राज्यसभेच्या ११ जागांसाठी बिहार, ओडिसा आणि हरियाणा या तीन राज्यांमध्ये सोमवारी मतदान होत असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. सात राज्यांमधील इतर २६ उमेदवार बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील ७, ओडिसातील ४, तामिळनाडूतील ६, पश्चिम बंगालमधील ५, आसाममधील ३, बिहारमधील ५, छत्तीसगडमधील २, हरियाणातील २, हिमाचल प्रदेशातील १ आणि तेलंगणाातील २ अशा एकूण ३७ जागांसाठी ही द्विवार्षिक निवडणूक होत आहे.
दहापैकी ६ राज्यांमध्ये सत्तेत असलेल्या एनडीएचे (NDA) २३४ सदस्यीय राज्यसभेत १३४ सदस्य असून त्यांच्या संख्येत आणखी भर पडणार आहे. दुसरीकडे, चार राज्यांमध्ये सत्तेत असलेल्या विरोधी 'इंडिया' (INDIA) आघाडीकडे ८० जागा आहेत. या निवडणुकीची मतमोजणी आजच होणार आहे.
बिहारमध्ये एनडीए सर्व पाच जागांवर विजय मिळवण्याबाबत पूर्णपणे खात्री बाळगून आहे. तिथे नितीश कुमार (जेडीयू), नितीन नबीन (भाजप) आणि उपेंद्र कुशवाहा (आरएलएम) रिंगणात आहेत. एनडीएचे इतर दोन उमेदवार जेडीयूचे केंद्रीय मंत्री रामनाथ ठाकूर आणि भाजपचे प्रदेश सरचिटणीस शिवेश कुमार आहेत. जेडीयू मंत्री विजय कुमार चौधरी यांनी सांगितले की, एनडीएचे सर्व नेते पाचही जागांबद्दल समाधानी आहेत. खरी अस्वस्थता विरोधी छावणीत असून त्यांची सुरू असलेली धावपळच त्यांची साशंकता दर्शवते.
दुसरीकडे, आरजेडीने एमआयएमच्या (AIMIM) ५ आमदारांच्या पाठिंब्यावर मदार ठेवली आहे. तेजस्वी यादव यांनी रविवारी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष अख्तरुल इमान यांची भेट घेतली. इमान यांनी आरजेडी नेते अमरेंद्र धारी सिंह यांना पाठिंबा जाहीर केला असून सर्व धर्मनिरपेक्ष पक्ष एकत्र असल्याचे तेजस्वी यादव यांनी नमूद केले.
ओडिसामध्ये चार जागांसाठीची निवडणूक अतिशय नाट्यमय वळणावर पोहोचली आहे. काँग्रेसने आपल्या एका बेपत्ता आमदाराला नोटीस बजावली आहे. आमदारांना लाच देण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी कर्नाटकातून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. भाजपने आपल्या आमदारांना मतदानाच्या प्रशिक्षणासाठी पारादीप येथे नेले आहे. बेंगळुरूमध्ये काँग्रेस आमदारांना ठेवलेल्या रिसॉर्टमध्ये शिरून कोऱ्या चेकद्वारे आमिष दाखवल्याप्रकरणी ही अटक झाली.
ओडिसा काँग्रेसचे उपनेते अशोक कुमार दास यांनी आमदारांना करोडो रुपयांची ऑफर दिल्याची तक्रार नोंदवली आहे. दरम्यान, बेपत्ता आमदार दशरथी गमंग यांना काँग्रेसने नोटीस दिली आहे. मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी पारादीपमध्ये तयारीचा आढावा घेतला. बीजेडी प्रमुख नवीन पटनायक यांनीही क्रॉस वोटिंग टाळण्यासाठी आमदारांशी संवाद साधला. या जागा बीजेडीच्या ३ आणि भाजपच्या १ सदस्याची मुदत संपल्याने रिक्त झाल्या आहेत.
हरियाणात ३१ काँग्रेस आमदारांना सिमला जवळील कुफरी येथून कसौलीला कडक सुरक्षेत हलवण्यात आले आहे. मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू यांनी या आमदारांची भेट घेतली. भाजपच्या किरण चौधरी आणि राम चंद्र जांगडा यांची मुदत ९ एप्रिलला संपत आहे. तिथे भाजपचे संजय भाटिया, काँग्रेसचे करमवीर सिंह बौद्ध आणि भाजप पुरस्कृत अपक्ष सतीश नांदल रिंगणात असून प्रत्येकाला विजयासाठी ३१ मतांची गरज आहे.
महाराष्ट्रात महायुतीचे ६ आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार अशा सातही उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित आहे. महायुतीतून विनोद तावडे, रामराव वडकुते, माया आयवते (भाजप), रामदास आठवले (आरपीआय), ज्योती वाघमारे (शिवसेना) आणि पार्थ पवार (राष्ट्रवादी-अजित पवार गट) यांचा यात समावेश आहे.
तामिळनाडूमध्ये तिरुची शिवा, जे. कॉन्स्टँटिन रवींद्रन (डीएमके), एम. ख्रिस्तोफर टिळक (काँग्रेस), एल. के. सुदीश (डीएमडीके), एम. थंबीदुराई (अण्णा द्रमुक) आणि अंबुमणी रामदास (पीएमके) बिनविरोध निवडून येतील. हिमाचलमध्ये काँग्रेसचे अनुराग शर्मा हे एकमेव उमेदवार असल्याने त्यांची निवड निश्चित आहे. तेलंगणातून अभिषेक मनु सिंघवी आणि वेम नरेंदर रेड्डी बिनविरोध निवडून आले आहेत.
पश्चिम बंगालमध्ये बाबुल सुप्रियो, राजीव कुमार, मॅनका गुरुस्वामी, कोएल मल्लिक (तृणमूल) आणि भाजपचे राहुल सिन्हा रिंगणात आहेत. छत्तीसगडमधून फुलोदेवी नेताम (काँग्रेस) आणि लक्ष्मी वर्मा (भाजप) तर आसाममधून जोगेन मोहन, तेरश गोवाला (भाजप) आणि प्रमोद बोरो (यूपीपीएल) बिनविरोध निवडून येतील.