कारगिल योद्ध्याच्या मुलाने गाजवले मैदान, पहिले कसोटी शतक भारतीय लष्कराला केले समर्पित!

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 15 h ago
क्रिकेटपटू ध्रुव जुरेल
क्रिकेटपटू ध्रुव जुरेल

 

लष्करी सुपुत्र असलेल्या ध्रुव जुरेलने कसोटी क्रिकेटमधील आपले पहिलेवहिले शतक भारतीय लष्कराला समर्पित केले आहे. "रणांगणावर नेहमीच शौर्य गाजवणाऱ्या आपल्या लष्कराचा मला अभिमान आहे," अशी भावना त्याने यावेळी व्यक्त केली.

वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात जुरेलने १२५ धावांची शानदार खेळी साकारली. शतक झळकावल्यानंतर त्याने केलेले सेलिब्रेशन विशेष लक्ष वेधून घेणारे होते. जुरेलचे वडील कारगिल युद्धात लढले होते. या पार्श्वभूमीवर आपल्या सेलिब्रेशनबद्दल बोलताना जुरेल म्हणाला, "अर्धशतक केल्यानंतर मी माझ्या वडिलांना सलाम केला होता, तर माझी ही शतकी खेळी संपूर्ण भारतीय लष्करासाठी समर्पित होती."

कसोटीच्या पहिल्याच दिवशी केएल राहुल आणि रवींद्र जडेजा यांनीही शतके झळकावून भारताला मजबूत स्थितीत आणले.

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर जुरेलने आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला, "भारतीय संघात स्थान मिळणे हे माझ्यासाठी अभिमानाचे आहे. मला अंतिम संघात खेळण्याची संधी मिळत नसली, तरी मी सराव कायम ठेवून स्वतःला तयार ठेवत असतो. संधी मिळताच तिचे सोने करण्यासाठी आपण सदैव तयार असावे, हा माझा हेतू असतो. मला शिस्त आवडते आणि मी स्वतःला नेहमीच प्रोत्साहित ठेवत असतो."