डॉ. जफर डारिक कासमी
सय्यद सबाहुद्दीन अब्दुर रहमान हे एक प्रतिष्ठित विद्वान म्हणून ओळखले जातात. हिंदू-मुस्लिम ऐक्य आणि भारतातील शांततापूर्ण सहजीवनाच्या विचारांमध्ये त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.
१८ नोव्हेंबरला त्यांची पुण्यतिथी असते. त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा नव्याने आढावा घेण्याची हीच योग्य वेळ आहे.
मूळचे पाटणा जिल्ह्यातील देसना गावचे असलेले सय्यद सबाहुद्दीन १९३५ मध्ये 'दारुल मुसन्निफिन' (शिबली अकादमी) मध्ये रुजू झाले. ही संस्था ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संशोधनासाठी प्रसिद्ध आहे. इथेच त्यांच्या अभ्यासाला नवी दिशा मिळाली. त्यांनी भारताचा इतिहास, विशेषतः विविध समाजांमधील सांस्कृतिक आणि सामाजिक देवाणघेवाणीचा सखोल अभ्यास केला.
त्यांनी आपल्या संशोधनातून भारताची सामाजिक एकोप्याची आणि परस्पर आदराची दीर्घ परंपरा अधोरेखित केली. मध्ययुगीन भारतीय इतिहासाचा बारकाईने अभ्यास करून त्यांनी दाखवून दिले की, मुस्लिम शासकांची धोरणे सहिष्णू आणि सर्वसमावेशक होती.
त्यांच्या या संशोधनाचा अर्क म्हणजे त्यांचा तीन खंडांचा प्रसिद्ध ग्रंथ: ‘हिंदुस्तान के अहद-ए-माझी में मुस्लिम हुकमरानों की मजहबी रवादारी’ (भारताच्या भूतकाळातील मुस्लिम शासकांची धार्मिक सहिष्णुता).
या महत्त्वपूर्ण ग्रंथात सय्यद सबाहुद्दीन यांनी मांडले की, मुस्लिम शासकांनी - विशेषतः मुघल काळात - शांततापूर्ण सहजीवन आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीला कसे प्रोत्साहन दिले.
त्यानंतर त्यांनी ‘इस्लाम में मजहबी रवादारी’ (इस्लाममधील धार्मिक सहिष्णुता) हे पुस्तक लिहिले. यात त्यांनी इस्लाममधील न्याय, करुणा आणि मानवी प्रतिष्ठेच्या मूल्यांवर प्रकाश टाकला.
त्यांच्या लेखनातून एक विचार वारंवार अधोरेखित होतो: "भारताची सर्वात मोठी ताकद तिच्या विविधतेत आहे." भारतीय संस्कृती अनेक धर्म, भाषा आणि परंपरांच्या मिलाफातून विकसित झाली आहे, असे त्यांचे ठाम मत होते. त्यांचे लेखन भारतीय समाजाचा खरा आत्मा म्हणजे सर्वसमावेशकता आणि सलोखा यांना मजबूत करण्यात मोठी भूमिका बजावते.
सय्यद सबाहुद्दीन यांनी ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे दाखवून दिले की, मुस्लिम शासकांनी सहिष्णुतेचे पालन केले. त्यांनी स्थानिक लोकांशी चांगले संबंध ठेवले, त्यांच्या धार्मिक प्रथांचा आदर केला आणि अनेकदा हिंदूंना महत्त्वाच्या प्रशासकीय पदांवर नेमले.
.webp)
त्यांनी मुघल धोरणाचे विश्लेषण करताना सम्राट अकबराचे उदाहरण दिले आहे. अकबराने वेद, महाभारत, रामायण आणि उपनिषदे यांसारख्या हिंदू ग्रंथांचे फारसी भाषेत भाषांतर करून घेतले. या भाषांतरांमुळे सांस्कृतिक देवाणघेवाणीला चालना मिळाली आणि दोन समाजांमधील दरी कमी झाली. (संदर्भ: हिंदुस्तान के अहद-ए-माझी में मुस्लिम हुकमरानों की मजहबी रवादारी)
अशा संवादातून सामायिक भाषा आणि एक व्यापक सामूहिक ओळख निर्माण झाली, असे त्यांचे निरीक्षण होते. भारताचा समृद्ध वारसा या परंपरांच्या विणकामावर उभारला आहे.
सय्यद सबाहुद्दीन यांचे लिखाण त्या आधुनिक गैरसमजालाही छेद देते, ज्यात मानले जाते की मुस्लिम शासकांनी हिंदू रयतेवर केवळ अत्याचार केले. ऐतिहासिक साधनांचा वापर करून त्यांनी सिद्ध केले की, असे दावे अनेकदा इतिहासाच्या सोयीस्कर वाचनातून येतात.
कोणत्याही समाजाच्या योगदानाची मोडतोड करणे भारताच्या लोकशाही मूल्यांना कमकुवत करते, असा इशारा त्यांनी दिला होता. वर्तमानात शांतता टिकवण्यासाठी भूतकाळाची संतुलित समज असणे आवश्यक आहे.
त्यांनी हेही नोंदवले की, पूर्वीच्या काळात, धार्मिक फरक असूनही, लोक अनेकदा एकमेकांचा आदर करत असत आणि सलोख्याने राहत असत. आज जेव्हा जगात असहिष्णुता वाढत आहे, तेव्हा त्यांचे हे विचार अधिकच समर्पक ठरतात.
आजच्या तणावाच्या काळात, सय्यद सबाहुद्दीन यांचे लिखाण भारताच्या सामायिक वारशाची आठवण करून देते. त्यांचे कार्य समज आणि सांस्कृतिक सलोख्याची मूल्ये पुन्हा जागृत करते. शांततापूर्ण समाजासाठी हे गुण आवश्यक आहेत.
त्यांच्या पुस्तकांचा अभ्यास आजही भारतभरातील शैक्षणिक संस्था आणि संशोधन केंद्रांमध्ये केला जातो. उपखंडाची संमिश्र संस्कृती समजून घेण्यासाठी विद्वान त्यांच्या संशोधनाचा आधार घेतात.
भारताचा धार्मिक संवाद आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचा इतिहास उलगडून, त्यांनी यावर भर दिला की, सामाजिक कलहावर खरा उपाय ज्ञान आणि संवादातच आहे. समाज बळावर नाही, तर सहानुभूती आणि मोकळेपणावर टिकतात, असे त्यांनी लिहिले.
सय्यद सबाहुद्दीन अब्दुर रहमान यांचा वारसा आजही सलोखा इच्छिणाऱ्यांसाठी मार्गदर्शक आहे. त्यांचे लिखाण सांगते की, भारताचे भविष्य हे आदर, सामायिक वारसा आणि परस्पर विश्वास मजबूत करण्यावरच अवलंबून आहे.
(लेखक अलिगढस्थित लेखक आणि इस्लामिक विद्वान आहेत.)
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -