पंजाबचे शाही इमाम मौलाना उस्मान रहमानी लुधियानवी धर्मगुरू असले तरी त्यांची ओळख त्याहून अधिकची आहे. ते कृतिशील सामाजिक कार्यकर्ते म्हणूनही ओळखले जातात. नुकतेच पंजाबमध्ये आलेल्या महापुरात त्यांनी धर्माच्या भिंती तोडून मानवतेच्या भावनेने पूरग्रस्तांची सेवा केली होती.
आता ते 'आय लव्ह मोहम्मद' वादानंतर मुस्लिम तरुणाईला योग्य दिशा दाखवण्यासाठी मैदानात उतरले आहेत. "प्रेषितांवरील प्रेम हे मोर्चे आणि मिरवणुका काढून सिद्ध होत नाही, ते तर मुस्लिमांच्या रक्तात आणि चारित्र्यात वसलेले आहे. आंदोलनांची ही नवीन पद्धत बदलायला हवी," अशा कठोर शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.
एका सभेत बोलताना त्यांनी मुस्लिम समाजाला आणि विशेषतः नेतृत्वाला आरसा दाखवला. ते म्हणाले, "आपण नमाज न पढता रस्त्यावर उतरायचे आणि तोडफोड करायची, हे कसे चालेल? मग आपल्यावर गुन्हे दाखल होतात आणि आपण सहा-सहा महिने तुरुंगात खितपत पडतो. त्यावेळी कोणी विचारायलाही येत नाही. आपण विचार केला पाहिजे की, ही इस्लामची शिकवण नाही. हा प्रेषितांच्या प्रेमाचा अपमान आहे."
खरे प्रेषितप्रेम म्हणजे प्रेषितांनी सांगितलेल्या शिकवणुकीचे पालन करणे, असे ते म्हणाले. त्यांनी काही उदाहरणांनी हे स्पष्टही केले. ते म्हणाले की, "परस्त्री किंवा परपुरुषाकडे पाहताना आपली नजर झुकवणे, एखादी वस्तू विकताना ग्राहकाला मापात थोडे जास्त देणे, शक्तिशाली असूनही आपल्यापेक्षा दुर्बळांना माफ करणे आणि गरिबांना मदत करण्याची संधी मिळाल्यास पुढे होऊन मदत करणे, हीच प्रेषितांच्या खऱ्या अनुयायांची ओळख आहे."
'आय लव्ह मोहम्मद’ वादानंतर मुस्लिम नेतृवाच्या भूमिकेवर ताशेरे ओढताना शाही इमाम म्हणाले, "कुठे आहेत मौलवी आणि नेते? 'आय लव्ह मोहम्मद'चा मुद्दा १५-२० दिवसांपासून पेटला आहे, पण एकाही मोठ्या मौलवीचे, खासदाराचे किंवा मंत्र्याचे निवेदन आले नाही. आज जर वर्गणी गोळा करायची असेल किंवा धार्मिक सभा असेल, तर प्रत्येक मशिदीत आणि मदरशात घोषणा होईल. पण आज जेव्हा समाज दुःखात आहे, वेदनेत आहे, तेव्हा सगळे गायब आहेत."
त्यांनी तरुणांना सूचना केली की, “ जर काही करायचेच असेल, तर रीतसर आपल्या नेत्यांना सांगा की त्यांनी मैदानात उतरावे, सरकारशी बोलावे आणि एक निवेदन तयार करावे. जेणेकरून प्रशासनाला तुमच्या तक्रारींची माहिती मिळेल. पण असे काहीच झाले नाही आणि आता तरुण त्याची किंमत मोजत आहेत.”
सरकारवर आरोप करण्यापेक्षा, आपल्या नेत्यांनी सरकारशी चर्चा का केली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, "सरकारने तुम्हाला सांगितले नाही की नेत्याशिवाय रस्त्यावर उतरा आणि आंदोलन करा. उलट सरकार तर म्हणत आहे की तुमच्या नेत्यांसोबत या आणि चर्चा करा. पण सरकारशी तर कोणी बोलायलाच तयार नाही. उत्तर प्रदेशात ही घटना घडली, पण तिथल्या एकाही मोठ्या मौलवीने किंवा धर्मपंडिताने सरकारशी संपर्क साधला का?”
शेवटी मुस्लीम तरुणाईला मार्गदर्शन करत शाही इमाम म्हणाले, “जर कोणाला भेटायचे असेल, तर त्याची एक पद्धत असते, निवेदन दिले जाते. कार्यालयाबाहेर घिरट्या घातल्याने, मोर्चे काढल्याने प्रश्न सुटत नाहीत. उलट आणखी चिघळतात."
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -