भारतात जेव्हाही टेनिसचा विषय निघतो तेव्हा एकच नाव सर्वांच्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे सानिया मिर्झा. भारतीय 'टेनिसची क्वीन' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सानिया मिर्झाचा आज वाढदिवस. तिने कोट्यवधी मुलींना मोठी स्वप्ने पाहण्यासाठी प्रेरित केले. सानियाने नेहमीच तिच्या खेळाने आणि स्पष्टवक्तेपणाने मैदान गाजवले. आज तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या प्रसंगाची आठवण करून देणारा हा विशेष लेख.
सानियाच्या आयुष्यातील त्या एका प्रसंगाने केवळ एका वादावर पडदा टाकला नाही, तर 'फतवा' या शब्दाबद्दलचा एक मोठा गैरसमजही दूर केला होता. काही वर्षांपूर्वी सानिया मिर्झाच्या टेनिसमधील पोशाखावरून मोठा वाद निर्माण झाला होता. काही कट्टरपंथीयांनी तिच्या कपड्यांवर आक्षेप घेतला. तिच्याविरुद्ध 'फतवा' जारी झाल्याच्या बातम्यांनी देशभरात खळबळ उडाली. 'फतवा' शब्द ऐकल्यावर अनेकांना तो एक धार्मिक आदेश किंवा शिक्षा वाटतो, पण हा एक मोठा गैरसमज आहे.
पद्मविभूषण मौलाना वाहिदूद्दीन खान यांनी त्यांच्या पुस्तकात फतवाचा खरा अर्थ स्पष्ट केला आहे. त्यांच्या मते फतवा म्हणजे केवळ मत किंवा सल्ला असतो. तो कायदेशीरदृष्ट्या बंधनकारक नसतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे फतवा फक्त तो मागणाऱ्या व्यक्तीलाच लागू होतो. तो सल्ला स्वीकारायचा की नाही, हे ठरवण्याचा अधिकारही त्याच व्यक्तीचा असतो. दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीबद्दल फतवा मागणे इस्लाममध्ये निषिद्ध मानले जाते.
हाच मुद्दा मौलाना वाहिदूद्दीन यांनी त्या वादाच्या वेळी अत्यंत प्रभावीपणे मांडला. वाद शिगेला पोहोचलेला असताना एका व्यक्तीने मौलाना वाहिदूद्दीन खान यांना विचारले, "मौलानाजी, सानिया मिर्झाच्या कपड्यांविषयी तुमचे काय मत आहे?" यावर मौलानांनी दिलेले उत्तर खूप विचार करायला लावणारे होते. ते शांतपणे म्हणाले, "सानिया मिर्झा माझ्याकडे सल्ला मागायला आलेली नाही. जेव्हा ती येईल, तेव्हा तिला काय मार्गदर्शन करायचे ते मी करेन. इतरांना त्यात ढवळाढवळ करण्याचा कोणताही हक्क नाही."
मौलाना वाहिदूद्दीन खान यांनी एकाच वाक्यात फतव्याचा खरा अर्थ, त्याचे नियम आणि मर्यादा स्पष्ट केल्या होत्या. तिसऱ्या व्यक्तीला एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करण्याचा किंवा सल्ला देण्याचा अधिकार नाही, हा त्यांच्या बोलण्याचा गाभा होता. त्यांच्या या एका उत्तराने संपूर्ण वादाचा रोखच बदलला. त्यांनी सानियाच्या चारित्र्यावर बोट ठेवण्याऐवजी, प्रश्न विचारणाऱ्याला आत्मपरीक्षण करायला लावले. त्यांच्या या भूमिकेचे मोठ्या प्रमाणावर स्वागत झाले आणि एका गुंतागुंतीच्या विषयावर अत्यंत सुज्ञपणे आणि प्रभावीपणे भाष्य केल्याबद्दल त्यांची प्रशंसा झाली.
एका महिला खेळाडूच्या कपड्यांवरून तिचे चारित्र्य ठरवणाऱ्या समाजाला, मौलाना वहीदुद्दीन खान यांनी खऱ्या अर्थाने आरसा दाखवला होता. आज सानियाच्या वाढदिवसानिमित्त, तिच्या कर्तृत्वासोबत मौलानांच्या या सुज्ञ विचारांचे स्मरण करणेही तितकेच महत्त्वाचे ठरेल.
'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा -