RSS संस्थापक डॉ. हेडगेवारांना 'भारतरत्न' द्या - भाजप अल्पसंख्यक मोर्चा

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 2 h ago
डावीकडे भाजप अल्पसंख्यक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दिकी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार
डावीकडे भाजप अल्पसंख्यक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दिकी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार

 

भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) अल्पसंख्यक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष जमाल सिद्दिकी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) संस्थापक आणि स्वातंत्र्यसेनानी डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांना मरणोत्तर 'भारतरत्न' हा सर्वोच्च नागरिक सन्मान प्रदान करण्याची मागणी केली आहे. यासाठी सिद्दिकी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना एक औपचारिक पत्र लिहून, डॉ. हेडगेवार यांच्या राष्ट्रकार्याचा गौरव करण्याची विनंती केली आहे.

आपल्या पत्रात जमाल सिद्दिकी यांनी म्हटले आहे की, डॉ. हेडगेवार हे भारताचे महान स्वातंत्र्यसेनानी आणि राष्ट्रनिर्माणाचे प्रणेते होते. त्यांना 'भारतरत्न' प्रदान करणे हे केवळ त्यांच्या अतुलनीय योगदानाचा सन्मान करण्यासाठीच नाही, तर युवा पिढीला राष्ट्रवादाची प्रेरणा देण्यासाठीही आवश्यक आहे, असे त्यांचे मत आहे.

या पत्रात डॉ. हेडगेवार यांच्या स्वातंत्र्य संग्रामातील योगदानाचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. १ एप्रिल १८८९ रोजी नागपूर येथे जन्मलेल्या हेडगेवार यांनी शाळेत असतानाच 'वंदे मातरम'चे नारे लावून ब्रिटिश शासनाविरुद्ध आवाज उठवला होता. कलकत्त्यामध्ये वैद्यकीय शिक्षण घेत असताना ते अनुशीलन समितीशी जोडले गेले आणि बंकिमचंद्र चटर्जी व विनायक दामोदर सावरकर यांच्या विचारांनी प्रेरित झाले. १९२१ मध्ये केलेल्या भाषणांमुळे ब्रिटिश सरकारने त्यांना राजद्रोहाच्या आरोपाखाली एक वर्षाची शिक्षा सुनावली होती. तसेच, १९३० च्या जंगल सत्याग्रहातही त्यांना नऊ महिन्यांचा कारावास झाला होता, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

१९२५ मध्ये नागपूर येथे डॉ. हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. समाजाला संघटित करून देशाला मजबूत करणे, हा यामागील उद्देश होता. २१ जून १९४० रोजी त्यांचे निधन झाले, पण त्यांचे विचार आणि संघटना आजही भारताच्या पायाला मजबूत करत आहे, असे सिद्दिकी यांनी म्हटले आहे.

डॉ. हेडगेवार यांचे स्वातंत्र्य संग्रामातील योगदान आणि भारतीय समाजाला एकत्र आणण्याची त्यांची दृष्टी लक्षात घेता, त्यांना भारतरत्न प्रदान करणे अत्यंत उचित ठरेल, असे सिद्दिकी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. "हा सन्मान केवळ त्यांच्या वैयक्तिक बलिदानाला मान्यता देणार नाही, तर निनावीपणे राष्ट्रसेवा करत असलेल्या सर्व स्वयंसेवकांनाही प्रोत्साहन देईल," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जमाल सिद्दिकी यांनी सरकारला या मागणीवर विचार करण्याचे आणि डॉ. हेडगेवार यांना भारतरत्नने सन्मानित करण्याची प्रक्रिया लवकर सुरू करण्याचे आवाहन केले आहे.

 


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter