इराण-इस्रायल युद्धामुळे आसामच्या चहा उत्पादकांवर ओढवले मोठे संकट

Story by  आवाज़ मराठी | Published by  Bhakti Chalak • 1 Months ago
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो

 

दौलत रहमान, गुवाहाटी

इराणमधील वाढता तणाव आणि मध्यपूर्वेतील अस्थिरतेचा भारताच्या चहा निर्यात क्षेत्राला मोठा फटका बसत आहे. परिस्थिती आणखी बिघडल्यास आसामच्या चहा उद्योगाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते.

आसाममधून निर्यात होणाऱ्या एकूण चहापैकी जवळपास ५० टक्के चहा इराणमध्ये वापरला जातो. आसामच्या या प्रमुख उत्पादनासाठी इराण ही सर्वात महत्त्वाची परदेशी बाजारपेठ आहे. आसामचा चहा त्याच्या कडक चवीसाठी, चमकदार रंगासाठी आणि ताजेपणासाठी ओळखला जातो. इराणच्या ग्राहकांमध्ये या चहाला प्रचंड मागणी आहे.

सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीमुळे व्यापार संबंध किंवा सागरी वाहतूक विस्कळीत झाल्यास निर्यातीवर गंभीर परिणाम होईल. अशी भीती निर्यातदारांनी व्यक्त केली आहे. वाढत्या भूराजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर पैसे अडकण्याची भीती, वाहतुकीच्या अडचणी आणि विम्याच्या अनिश्चिततेमुळे व्यापाऱ्यांचा आत्मविश्वास डळमळीत होऊ लागला आहे.

गुवाहाटी टी ऑक्शन सेंटर बायर्स असोसिएशनच्या एका पदाधिकाऱ्याने यावर चिंता व्यक्त केली आहे. सध्याची परिस्थिती आणखी आठवडाभर राहिल्यास इराणमधील ग्राहकांकडून आसामच्या चहाची मागणी घटेल. परिणामी चहाचे भावही कोसळतील. पर्यायी खरेदीदार न मिळाल्यास आसामच्या चहा उद्योगाचे अतोनात नुकसान होईल.

२०२५ मध्ये भारताच्या चहा निर्यातीने २८ कोटी किलोग्रॅमचा ऐतिहासिक टप्पा गाठला होता. या क्षेत्रात हा एक मोठा टप्पा मानला जातो. हे उद्दिष्ट गाठण्यात भारतातील सर्वात मोठ्या चहा उत्पादक राज्याने म्हणजेच आसामने सिंहाचा वाटा उचलला होता. देशाच्या एकूण चहा उत्पादनात आसामचा वाटा ५० टक्क्यांहून अधिक आहे. येथे दरवर्षी अंदाजे ६५ ते ७० कोटी किलो चहाचे उत्पादन होते.

संघर्ष अधिक चिघळल्यास इराणला आसामसह इतर ठिकाणांहून होणारी चहाची आयात तात्पुरती थांबवावी लागेल. असा इशारा चहा व्यापाऱ्यांनी दिला आहे. बँकांवरील निर्बंध, आर्थिक निर्बंधांमधील गुंतागुंत आणि बंदरे बंद राहण्याच्या शक्यतेमुळे व्यापारातील व्यवहार अधिकच कठीण होऊ शकतात.

"अल्पावधीचा व्यत्ययही मोठ्या नुकसानीला कारणीभूत ठरू शकतो. कारण चहा हा नाशवंत माल आहे. त्याची गुणवत्ता टिकवणे आणि गोदामाचा खर्च सांभाळणे अत्यंत आव्हानात्मक असते," असे या उद्योगातील एका तज्ज्ञाने सांगितले.

इराण हा चहाचा प्रमुख खरेदीदार आहे. तेथील अस्थिरतेमुळे गेल्या वर्षभरात मिळालेल्या गतीला खीळ बसू शकते. ही भीती निर्यातदारांना सतावत आहे. ही कोंडी दीर्घकाळ राहिल्यास देशांतर्गत बाजारात चहाचा अतिरिक्त साठा पडून राहील. याचा थेट परिणाम किमतींवर होईल आणि शेवटी चहा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल.

इराणव्यतिरिक्त इतर मध्य पूर्वेकडील देशांमध्येही आसामच्या चहाला नेहमीच मोठी मागणी असते. तिथे चहा हे रोजच्या पिण्यातील एक महत्त्वाचे पेय मानले जाते. कडक 'ब्लॅक टी' पिण्याच्या सांस्कृतिक आवडीमुळे हा भाग भारतीय चहा निर्यातदारांसाठी नेहमीच अत्यंत फायदेशीर बाजारपेठ राहिला आहे.

या संपूर्ण प्रदेशात भूराजकीय तणाव वाढत आहे. त्यामुळे निर्यातदार भविष्यातील व्यापाराच्या संधींबाबत अत्यंत सावधगिरी बाळगत आहेत.

इराणमधील परिस्थिती सतत बदलत आहे. त्यामुळे आसामचा चहा उद्योग धास्तावला आहे. भारताच्या या अत्यंत लोकप्रिय निर्यात उत्पादनाचे भवितव्य ठरवणाऱ्या घडामोडींवर उद्योजक बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

(लेखक 'आवाज-द-व्हॉईस' आसामचे संपादक आहेत)


'आवाज मराठी'वर प्रसिद्ध होणारे लेखन, व्हिडिओज आणि उपक्रम यांविषयीचे अपडेट्स मिळवण्यासाठी या लिंक्सवर क्लिक करा  -

Awaz Marathi WhatsApp Group 
Awaz Marathi Facebook Page

Awaz Marathi Twitter