कोहिनूर हिरा भारताला परत करा; न्यूयॉर्कचे महापौर झोहरान ममदानी यांचे किंग चार्ल्स यांना आवाहन

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
न्यूयॉर्कचे महापौर झोहरान ममदानी आणि किंग चार्ल्स तिसरे
न्यूयॉर्कचे महापौर झोहरान ममदानी आणि किंग चार्ल्स तिसरे

 

न्यूयॉर्क शहराचे महापौर झोहरान ममदानी यांनी किंग चार्ल्स तिसरे यांना 'कोहिनूर' हिरा परत करण्यासाठी प्रोत्साहित करणार असल्याचे म्हटले आहे. बुधवारी (२९ एप्रिल, २०२६) ब्रिटीश राजांची भेट घेण्यापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत ममदानी बोलत होते. "जर मी राजांशी स्वतंत्रपणे बोललो, तर मी त्यांना कोहिनूर हिरा परत करण्याबाबत नक्कीच सांगेन," असे मम्दानी यांनी नमूद केले. अमेरिकेच्या अधिकृत दौऱ्यावर असलेले किंग चार्ल्स दुसऱ्या दिवशी न्यूयॉर्कमध्ये आले होते, त्यावेळी त्यांना काय सांगाल, असा प्रश्न महापौरांना विचारण्यात आला होता.

यापूर्वी मंगळवारी (२८ एप्रिल, २०२६) किंग चार्ल्स यांनी अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त बैठकीला संबोधित केले. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि प्रथम महिला मेलानिया ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये आयोजित केलेल्या 'स्टेट डिनर'मध्ये किंग चार्ल्स आणि क्वीन कॅमिला यांचा सन्मान करण्यात आला.

किंग चार्ल्स आणि क्वीन कॅमिला यांनी न्यूयॉर्कमधील '९/११ मेमोरियल'ला भेट देऊन दहशतवादी हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली वाहिली. तसेच त्यांनी अप्पर मॅनहॅटनमधील मुले आणि कुटुंबांना आधार देणाऱ्या 'हारलेम ग्रोन' या शहरी शेती प्रकल्पालाही भेट दिली.

महापौर ममदानी यांनी किंग चार्ल्स यांची भेट ९/११ मेमोरियल येथे घेतली. १०५.६ कॅरेटचा हा कोहिनूर हिरा १८४९ मध्ये महाराजा दुलिप सिंग यांनी राणी व्हिक्टोरिया यांना दिला होता. पुढे १९३७ मध्ये राजमातांच्या मुकुटात हा हिरा बसवण्यात आला होता.

युनायटेड किंगडममधून कोहिनूर परत आणण्यासाठी भारत सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. भारत वेळोवेळी हा मुद्दा ब्रिटन सरकारकडे मांडत असून या विषयावर समाधानकारक तोडगा काढण्यासाठी मार्ग शोधले जात आहेत. सध्या हा कोहिनूर हिरा 'लंडन टॉवर'मध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आला आहे. 'हिस्टोरिक रॉयल पॅलेस' या संस्थेच्या माहितीनुसार, राजमाता एलिझाबेथ यांच्या मुकुटात जडवलेल्या या हिऱ्याचे पूर्वी मुघल सम्राट, इराणचे शाह, अफगाणिस्तानचे अमीर आणि शीख महाराजांसह अनेक मालक राहिले आहेत.