सोलापूरच्या मुस्लिमबहुल शाळेच्या मुलींनी रचला इतिहास

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 8 h ago
बेगम कमरुन्निसा कारीगर हायस्कूलच्या विद्यार्थिनी
बेगम कमरुन्निसा कारीगर हायस्कूलच्या विद्यार्थिनी

 

सोलापूर जिल्हा क्रीडा परिषद आणि सोलापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शहरस्तरीय शालेय नेटबॉल स्पर्धेत, बेगम कमरुन्निसा कारीगर गर्ल्स हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या १४ वर्षांखालील मुलींच्या संघाने उपविजेतेपद पटकावून एक चमकदार कामगिरी केली आहे. केवळ खेळातच नव्हे, तर शिक्षणातही अव्वल असणाऱ्या या मुलींनी आपल्या यशाने एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

काल १६ ऑक्टोबर रोजी रॉजर्स इंग्लिश मीडियम स्कूल येथे झालेल्या या स्पर्धेत, बेगम कमरुन्निसा कारीगर हायस्कूलच्या संघाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. त्यांच्या या विजय संघात कायनात शेख, मेहरीन पटेल, आलीना शेख, हुर्या शेख, नुजहत शेख, तहरीम पठाण, अक्सा पठाण, समीना मिरजकर, सायमा पठाण, अंज़लना नाडेवाले, हुमेरा तारकश आणि माहेनुर फुलारी या खेळाडूंचा समावेश होता.

या कर्तबगार मुली केवळ मुस्लीम समाजासाठीच नव्हे, तर सर्व भारतीयांसाठी प्रेरणा बनल्या आहेत. कौतुकाची बाब म्हणजे, खेळासोबतच शिक्षणातही सर्वोच्च शिखर गाठण्याची त्यांची विजिगीषू वृत्ती (जिंकण्याची इच्छा) हे दाखवून देते की, महिला, विशेषतः मुस्लीम महिलाही मोठी स्वप्ने बाळगून आहेत. योग्य संधी आणि कुटुंबाचे सहकार्य मिळाल्यास कोणतेही ध्येय त्यांच्यासाठी छोटे नाही.

या संघाला क्रीडा शिक्षिका सईदा दारूवाले, अनिसा नालबंद, वसीम बागवान आणि मोईम सय्यद यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या शानदार यशाबद्दल, शाळेच्या प्राचार्या सौ. तहसीना शेख, अशफाक मनियार, आरीफ पठाण आणि सर्व शिक्षक वर्गाने विजयी संघाचे कौतुक केले आहे. सोलापूरच्या बेगम कमरुन्निसा कारीगर हायस्कूलच्या या मुलींना ‘आवाज मराठी’कडून हार्दिक शुभेच्छा!