इक्वेडोरच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या भारत दौऱ्यात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 h ago
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासमवेत इक्वेडोरच्या परराष्ट्र मंत्री गॅब्रिएला सोमरफेल्ड रोसेरो
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांच्यासमवेत इक्वेडोरच्या परराष्ट्र मंत्री गॅब्रिएला सोमरफेल्ड रोसेरो

 

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी बुधवारी इक्वेडोरच्या परराष्ट्र मंत्री गॅब्रिएला सोमरफेल्ड रोसेरो यांची भेट घेतली. गॅब्रिएला या तीन दिवसांच्या अधिकृत भारत दौऱ्यावर आल्या आहेत. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी व्यापार, आरोग्य, कृषी, डिजिटल आणि क्षमता बांधणी (कॅपॅसिटी बिल्डिंग) यांसारख्या अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यावर सविस्तर चर्चा केली.

आपल्या दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी बुधवारी त्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांचीही भेट घेतली.

एस. जयशंकर यांनी 'एक्स'वर (पूर्वीचे ट्विटर) एका पोस्टद्वारे या बैठकीची मोठी माहिती दिली. "पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर आलेल्या इक्वेडोरच्या परराष्ट्र मंत्री गॅब्रिएला सोमरफेल्ड रोसेरो यांचे स्वागत करताना मला खूप आनंद होत आहे. आम्ही व्यापार, आरोग्य, कृषी आणि डिजिटल क्षेत्रासह अनेक विषयांवर सहकार्य वाढवण्यावर चर्चा केली. बहुपक्षीय मंचांवरही आम्ही एकमेकांच्या सहकार्याने काम करू," असे ते म्हणाले.

इक्वेडोरच्या परराष्ट्र आणि मानवी हालचाली (ह्युमन मोबिलिटी) मंत्री असलेल्या गॅब्रिएला बुधवारी पहाटे नवी दिल्लीत पोहोचल्या.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनीही त्यांचे स्वागत केले. "गॅब्रिएला सोमरफेल्ड रोसेरो यांचे नवी दिल्लीत आगमन झाल्यावर आम्ही त्यांचे अत्यंत प्रेमाने स्वागत केले. त्यांच्या या भेटीमुळे भारत आणि इक्वेडोरमधील संबंध अधिक मजबूत होतील," असे जयस्वाल यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, त्या १ मे रोजी नवी दिल्लीहून मायदेशी रवाना होतील.

एका वेगळ्या पोस्टमध्ये एस. जयशंकर यांनी नवी दिल्लीतील ११ व्या 'हेड्स ऑफ मिशन्स' परिषदेत केलेल्या मार्गदर्शनाची माहिती दिली. सध्याचे जग अत्यंत अस्थिर आणि अशांत आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रीय हित पुढे नेण्यासाठी आणि देशाची उद्दिष्टे सुरक्षित ठेवण्यासाठी भारतीय मुत्सद्देगिरी पूर्णपणे तयार आहे, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.