सौदीतील अपघातात हैदराबादचे नागरिक मृत्युमुखी पडल्याने शहरावर शोककळा पसरली आहे. यात एकाच कुटुंबातील अठरा जणांचा समावेश आहे. शहरातील नातेवाईक शोकमग्न असून मृतदेह मायदेशी आणण्याची आणि पीडित कुटुंबांपैकी एकाला सौदीला पाठविण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी करत आहे. दरम्यान, रविवारी रात्री मदिनाकडे जाणारी बस टँकरला धडक्याने पेटली आणि त्यात ४२ नागरिकांचा होरपळून मृत्यू झाला.
एकाच कुटुंबातील १८ जणांचा मृत्यू
उमराहसाठी सौदी अरेबियाला गेलेल्या एका कुटुंबातील १८ जणांचा मृत्यू झाला आहे. नातेवाईकांच्या माहितीप्रमाणे, शेख नसीरुद्दीन आणि त्यांची पत्नी अख्तर बेगम, मशीराबाद येथील रामनगरचे रहिवासी सौदीला गेले होते. त्यांच्यासोबत दोन मुलांपैकी एक आणि दोन मुलीही होत्या. एक सूनसुद्धा होती. या कुटुंबातील नय्यम म्हणाला, एकाच कुटुंबातील अठरा जणांचा मृत्यू झाला. आम्ही सध्या नांपलीमधील हज हाऊस येथे आहोत आणि अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत. मृत व्यक्ती माझ्या पत्नीचे जवळचे नातेवाईक आहेत. त्यातील शेख नसीरुद्दीन हे तिचे मामा आणि अख्तर बेगम तिच्या काकी आहेत. अनेक महिला आणि मुले हैदराबादहून गेले होते. त्याने सांगितले की, शेख नसीरुद्दीनच्या मुलांपैकी एक शहरात राहिला, तर त्याची पत्नी समूहासोबत सौदीला गेली होती. याचप्रमाणे दुसऱ्या कुटुंबालाही अशाच दुःखद घटनेला सामोरे जावे लागले. सबीहा बेगम, तिचा मुलगा इरफान अहमद, त्याची पत्नी हुमा नाझन आणि त्यांची मुले हमदान अहमद व इजान अहमद देखील या अपघातात मृत्युमुखी पडले.
एकाच कुटुंबातील १८ जण गमावणाऱ्या नागरिकांचे नातेवाईक महंमद आसिफ यांच्यावर संकट कोसळले आहे. ते म्हणाले, माझे साडू, मेहुणी, मेहुण्याचा मुलगा, तीन मुली, त्यांचे मुले सर्वजण अपघातात गेले. हे १८ जण आठवडाभरापूर्वीच जेद्दाहला गेले होते. ते शनिवारी मदिना येथून परतणार होते. परंतु ते आता परत कधीही येणार नाहीत. दरम्यान, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी सौदीतील अपघाताबद्धल शोक व्यक्त केला आहे. नायडू यांनी 'एक्स'वर म्हटले, की सौदीतील अपघाताचे वृत्त ऐकून दुःख झाले आहे. या अपघातात तेलंगणातील बंधू, बहिणींचा दुर्देवी मृत्यू झाला. शोकमग्न कुटुंबाच्या दुःखात आपण सहभागी असून ईश्वरांनी त्यांना शक्ती देवो, अशा शब्दांत नायडू यांनी भावना व्यक्त केल्या.
उपराष्ट्रपती राधाकृष्णन यांनी शोक व्यक्त करताना, शोकाकुल कुटुंबाच्या दुःखात आपण सहभागी असून जखमी लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना करतो, असे म्हटले आहे. तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी अपघाताची सविस्तर माहिती घेण्याचे निर्देश दिले. पीडित कुटुंबांना तातडीने माहिती देण्यासाठी नियंत्रण कक्षाचे फोन नंबर जारी केल्याचे ते म्हणाले. मुख्य सचिव के. रामकृष्ण राव, पोलीस महासंचालक शिवधर रेड्डी यांना परराष्ट्र मंत्रालय आणि सौदीतील भारतीय दूतावासाशी संपर्कात राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
सौदीतील अपघातात मृत्युमुखी पडणारे नागरिक हैदराबादचे असल्याने शहरावर शोककळा पसरली आहे. नातेवाईकांना जबर धक्का बसला आहे. मुफ्ती आसिफ यांनी सांगितले, की त्यांच्या कुटुंबातील सात जण उमराहसाठी गेले आणि अपघातात मृत्युमुखी पडले. त्यांनी सरकारकडे तावडीने सौदीला जाण्यासाठी मदत करण्याची विनंती केली. अन्य रहिवासी महंमद सलमान म्हणाले, मृत झालेल्या नातेवाईकाशी शेवटचे संभाषण मदिना दोन तासाच्या अंतरावर असताना झाले आणि त्यानंतर संपर्क तुटला.
हैदराबादेतील अन्य रहिवासी महंमद बुरहान म्हणाले, या अपघातात वाचलेला एकमेव शोएव हा बसची काच फोडून बाहेर आला होता. हैदराबादचे सहायक पोलिस आयुक्त तफसीर इक्वाल यांच्या प्राथमिक माहितीनुसार, बसमधील ४० हून अधिक नागरिक हैदराबादचे होत 'एमआयएम'चे आमदार माजिद हुसेन यांनीही ४० पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याचे सांगितले, जेद्दाह येथील भारतीय वाणिज्य दूताबासाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले की रियाध येथौल भारतीय दूतावास पीडितांना मदत करत आहे आणि ते तेलंगण अधिकाऱ्यांशी संपर्कात आहेत. खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्याकडे मृतदेह भारतात आणण्यासाठी आणि जखमींवर उपचारासाठी तातडीने मदत करण्याची विनंती केली आहे.
मृतांची ओळख पटविण्याचे काम
सौदीतील अपघातानंतर राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाने मृतांची ओळख पटवणे व त्यांचे पार्थिव भारतात आणण्यासाठी तातडीने पावले उचलली आहेत. तेलंगणा सरकारने दिल्लीमध्ये विशेष नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. तेलंगण राज्य हज समितीचे अध्यक्ष सय्यद गुलाम अफझल बियाबानी म्हणाले, अल्पसंख्यांक कल्याण विभागाची संस्था हज यात्रेचे आयोजन करते. पण या समितीचा खासगी ट्रॅव्हल एजन्सीवर कोणताही अधिकार नाही. तथापि, मृतांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात सर्व मदत केली जाईल. आम्ही सरकारशी संपर्कात आहोत. मृतांच्या कुटुंबीयांना माहिती दिली जाईल. सध्याची स्थिती त्यांच्यासाठी अत्यंत कठीण आहे आणि मी संवेदना व्यक्त करतो.