील सर्वात विश्वासार्ह व्यापाऱ्यांपैकी एक मानल्या जात. व्यवहारात त्यांनी कधीही फसवणूक किंवा दिखावा केला नाही. ‘व्यवहारात खरे असा, आशीर्वाद आपोआप मिळतील.’, हे त्यांचे तत्त्वज्ञान होते.

याच प्रामाणिकपणामुळे तरुण मुहम्मद त्यांच्याकडे आकर्षित झाले. ते देखील त्यांच्या सरळमार्गी स्वभावासाठी आणि सचोटीसाठी प्रसिद्ध होते.

भारतीय मुस्लिम उद्योजकांच्या व्यवसायातही हाच प्रामाणिकपणा दिसून येतो. हैदराबादच्या रुक्साना हबीब यांनी ‘ट्रू ट्रेडर्स’ हा ऑनलाइन व्यवसाय सुरू केला, तिथे त्या ‘ट्रेंडपेक्षा विश्वास महत्त्वाचा’ या तत्त्वाचे पालन करतात.

तसेच लखनौच्या हिना अहमद यांचा बेकरी ब्रँड ‘हिनाज होम बाइट्स’ केवळ चवीचे नव्हे, तर विश्वासाचे प्रतीक बनला आहे. कारण त्या प्रत्येक ग्राहकासाठी शुद्धता आणि पारदर्शकतेला प्राधान्य देतात. या कथांमध्ये तोच धडा आहे जो खदिजा यांनी शिकवला - "प्रतिष्ठा हीच खरी पुंजी आहे."

खदिजा यांच्या दूरदृष्टीचे सर्वात मोठे उदाहरण म्हणजे त्यांनी तरुण मुहम्मद यांना आपल्या व्यापारी ताफ्याचे प्रमुख म्हणून नेमले. हा केवळ व्यावसायिक निर्णय नव्हता, तर ही त्यांच्या सखोल दृष्टीची साक्ष होती. त्यांनी लिंगभेद न करता केवळ क्षमतेच्या आधारे कौशल्य पाहिले. या भागीदारीचे पुढे एका आध्यात्मिक क्रांतीत रूपांतर झाले आणि या क्रांतीने संपूर्ण जगाची दिशा बदलली.

भारतातील काही आधुनिक महिला आजही हीच दृष्टी जगत आहेत. केरळच्या मिन्हा रशीद यांनी "थ्रेड्स ऑफ होप" नावाची सहकारी संस्था सुरू केली आहे, जिथे २०० हून अधिक स्थानिक महिला हस्तकला बनवून स्वावलंबी होत आहेत.

मिन्हा म्हणतात, "नफ्यापेक्षा आम्ही आत्मविश्वास निर्माण करत आहोत." खदिजा यांचीही तीच दृष्टी होती: खरे नेतृत्व इतरांच्या उत्कर्षात असते.

खदिजा आपल्या नफ्यातील मोठा हिस्सा गरीब, अनाथ आणि विधवांच्या मदतीसाठी गुंतवत असत. इतिहासकारांच्या मते, त्यांनी कठीण काळात मक्केतील शेकडो कुटुंबांना आर्थिक मदत केली. आणि जेव्हा प्रेषितांना सामाजिक बहिष्काराला सामोरे जावे लागले, तेव्हा खदिजा यांनी आपली सर्व संपत्ती त्या संघर्षात लावली. आजची "सोशल आंत्रप्रेन्योरशिप" (सामाजिक उद्योजकता) ही याच विचारांची आधुनिक अभिव्यक्ती आहे.

दिल्लीच्या सना खान यांनी "मदर्स बास्केट" हा उपक्रम सुरू केला आहे. तिथे ग्रामीण महिला सेंद्रिय अन्न पिकवतात आणि नफ्यातील काही भाग मुलांच्या शिक्षणासाठी जातो. हे तेच तत्त्वज्ञान आहे - उद्देशासह नफा (Profit with Purpose).

संघर्ष, समतोल आणि संयम

खदिजा यांचे जीवन संघर्षांनी भरलेले होते. पतीचा मृत्यू, व्यवसायाची जबाबदारी, सामाजिक टीका आणि त्यानंतर सुरुवातीच्या काळात इस्लामचा आर्थिक बहिष्कार.

तरीही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी आपल्या घराला आधाराचे केंद्र बनवले, प्रेषितांचे मनोबल वाढवले आणि आपल्या आर्थिक समजने नव्या समाजाचा पाया भक्कम केला.

आजच्या भारतीय मुस्लिम महिला काम, कुटुंब आणि सामाजिक अपेक्षांचा समतोल साधताना हाच बाणा दाखवतात. खरंच, महिलेची खरी ताकद तिच्या संयम आणि दिशेमध्ये असते.

खदिजा अल-कुब्रा इस्लामवर विश्वास ठेवणाऱ्या पहिल्या महिला होत्या. त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, त्या जगातील पहिल्या नोंदणीकृत महिला व्यावसायिक मानल्या जातात. त्यांची प्रेरणा सीमा किंवा धर्मापुरती मर्यादित नाही, तर त्या माणुसकी आणि स्वावलंबनाचे उदाहरण आहेत.

आज भारतातील मुस्लिम महिला कपड्यांपासून तंत्रज्ञानापर्यंत प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत. मुंबईची फातिमा बानो "टेक फॉर हर" द्वारे महिलांना कोडिंग शिकवते, तर जोधपूरची आफ्रिन शेख बायोफ्युएल निर्मितीमध्ये स्टार्टअप चालवते. या सर्वांच्या कथांमध्ये खदिजा यांचा वारसा श्वास घेतो. त्यांचे जीवन आपल्याला शिकवते, "श्रद्धा आणि नैतिकतेने मिळवलेले यश हेच खरे यश आहे."

विद्वानांच्या नजरेतून खदिजा

इतिहासकार आणि विद्वानांनी खदिजा यांच्या कार्याची दखल घेतली आहे. इब्न हिशाम नमूद करतात की, जेव्हा प्रेषित मुहम्मद यांनी आपल्या व्यवहारात प्रामाणिकपणा दाखवला, तेव्हा खदिजा यांनी आपले व्यवहार त्यांच्यावर सोपवण्यास सुरुवात केली. 

इब्न इशाक यांच्या मते, खदिजा मक्केतील अशा काही मोजक्या महिलांपैकी होत्या, ज्यांच्याकडे केवळ भांडवल नव्हते, तर प्रत्येक भागीदारीत त्यांचा शब्द महत्त्वाचा असे आणि त्यांचे प्रत्येक व्यवहार विश्वासावर आधारित होते.

अल-तबरी यांनी लिहून ठेवले आहे की, मक्केतून बाहेर पडणाऱ्या निम्म्या व्यापारी ताफ्यांवर खदिजा यांचे नाव असे आणि त्यांचा व्यापार सीरिया, येमेन व इजिप्तपर्यंत पसरला होता. 

अल-मक्रीझी सांगतात की, खदिजा आपल्या कर्मचाऱ्यांशी न्यायाने आणि करुणेने वागत असत; त्या नफ्याला इतरांच्या मदतीचे साधन मानत.

मुहम्मद हमीदुल्ला यांच्या मते, खदिजा यांची व्यावसायिक दृष्टी इतकी स्पष्ट होती की, आजचे बिझनेस मॉडेल्सही त्यांच्याकडून खूप काही शिकू शकतात. 

तर डॉ. तारिक रमजान म्हणतात की, खदिजा यांचा सर्वात मोठा वारसा हा होता की, त्यांनी नैतिकतेला व्यवसायाच्या केंद्रस्थानी ठेवले; त्यांच्यासाठी यश हे विश्वास आणि जबाबदारीचे दुसरे नाव होते.


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter