"दहशतवाद्यांचे व्हिडिओ दाखवू नका!"; केंद्र सरकारचा टीव्ही चॅनेल्सना थेट इशारा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने मंगळवारी (१८ नोव्हेंबर २०२५) टीव्ही चॅनेल्सना कडक ताकीद दिली आहे. कार बॉम्बस्फोटाशी संबंधित संवेदनशील सामग्री, तसेच 'हिंसक कृत्यांचे समर्थन करणाऱ्या आरोपींचे व्हिडिओ' प्रसारित करण्यापासून दूर राहावे, असे आवाहन मंत्रालयाने केले आहे.

सोमवारी (१० नोव्हेंबर) दिल्लीत लाल किल्ल्याजवळ ज्या डॉक्टरने कथितरित्या स्फोट घडवला, त्या उमर उन नबी याचा एक जुना व्हिडिओ काही वृत्तवाहिन्यांवर प्रसारित झाल्यानंतर काही तासांतच हा इशारा जारी करण्यात आला.

मंत्रालयाने म्हटले आहे की, "लाल किल्ला स्फोटाशी संबंधित कथित व्यक्तींचे व्हिडिओ काही वृत्तवाहिन्या दाखवत आहेत. ते त्यांच्या हिंसक कृत्यांचे समर्थन करत आहेत. तसेच, स्फोटके कशी बनवायची याची माहिती/व्हिडिओही प्रसारित करत आहेत, ही बाब मंत्रालयाच्या निदर्शनास आली आहे."

"असे प्रसारण अनवधानाने हिंसाचाराला प्रोत्साहन देऊ शकते, सार्वजनिक शांतता भंग करू शकते आणि राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका निर्माण करू शकते. त्यामुळे अशा प्रकरणांचे वार्तांकन करताना सर्व टीव्ही वाहिन्यांनी अत्यंत तारतम्य आणि संवेदनशीलतेचा वापर करावा," असा सल्ला मंत्रालयाने दिला.

मंत्रालयाने स्पष्ट केले की, "प्रसारणकर्त्यांनी 'केबल टेलिव्हिजन नेटवर्क्स (नियमन) कायदा, १९९५' अंतर्गत असलेल्या 'कार्यक्रम आणि जाहिरात संहिते'चे कठोरपणे पालन करणे आवश्यक आहे. अशा प्रकारचे प्रसारण 'केबल टेलिव्हिजन नेटवर्क नियमां'चे उल्लंघन करू शकते."

"हिंसेला प्रोत्साहन देणारी, कायदा व सुव्यवस्थेविरुद्ध जाणारी किंवा राष्ट्रविरोधी वृत्तीला बळ देणारी सामग्री दाखवू नये. तसेच, राष्ट्राच्या अखंडतेवर परिणाम करणारी कोणतीही गोष्ट नसावी," असे नियम मंत्रालयाने अधोरेखित केले.

"अवैध कारवायांना मदत करणारी किंवा त्यांना प्रोत्साहन देणारी कोणतीही दृश्ये प्रसारित करणे टाळावे," असा सल्लाही मंत्रालयाने सर्व टीव्ही चॅनेल्सना दिला.